संघाच्या ८३ हजार शाखांमधून चालते राष्ट्रप्रेमी समाजनिर्मितीचे कार्य : नाना जाधव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Mar-2018
Total Views |
 
 
 
पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ९२ वर्षांच्या प्रवासात देशातील ६० हजारांहून अधिक गावांमधून ८३ हजारांहून अधिक संघ शाखांव्दारे राष्ट्रप्रेमी समाजनिर्माणाचे कार्य करत आलेला आहे. राष्ट्रव्यापी जनसंघटन असलेला संघ समाजातील तेढ नष्ट करणे, सकारात्मकतेची व्याप्ती वाढविणे व राष्ट्रीय विचारांच्या प्रसार अधिक व्यापक करण्यासाठी यापुढे अधिक समर्पित राहील आणि संघाच्या याच भूमिकेशी सुसंगत पश्चिम महाराष्ट्र प्रांताने मागील वर्षभरात पूरक असे उपक्रम राबविले आहेत, अशी माहिती रा.स्व.संघ पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संघचालक सुरेश तथा नाना जाधव यांनी दिली.
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची बैठक ९ ते ११ मार्च २०१८ दरम्यान नागपूर स्थित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय रेशीमबाग येथे झाली. देशभरातील विविध क्षेत्रातील १ हजार ४६१ हून अधिक संघ कार्यकर्ते त्यात उपस्थित होते. त्यानंतर पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते.
 
याप्रसंगी संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे नवनियुक्त सह प्रांत संघचालक प्रताप भोसले, कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव, प्रांत कार्यकारिणीचे सदस्य व माजी प्रांत कार्यवाह विनायक थोरात, संघाचे पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, कार्यवाह महेश करपे आदींची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित संघाच्या अधिकाऱ्यांनी संघाच्या देशपातळीवरील कार्यस्थितीसह पश्चिम महाराष्ट्रातील तसेच विशेषतः पुणे महानगरातील संघकार्याचा विस्तार व कामांचा आढावा विस्ताराने मांडला.
 
संघ शाखांमध्ये सातत्याने वाढ
 
संघात येणाऱ्या तरूणांची संख्या वाढल्यामुळे स्वाभाविकपणे संघ शाखांमध्ये देखील वाढ झाली आहे. त्याचबरोबर नियमित तसेच नैमित्तिक उपक्रम यांच्यात सातत्याने वाढ होत आहे. २०१७-१८ या कालावधीत रा.स्व. संघाच्या देशभरातील दैनंदिन शाखांची संख्या ५८ हजार ९६७ इतकी झाली आहे. त्याचप्रमाणे साप्ताहिक शाखा (साप्ताहिक मिलन) १६ हजार ४०५ असून संघमंडळी (मासिक शाखा) ७ हजार ९७६ इतक्या आहेत अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
 
विशेष म्हणजे देशभरातील संघाच्या स्वयंसेवकांद्वारे चालविल्या जाणाऱ्या सेवाकार्यांंची संख्या तब्बल पावणे दोन लाखांपर्यंत पोहोचली आहे. या सर्व माध्यमातून संघाचा विचार सर्वदूर परिणामकारकपणे पोहोचतो आणि रूजतो आहे. त्याचा परिणाम म्हणून नागरिकांमध्ये विशेषतः तरूणांमध्ये संघाची स्वीकारार्हता वाढते आहे व त्याचा एकूण प्रभाव राष्ट्रजीवनावर दिसू लागलेला आहे असे जाधव यावेळी म्हणाले.
 
