राज्यसभेच्या कामकाजावरून व्यंकय्या नायडू नाराज
 महा एमटीबी  13-Mar-2018
 
 
 
नवी दिल्ली : संसदेचे अधिवेशन सुरु होऊनही गेले सात दिवस राज्यसभेचे काहीच कामकाज होऊ न शकल्यामुळे राज्यसभेचे सभापती उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू अस्वस्थ झाले आहेत. आज शून्य प्रहरात नायडू यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त करत सभागृहाती सदस्यांना कामकाज चालू देण्याविषयी कळकळीची विनंती केली. माझ्याकडे विरोधी पक्षांनी काही नोटीस पाठवल्या आहेत, त्यावर सरकारनेही चर्चेची तयारी दाखवली आहे, मात्र सभागृहाचे कामकाजच चालत नसल्यामुळे काहीच होऊ शकत नसल्याचे त्यांनी सांगितले.
  
 
या सभागृहाचे काही नियम आहेत. कोणीही आपल्या जागेवरून बसून काही बोलू नये, फलक घेऊन कोणीही हौद्यात उतरू नये, कोणत्याही सदस्याने अध्यक्षांच्या परवानगीशिवाय बोलू नये अशा विविध नियमांची आठवण नायडू यांनी सभागृहातील सदस्यांना करून दिली. तसेच सर्वच पक्षांच्या खासदारांना सभागृहाचे कामकाज चालू देण्याविषयी विनंती केली.
 
 
सर्वांनीच  नियमांचे पालन केले पाहिजे. केंद्र सरकारची ही जबाबदारी आहे की त्यांनी सभागृहाचे कामकाज नीट चालेल याकडे लक्ष द्यावे. त्याचबरोबरीने विरोधी पक्षनेत्याचीही तितकीच जबाबदारी आहे की त्यांनीही सरकारला या बाबतीत सहकार्य केले पाहिजे असे नायडू यांनी सांगितले. त्यामुळे सभागृहनेता, संसदीय कामकाज मंत्री व विरोधी पक्षनेते या तिघांनाही आपली कळकळीची विनंती आहे की त्यांनी कामकाज चालू द्यावे असे नायडू यावेळी म्हणाले.