२०२५ पर्यंत भारत होणार 'टीबी मुक्त' : पंतप्रधान मोदी
 महा एमटीबी  13-Mar-2018

एन्ड टीबी परिषदेचे आजपासून उद्घाटन
नवी दिल्ली :
'भारतामध्ये क्षयरोगाचे (टीबी) अनेक रुग्ण असून मुख्यत: देशातील गरीब नागरिकांनाच या रोगाची जास्त लागण झाल्याचे दिसून येते. त्यामुळे देशातील गरिब नागरिकांना सुखी बनवण्यासाठी टीबीला संपूर्णपणे नष्ट करणे अनिवार्य आहे' असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले आहे. टीबी मुक्त भारतसाठी नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या 'एन्ड टीबी' परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

'देशामध्ये टीबीग्रस्त रुग्णांमध्ये सर्वसामान्य नागरिकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे एन्ड टीबी ही मोहिमे देशातील सर्वसामान्य नागरिकांनाच जोडली गेलेली आहे. देशातील नागरिकांना टीबीपासून मुक्ती मिळावी यासाठी योग्य उपचार, सल्ला आणि औषधे उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. सध्या जगभरातून टीबी संपूर्णपणे नष्ट करण्यासाठी अनेक देशांनी २०३० पर्यंतची अंतिम तारीख ठरवली आहे. परंतु भारत सरकारने येत्या २०२५ पर्यंत 'टीबी मुक्त भारत' करण्याचा संकल्प केला असून त्या दिशेने अनेक प्रयत्न देखील सुरु केले आहेत' असे ते म्हणाले.याच बरोबर या मोहिमेमध्ये राज्य सरकारांची देखील अत्यंत महत्त्वाची भूमिका असून त्यांनी देखील यासाठी सक्रीय प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले. प्रत्येक राज्य सरकारने टीबी मुक्त भारतसाठी स्वातंत्र्य संकल्पना आणि योजना राबवाव्यात, असे आवाहन देखील मोदींनी यावेळी केले. यानंतर सध्या देशभरात भारत सरकार टीबीवरील उपचारांसंबंधी करत असलेल्या अनेक प्रयत्नांविषयी यावेळी उपस्थितांना माहिती दिली.