भारतीय भाषा संवर्धनाचा प्रस्ताव एकमुखाने पारित
 
संघाच्या प्रतिनिधी सभेत पारित केल्या जाणाऱ्या विविध ठरावांकडे संपूर्ण देशाचे लक्ष असते. यावेळी सभेने भारतीय भाषांच्या संवर्धनासाठीचा ठराव पारित केला आहे. भाषा ही कोणत्याही व्यक्ती आणि समाजाची ओळख म्हणून एक महत्त्वाचा घटक आहे. तसेच ती त्या संस्कृतीचा जिवंत झरा असते, असे या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेचे मत आहे. देशात प्रचलित असणाऱ्या विविध भाषा आणि बोली ह्या आपली संस्कृती, उदात्त परंपरा, उत्कृष्ट ज्ञान आणि विपुल साहित्य, या गोष्टींचे कायमस्वरूपी जतन करण्यासाठी आणि त्याबरोबरच वैचारिक नवनिर्मितीसाठीही अत्यावश्यक आहेत. विविध भाषांमध्ये उपलब्ध असलेल्या लिखित साहित्यापेक्षा किती तरी पटीने अधिक ज्ञान हे गीते, म्हणी-वाक्प्रचार, तसेच लोककथांच्या माध्यमातून मौखिक परंपरेच्या रूपात सामावलेले असते. आज विविध भारतीय भाषा आणि बोलींच्या कमी होत जाणाऱ्या व्यावहारिक वापरामुळे आणि उपयोगामुळे त्यातील अनेक शब्द लुप्त होत आहेत. त्यांच्या जागी येत असलेला विदेशी भाषांमधील शब्दांचा पर्याय हे एक मोठे आव्हान म्हणून समोर उभे ठाकले आहेत. अनेक भाषा आणि बोली आज लुप्त झाल्या आहेत, तर इतर काहींचे अस्तित्व संकटात आहे. देशातील विविध भाषा आणि बोली यांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी शासकीय पातळीवर, तसेच धोरण निश्चिती करणारी मंडळे आणि स्वयंसेवी संस्थांसह सर्व समाजाने शक्य ते सर्व प्रयत्न केले पाहिजेत, असे मत ठरावात मांडण्यात आले आहे. 
 
ठरावातील काही ठळक मुद्दे - 
 
१. देशभरात प्राथमिक शिक्षण मातृभाषा किंवा अन्य कोणत्याही भारतीय भाषेत झाले पाहिजे. हे उद्दिष्ट समोर ठेवून भाषा संरक्षकांनी आपले मन घडवावे. तसेच, त्याच दिशेने सरकारांनी योग्य धोरणे आखून नियम व व्यवस्था निर्माण करावी.
 
२. तांत्रिक तसेच आयुर्विज्ञानासह उच्चशिक्षणाच्या स्तरावरील सर्व विद्यापीठात शिक्षण, अभ्याससामग्री तसेच परीक्षांचा पर्याय भारतीय भाषांमध्ये सुलभपणे उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
 
३. राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट), तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे भारतीय भाषांमध्ये परीक्षा घेण्यास सुरुवात झाली आहे, हे स्वागतार्ह पाऊल आहे. याच्याच बरोबरीने इतर प्रवेशपरीक्षा व स्पर्धापरीक्षा, ज्या अद्यापही भारतीय भाषांमध्ये आयोजित केल्या जात नाहीत, त्यातही हा पर्याय उपलब्ध करून दिला गेला पाहिजे.
 
४. सर्व शासकीय तसेच न्यायालयीन कामांमध्ये भारतीय भाषांना प्राधान्य दिले गेले पाहिजे. याचबरोबर शासकीय आणि खासगी क्षेत्रांतील नेमणुका, पदोन्नती व सर्व प्रकारच्या कामकाजात इंग्रजी भाषेला दिले जाणारे प्राधान्य सोडून भारतीय भाषांना प्रोत्साहन दिले गेले पाहिजे.
 
पश्चिम महाराष्ट्र प्रांतातील संघ कार्यस्थिती 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतात कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे महानगर, पुणे जिल्हा, नगर, नाशिक आणि सोलापूर या ७ शासकीय जिल्ह्यांचा समावेश होतो. येथे मागील वर्षभरात संघ कामाची व्याप्ती खालीलप्रमाणे सांगता येईल. २०१७-१८ या कालावधीत रा.स्व. संघ पश्चिम महाराष्ट्र प्रांतात दैनंदिन शाखांची संख्या ७०५ आहे, साप्ताहिक शाखा (साप्ताहिक मिलन) ५९३ तर मासिक शाखा (संघमंडळी) १२० आहेत.
रा.स्व. संघ राष्ट्रव्यापी जनसंघटन आहे. समाजातील तेढ कमी करणे, सकारात्मकतेची व्याप्ती वाढविणे व राष्ट्रीय विचारांचा प्रसार अधिक व्यापक करण्यासाठी यापुढे अधिक समर्पित व प्रयत्नांची दिशा निश्चित करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने पश्चिम महाराष्ट्र प्रांताने मागील वर्षभरात काही पूरक असे उपक्रम राबविले आहेत. ज्यात निर्मलवारी, पंढरपूर येथे पार पडलेले संत-संमेलन आणि व्याख्यानमला संयोजकांची परिषद या उपक्रमांचा विशेषत्वाने उल्लेख करता येईल.
 
