कॉकेशस पर्वत
 महा एमटीबी  14-Mar-2018
 
कॉकेशस पर्वत युरोप आणि आशिया खंडाची नैसर्गिक सीमा समजली जाते. वायव्य-आग्नेय पसरलेल्या कॉकेशसच्या पश्चिमेस काळा समुद्र, उत्तरेस मॅनिच नदीखोर्‍याचा खोलगट भाग, पूर्वेस कॅस्पियन समुद्र आणि दक्षिणेस इराण व तुर्कस्तान हे देश आहेत. कॉकेशसचा पश्चिमेकडील फाटा काळा समुद्र आणि झॉव्ह यांना विभागून क्रिमिया द्वीपकल्पात गेलेला आहे. पूर्वेकडील फाटा कॅस्पियन समुद्राच्याही पूर्वेकडे इराणच्या उत्तर सरहद्दीवर गेला असून तेथे तो ’कोपेत दा’ नावाने ओळखला जातो.
 
या पर्वताची लांबी सुमारे ११०० किलोमीटर असून रुंदी १०० ते १५० किलोमीटरपर्यंत आहे. सुमारे साडेचार लाख चौ.किमी. एवढ्या विस्तीर्ण प्रदेशात ही पर्वतरांग पसरली आहे. उंचीमुळे हा पर्वत पार करणं कठीण होऊन जातं. हा पर्वत पार करण्यासाठी ‘जॉर्जियन मिलिटरी हायवे’ हा एकमेव रस्ता आहे. परंतु हिमप्रपातामुळे हा रस्ताही बरेचदा बंद ठेवावा लागतो. उत्तर भागात या पर्वताची उंची जास्त आहे. उत्तर भागातील पर्वताला ’ग्रेट कॉकेशस’ म्हणतात तर दक्षिण भागातल्या पर्वताला ’लोअर कॉकेशस’ म्हणतात. नदीखोरी आणि लेसर कॉकेशस या दोहोंनी मिळून बनलेल्या प्रदेशास ’ट्रान्स कॉकेशस’ असेही म्हटले जाते. ग्रेटर कॉकेशस सुमारे १,२०० किमी. लांब व १६० किमी. रुंद आहे. ’लेसर कॉकेशस’ हा कॉकेशस पर्वतश्रेणीचा सर्वांत दक्षिणेकडील भाग असून तुर्कस्तानमध्ये पसरलेले आर्मेनियम पठार व इराणमधील एल्बर्झ पर्वत यांना लागून आहे. आरागात्स हे ४,०९० मी. उंचीचे लेसर कॉकेशसमधील सर्वोच्च शिखर आहे. ‘माऊंट एल्ब्रस’ हे या पर्वतातलं सर्वात उंच शिखर असून त्याची उंची सुमारे १८ हजार फुटांपर्यंत आहे. या पर्वतावर सुमारे दोन हजार हिमनद्या आहेत.
 
 
 
 
फार प्राचीन काळापासून मानवाने कॉकेशसमधील मार्गांचा उपयोग केल्याचे दाखले मिळतात. आजही कॉकेशस भाग हा लोक व भाषा यांचे संग्रहालय समजला जातो. जॉर्जियामधील आयबेरियन संस्कृती व आर्मेनिया-तुर्कस्तान यामधील आर्मेनियन संस्कृती या कॉकेशस परिसरात इ. स. पूर्वीच उदयास आल्या आणि नष्ट झाल्या. रोमन-पार्शियन, बायझंटिन-अरब, ऑटोमन, पर्शियन-रशियन यांच्यामधील अडसर म्हणून कॉकेशसची प्रसिद्धी होती. ग्रीक, रोमन, अरब वर्चस्वानंतर हा बहुतेक भाग एकोणिसाव्या शतकात रशियाच्या अधिपत्याखाली आला. सोने, चांदी, मँगेनीज, जस्त, तांबे, टंगस्टन, मॉलिब्डेनम, कोळसा, पेट्रोलियम ही कॉकेशसमधील खनिजसंपत्ती होय.
 
उत्तम मँगेनीजचा जगातील सर्वात मोठा साठा जॉर्जिया राज्यात आढळतो. याशिवाय कॉकेशसमध्ये असंख्य औषधी पाण्याचे झरे आढळतात. युरोपातील थंड हवामान रोखून धरणारा हा भिंतीसारखा पर्वत असून हवामानातील विविधता हे कॉकेशसचे वैशिष्ट्य होय. वाळवंटी हवामानापासून थंड हवामानापर्यंत सर्व प्रकार यामध्ये आढळतात. हवामानाप्रमाणेच येथील वनस्पती व प्राणीजीवन विविध असून विपुल आहे. रशियातील सर्वांत मोठी जंगलसंपत्ती ग्रेटर कॉकेशसमध्ये आढळते, तर डागेस्तानमधील मोठा भाग संपूर्ण वृक्षविरहित आहे. उत्तरेकडील स्टेप भागात व उंच भागात गवत, कोल्चीसमध्ये दलदली कच्छ वनश्री तर हवामानानुसार निरनिराळ्या भागांत ऍश, बर्च, जूनिपर, फर, स्प्रूस, बीच, ऍस्पेन इ. वनस्पती आढळतात. कॉकेशसमधील जंगलात अस्वल, एल्क, खोकड, मार्टीन, बॅजर, लिंक्स, लांडगा, हरिण, चित्ता, रानमेंढा हे प्राणी आढळतात. कॉकेशस पर्वतामध्ये खर्‍या अर्थाने निसर्गातील विविध रूपांचे एकत्रीकरण झाले आहे.