कोकणातलं खासगी अभयारण्य
 महा एमटीबी  14-Mar-2018
 
 

 
कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूणपासून सुमारे बावीस किलोमीटर अंतरावर असलेल्या शिरवली या गावातल्या नंदू तांबे यांच्या स्वत:च्या मालकीच्या सुमारे ३२ एकरांच्या जंगलाला ‘खासगी अभयारण्य’ हेच नाव समर्पक ठरेल. वास्तविक आज पर्यावरण या विषयात बरीच ‘अरण्यरूदनं’ सुरू आहेत. कुठे विकासप्रकल्पासाठी जंगलतोडीचा आदेश निघतो. त्याला स्थानिकांचा आणि पर्यावरणवाद्यांचा विरोध होतो आणि मग अशी प्रकरणं कोर्टात जातात. यात धड विकासही होत नाही आणि पर्यावरणही सांभाळलं जात नाही.
 
पण अशा कुठल्याच भानगडीत न पडता कोकणातला एक माणूस गेली अनेक वर्षे तटस्थपणे सुमारे ३३ एकरांचं जंगल जपण्याचं आणि वाढविण्याचं काम करतोय. त्यांचं खरं नाव आहे निशिकांत तांबे; पण त्यांना ओळखणारी सगळी माणसं ‘नंदू तांबे’ याच नावाने ओळखतात. हे कोकणप्रांताचं एक गमतीशीर वैशिष्ट्य आहे. इथले लोक टोपणनावानेच ओळखले जातात. त्यात एक प्रेमभावना असते. गुहागरला गेल्यावर ‘निशिकांत तांबे कुठे राहतात?’ असं कोणालाही विचारलं तर पटकन सांगता येईल की नाही शंका आहे; पण ‘नंदू तांबे कुठे राहतात?’ असं विचारलं तर कोणीही सांगेल !
 
रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण तालुक्यातलं शिरवली गाव हीच नंदू तांबेंची जन्मभूमी आणि कर्मभूमी. खास कोकणी पद्धतीचं पारंपरिक कौलारू घर आणि एकत्र कुटुंब. पूर्वी त्यांची स्वत:ची १२-१३ एकर जंगलजमीन होती. आई गृहिणी तर वडील लोटे औद्योगिक वसाहतीत नोकरी करत होते. नंदू तांबेंना लहानपणापासून झाडं, पक्षी, प्राणी यांची आवड होती. बारावीपर्यंत शिक्षण झालं. मुंबईत ते नोकरीसाठी आले होते, पण काही दिवसांतच गावाला परत गेले. कोकणातला सोन्यासारखा निसर्ग सोडून मुंबईच्या नको इतक्या वाढलेल्या लोकसंख्येत भर घालणं त्यांना पटलं नाही. अर्थात, कोकणात राहायचं म्हणजे अर्थार्जनाचं काहीतरी साधन बघावंच लागणार होतं. पण नंदू तांबेंचा सगळ्यात मोठा शहाणपणा म्हणजे मूळचं असलेलं जंगल सपाट करून त्यांनी तिथे हापूस आंबा, काजूची झाडं लावली नाहीत. जमीन घ्यायची, तिथलं मूळचं जंगल वणवे लावून वा जेसीबी लावून जमीनदोस्त करायचं, मग तिथे आंबा-काजूची कलमं लावायची, त्यांना पाणी घालायला बोअरवेल्स खणायच्या, दरवर्षी कलमांना वारेमाप खतं घालायची आणि फवारण्या करायच्या आणि एवढं करूनही बागायती परवडेनाशी झाली की मग जमीन विकून टाकायची, हे कोकणात सध्या प्रतिष्ठा पावलेले उपद्व्याप नंदू तांबेंनी कधीच केले नाहीत. जंगल हे जंगलच ठेवायचं, हा दृढनिश्‍चय होता. जंगलात फिरणं, झाडांची काळजी घेणं, पक्षीनिरीक्षण, अशा गोष्टींमध्ये त्यांना मनापासून आनंद वाटत होता.
 
 
 
 
बहुतांश लोक ‘पैसा कमविण्यासाठी मी काय करू?’ या चिंतेत असतात. त्याचे मार्ग शोधत असतात. यात अस्वाभाविक असं काहीच नाही, पण एक सिद्धांत असं सांगतो की, माणसाने आपल्या आवडीचं काम न कंटाळता चिकाटीने करत राहावं. लक्ष्मी त्याच्याकडे आपोआप चालत येते, हा सिद्धांत नंदू तांबे यांच्याबाबतीत तरी तंतोतंत खरा ठरला आहे. त्यांना आर्थिक उत्पन्नासाठी वेगळं काही करावं लागलं नाही. जंगलाची आवड जपता जपताच त्यांना अर्थार्जनाचा मार्ग सापडला. नंदू तांबेंच्या जंगलात पक्ष्यांना आश्रयस्थान मिळाल्यामुळे पक्ष्यांचा अधिवास पूर्वीपासून बर्‍यापैकी होता. पक्षीनिरीक्षणाची आवड असणारे लोक त्यांच्याकडे येऊ लागले. मग आपण ‘जंगल पर्यटन’ व्यवसाय म्हणून का करू नये? असा विचार त्यांच्या मनात आला. ती कल्पना त्यांनी प्रत्यक्षात आणली आणि आज त्यात त्यांनी मोठं यश मिळवलं आहे. ’’माझ्याकडे येणार्‍या पक्ष्यांनी मला जंगल वाढवण्याची संधी दिली.’’ असं ते आवर्जून सांगतात. निसर्ग जपणुकीचा चांगला विचार मनात ठेवून आपण काम करत राहिलं तर निसर्गही आपली काळजी घेतो, अशी त्यांची दृढ श्रद्धा आहे.
 