१. निर्मलवारीच्या माध्यमातून पंढरपूरला जाणारी आषाढी वारी अधिक निर्मल कशी होईल यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न झाले. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गावर निर्मलवारीच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर मागील वर्षात निर्मलावारीच्या उपक्रमाची नाशिक जिल्ह्यातही सुरवात झाली आहे. 
 
२. दि. १८ जानेवारी २०१८ रोजी पंढरपूरमध्ये संत संगमाचे आयोजन करण्यात आले होते. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत हे संमेलन झाले. राज्यभरातील प्रमुख ३७ संतांसह सुमारे ३२७ धर्माचार्य या संत संगमात पूर्णवेळ सहभागी झाले होते. संतशक्तीने समाजातील कुटुंब व्यवस्था बळकट करण्यासाठी व गावागावांत सामाजिक सद्भाव निर्माण करण्यासाठी संतांनी मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा सरसंघचालकांनी या कार्यक्रमातून व्यक्त केली.
 
३. समाज घटकांतील परस्पर तेढ संपविण्यासाठी, त्यांच्यात सकारात्मकता वाढविण्याच्या दृष्टीने केल्या जाणाऱ्या महत्वाच्या प्रयत्नांमध्ये संवादाचे उत्तम व्यासपीठ निर्माण करणाऱ्या व्याख्यानमाला मोठी भूमिका बजावतात, असा संघाचा विश्वास आहे. त्यादृष्टीने या संवाद व्यासपीठांचा दर्जा वाढावा या हेतूने विविध व्याख्यानमाला संयोजकांची परिषद १८फेब्रुवारी २०१८ रोजी आयोजित करण्यात आली होती. स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, प्रचार विभाग (पश्चिम महाराष्ट्र प्रांत) यांच्या संयुक्त विद्यमाने कॅप्टन जी.एस.कदम सभागृह, स्वातंत्र्यवीर सावरकर सदन, निगडी प्राधिकरण येथे ही परिषद संपन्न झाली. त्यास पश्चिम महाराष्ट्र प्रांतातून ३० हून अधिक व्याख्यानमालांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 
 
पुणे महानगरांच्या सीमावर्ती भागात संघकामाच्या विस्ताराला वेग
 
यावेळी जाधव यांनी पुण्यातील संघकामाचीही माहिती दिली. पुणे महानगरातील संघ कामाचा विचार केला असता पुणे महानगराच्या सीमावर्ती भागात संघ कामाने गती घेतली आहे. महानगराच्या सीमावर्ती भागात ज्यात उरळी कांचन, लोणी काळभोर, नऱ्हे, किरकटवाडी, वाघोली, बालेवाडी, मारूंजी यांसह चारही दिशांच्या सीमावर्ती भागात संघ पोहोचला असून मागील वर्षभरात तिथे अनेकविध उपक्रम राबविले जात आहेत.
 
पुणे महानगरातील इतर कार्यक्रम –
 
- पुणे महानगरात नागरिकांचा संघकार्यातील सहभाग वाढतो आहे. सामाजिक रक्षाबंधनानिमित्त झालेल्या "प्लास्टिक व ई-कचरा" संकलनाच्या यशस्वी व पथदर्शी उपक्रमानंतर मागील वर्षी (७ ते १३ ऑगस्ट २०१७ दरम्यान) रद्दी संकलन उपक्रम हाती घेण्यात आला. या उपक्रमात घरोघरी संपर्कातून रद्दी एकत्र करण्यात आली. एकत्र केलेली रद्दी विकून गरजू सामाजिक संस्थांना भरीव अशी आर्थिक मदत करण्यात आली.
 
- २ व ३ डिसेंबर २०१७ रोजी पुणे महानगरात समरसता विषयातील एका अखिल भारतीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात देशभरातील ३३ प्रातांमधून ७० महिला आणि पुरूष कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. बैठकीत देशभरातील विविध प्रातांमधून सुरू असलेल्या समरसता कार्यांबाबतच्या माहितीचे आदानप्रदान करण्यात आले. 
 
- पुणे महानगरातील सातही भागांमध्ये विविध वयोगटातील स्वयंसेवकांच्या शिबिरांचे आयोजन करण्यात आले. त्यात सुमारे पाच हजार जणांहून अधिक शिबिरार्थींनी सहभाग घेतला होता असे जाधव यांनी यावेळी सांगितले.
 
@@AUTHORINFO_V1@@