इंटरनेटची साथी...
 महा एमटीबी  14-Mar-2018
 

वयाची साठी ओलांडलेल्या व्यक्तीपासून ते थेट आठ-दहा वर्षांची मुलं इंटरनेट अगदी सहजपणे हाताळतात. एक टाईमपास म्हणून इंटरनेट वापरण्याकडे अनेकांचा कल असला तरी अनेकांसाठी इंटरनेट हे उदरनिर्वाहाचे माध्यम ठरले आहे. अशीच एक यशोगाथा...
 
गरजेनुसार आपण या बदलत्या युगात स्वतःचं स्थान सिद्ध करण्यासाठी काही नवनवीन गोष्टींचं आकलन करून घेत असतो. आपल्याला त्या-त्या विषयाचं ज्ञान मिळाल्यानंतर त्याचा प्रत्यक्ष व्यवहारामध्ये, दैनंदिन कामामध्ये उपयोग केला जातो. आजचे युग हे तंत्रज्ञानाचे आहे. रोजच्या व्यवहारामध्ये तंत्रज्ञानाची मदत घेऊन अनेक कामे केली जातात, पण सर्वांनाच या तंत्रज्ञानाची निदान तोंडओळख करून घेण्याची संधी मिळत नाही किंवा तशी इच्छा असली तरी ते शिकण्यासाठी मार्ग मिळत नाही, हीच बाब लक्षात घेऊन आसाममधल्या निजारा तालुकदार या ३० वर्षीय तरुणीने आसामच्या ग्रामीण भागातील तंत्रज्ञानापासून दूर असलेल्या महिलांना बदलत्या काळाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा वसा घेतला आहे. ’इंटरनेट साथी’ नावाचा उपक्रम राबवून तंत्रज्ञानाचे सखोल ज्ञान स्थानिक महिलांना दिलं जात आहे. २०१६ मध्ये ’इंटरनेट साथी’ ची सुरुवात करण्यात आली.
 
निजारा सायकलवर स्वार होऊन टॅबलेट, मोबाईल घेऊन गावा-गावांमध्ये फिरून इंटरनेटच्यासंदर्भात महिलांमध्ये जनजागृती करण्याचे काम करीत आहे. निजारा आसामच्या बास्का जिल्ह्यामध्ये राहते. निजाराची आई उदरनिर्वाहासाठी सुरुवातीपासूनच शिवणकामाचे काम करत होती. या कामामध्ये निजारासुद्धा त्यांना मदत करत होती. पण गेल्या काही वर्षांपासून शिवणकामाला मिळणारा प्रतिसाद हळूहळू कमी होऊ लागला. त्यांनी शिवलेले कपडे, त्यांनी बनवलेल्या डिझाईन्सची त्या जुन्या झाल्याचे मागणी कमी झाली. त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होऊ लागला. मग त्या कामामध्ये काही तरी नवीन करण्याची गरज भासू लागली. मग निजाराने इंटरनेटची मदत घेऊन नवीन डिझाईन्सनुसार नव्याने कामाला सुरुवात केली आणि निजाराचा प्रयोग यशस्वी होऊ लागला. निव्वळ एका क्लिकवर आपल्याला हव्या असणार्‍या माहितीचा खजिना मिळणं किती सोपं असल्याची जाणीव निजाराला झाली. विशेष म्हणजे यापूर्वी संभाषणपुरताच मोबाईल हाताळणार्‍या निजाराच्या आईने इंटरनेट कसे चालवायचे, ही बाब शिकून घेतली. निजारा व तिच्या आईने बनविलेल्या कपड्यांची मागणी दिवसेंदिवस वाढू लागली. हे सगळं सुरू असतानाच निजाराला आजूबाजूच्या गावामध्ये राहणार्‍या कित्येक महिला इंटरनेट वापरत नसल्याचं लक्षात आलं. अर्थात त्यादेखील कुटुंबासाठी छोटी-मोठी कामं करत असल्या तरी त्यातून त्यांना फारसा आर्थिक मोबादला मिळत नसल्याचे तिला प्रकर्षाने जाणवलं.
 
मग त्यानंतर निजाराने इंटरनेटच्या ज्ञानापासून दूर असलेल्या महिलांना इंटरनेटच्या माध्यमातून अनेक कामं कशी मिळवता येतात किंवा त्या करत असलेल्या कामांमध्ये कशा सुधारणा करता येतील, याविषयी मार्गदर्शन करण्याचा निश्चय केला. निजारा यांच्याप्रमाणे शिवणकामाचे कामकरत असलेल्या महिलांना त्यांनी मार्गदर्शन करायला सुरुवात केली. निजाराने महिलांच्या हाती मोबाईल सोपवून त्याचा कशाप्रकारे उपयोग करता येऊ शकतो, ही बाब शिकवली. त्याचं प्रात्यक्षिक महिलांकडून करून घेतलं. मग हळूहळू अत्याधुनिक पद्धतीने शेतीची कामं कशी करावी, त्यासाठी आवश्यक असलेल्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन, नवनवीन पदार्थ तयार करून त्याचे स्टॉल लावून त्यातून काही महिला उदरनिर्वाह करू लागल्या आहेत. तसेच पेटिंग्ज, मेकअप, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करून त्या प्रदर्शनामध्ये काही महिला ठेवू लागल्या आहेत. २०१६ पासून सुरू केलेल्या या उपक्रमाचा लाभ जवळपास दहा हजार महिलांनी घेतला आहे.
 
 
 
- सोनाली रासकर