जंगल पर्यटनाला सुरुवात केल्यानंतर मिळालेल्या पैशातून त्यांनी आणखी जंगलजमीन विकत घेतली आणि मूळचं १२-१३ एकर असलेलं जंगल आज ३२ एकरांएवढं मोठं झालं आहे. मूळची झाडं टिकवून त्यांनी आणखीही झाडं लावली आहेत. जवळजवळ ८० ते ९० प्रकारची जंगली झाडं इथे पाहायला मिळतात. यात रायवळ आंबा, फणस, जांभूळ, सीता-अशोक, जंगली आवळा, चिंच, किंजळ, हरडा, बेहडा, अर्जुन, कळंब, कदंब, हसाणी, शिवण, कडू कवठ, बिब्बा, चाफा, नागचाफा, आपटा, सागवान, शिवण, पांगारा, काटेसावर अशी इतरत्र क्वचित दिसणारी झाडं इथे जपली गेली आहेत. काही झाडं दीडदोनशे वर्षांपूर्वीची, तर काही झाडं पाचशे वर्षांपूर्वीचीही आहेत. नंदू तांबेंचा स्वत:चा झाडांविषयी बारीक अभ्यास आहे. झाडाच्या सालीची जाडी आणि त्याचा घेर यावरून झाडाचं वय ओळखता येतं. सहा ते आठ मीटर एवढा मोठा घेर असलेली अनेक झाडं इथे पाहायला मिळतात. गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये त्यांनी अडीच ते तीन हजार नवीन झाडं लावली आहेत. सुमारे २१८ पेक्षा जास्त प्रकारचे पक्षी या परिसरात आढळतात. हे जंगल खर्‍या अर्थाने खासगी पक्षी अभयारण्य आहे. नंदू तांबे यांना स्वत:ला पक्षीनिरीक्षणाची आवड आहेच, शिवाय दूरदूरचे पक्षीनिरीक्षक इथे पक्षीनिरीक्षणासाठी येतात. ‘तिबोटी खंड्या’ हे इथलं विशेष आकर्षण आहे. हे जंगल म्हणजे खर्‍या अर्थाने आता ‘टुरिस्ट स्पॉट’ झाला आहे. खूप मोठ्या संख्येने आता पर्यटक आणि निसर्गप्रेमी इथे येतात. त्यांची राहण्याची आणि जेवणाची सोयही केली जाते. नंदू तांबे स्वत: येणार्‍या माणसांना जंगल फिरून दाखवतात. झाडं, पक्ष्यांची माहिती देतात. याकामी त्यांचा भाऊ श्रीकांत तांबे याचीही मदत होते. वासिष्ठी नदीत आढळणार्‍या मगरी हेही इथलं खास आकर्षण आहे. मात्र मुद्दाम सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे जंगल पर्यटन करताना मानवी वावरामुळे जंगली प्राणी आणि पक्ष्यांच्या वावरावर विपरित परिणाम होणार नाही, याची विशेष काळजी घेतली जाते. एकाच वेळी अनेक माणसं जंगलात न्यायची नाहीत, बरीच माणसं असतील तर छोटे छोटे गट करून त्यांना जंगलात न्यायचं, असे काही नियम त्यांनी घालून घेतले आहेत, जेणेकरून तिथल्या प्राणीपक्ष्यांना माणसांचं भय वाटणार नाही. नाहीतर आज अनेक शासकीय अभयारण्यांमध्ये ‘पर्यटकांचा अतिवावर’ ही समस्या बनली आहे. २०११-१२ मध्ये कोकण कृषी विद्यापीठाकडून या जंगलातील जैवविविधतेचा सर्व्हे करण्यात आला आणि या जंगलाला ‘अ’ दर्जा मिळाला.
 
 

 
निसर्ग माणसाला अनंत सेवा पुरवत असतो. निसर्गाची गरज माणसाला शेवटपर्यंत राहील. निसर्गासाठी माणसाने नेमकं काय करावं याबाबत नंदू तांबे यांचे विचार चिंतनीय आहेत. ते म्हणतात, ‘‘निसर्गाला माणसांची मुळीच गरज नाही. निसर्ग जपण्यासाठी माणसाने वास्तविक काहीच करण्याची जरूर नाही. निसर्गातला अवाजवी हस्तक्षेप मात्र थांबवला पाहिजे. ‘काहीही न करणं’ हेच खूप काही करण्यासारखं आहे. नवीन झाडं लावणं हे वरवर चांगलं वाटत असलं तरी गेल्या तीनचारशे वर्षांपूर्वीपासूनचा निसर्गाचा अनमोल ठेवा आपण त्याने भरून नाही काढू शकत. त्यामुळे वृक्षतोड थांबविण्याला पर्याय नाही.’’
 
नंदू तांबे हे खर्‍या अर्थाने जंगल जगलेलं व्यक्तिमत्त्व आहे. कोकणात कधी पर्यटनाला गेलोच तर अथांग समुद्रकिनारे, आंब्या-फणसांच्या बागा, मंदिरं हे सगळं जरूर पाहावं, पण चिपळूणपासून २२ किलोमीटरवर असलेलं शिरवली गावातलं नंदू तांबे यांचं हे ‘खासगी अभयारण्य’ मात्र चुकवू नये!