शेतकऱ्यांच्या नावावर शहरी माओवाद्यांचा उन्माद मोर्चा
 महा एमटीबी  13-Mar-2018
 

 
 
 
मुंबई :  लाखो शेतकर्‍यांचा मोर्चा मुंबईमध्ये आला. चार दिवस मुंबईमध्ये या मोर्चाबद्दल सहानुभूतीची त्सुनामी लाटच आली. तीच लाट माझ्याही हदयात होती. प्रत्यक्ष आझाद मैदानात पाऊल ठेवले, तेव्हा ते १४ ते १५ हजार लोक जमेल तसे गटातटाने बसलेले. त्या गटाला कवच केलेले किंवा त्यांच्यामध्ये बसलेले प्रत्येकी एक किंवा दोन टापटीप पोषाखातले पुरुष आणि स्त्रिया. अरे, यांना कुठे तरी पाहिलेले. हे तर मुंबई किंवा इतर शहरी भागात विद्रोही कविता, शाहिरी किंवा विचार मांडणारे माझे शहरी दोस्त होते. मोर्चामध्ये सामील झालेल्या वेगवेगळ्या गटाशी मी बोलले होतेच. त्यापैकी शेतकरी कुणीच नव्हते. होते ते शेतमजूर वनवासी बांधव. त्यामुळे मी तरी या मोर्चाला शेतकर्‍यांचा मोर्चा म्हणणार नाही.
 
 
 
या मोर्चात शहरातले माओवादी विचारसरणीचे लोक काय करत होते? या सर्वांना या ना त्या विद्रोही कार्यक्रमात, मोर्चात ती विचारसरणी मांडताना मी पाहिले होते. आज त्यांच्या डोक्यावर लाल टोपी होती. त्यांच्यामधील एकीला विचारले, ’’तू इथे कशी?’’ यावर चपापत ती म्हणाली, ’’छे, छे! आम्ही तर असेच आलो आहोत.’’ आम्ही तर असेच आलो आहोत म्हणणारेच जास्त लोक आझाद मैदानात होते. याच मोर्चात एक अतिशय वृद्ध लोकांचा गट होता. ते सांगत होते, ’’आम्हाला कसली जमीन? आम्ही मजुरी करतो. इथे येऊन जमीन मिळेल म्हणून आलो. त्यांच्याशी बोलत असतानाच एक चांगल्या पोषाखातली युवती अरेरावीने अडवत म्हणाली, ’’काय चालू आहे? त्यांना काय विचारता?’’ त्यावेळी तापलेले ऊन, शेतकर्‍यांच्या नावाने वनवासी बांधवांना फसवून आणले म्हणून हा मोर्चा काढणार्‍या लाल बावट्यांवाल्यांबद्दलचा राग माझ्या डोक्यात गेला होता. त्यात त्या मुलीची बोलण्याची उर्मट पद्धत. तिला विचारले,’’तू कोण विचारणारी? तू शेतकरी आहेस का?’’ तोपर्यंत तिच्या सख्याही जमल्या. तिच्या सारख्याच अप टू डेट. त्यांच्यातली एकजण सारवासारव करत म्हणाली, ’’या आमच्या सरपंचताई कम्युनिस्ट पक्षातून सरपंच झाल्यात. गरीब निरक्षर गाववाल्यांना काय विचारता आम्हाला विचारा. आम्ही कार्यकर्त्या आहोत.’’ पुढे काही तरुण होते.
 
 
 
लाल टोपी घातलेले पण टिशर्ट, टॅ्रक्स वगैरे पोषाख. आतापर्यंत तर कळून चुकले होते की हा मोर्चा गरीब शेतकर्‍यांचा नव्हताच. तरीही त्यांना विचारले, ’’तुम्ही मोर्चात आलात?’’ यावर त्यांचे म्हणणे आम्ही कम्युनिस्ट पक्षाच्या स्टुडंट फ्रंटचे कार्यकर्ते आहोत. आम्ही नोकरी करतो. पण मोर्चाला आलो. वेगवेगळ्या नावाने डाव्या विचारधारेचे समर्थन करणारे, नक्षली चळवळींना हक्काची चळवळ म्हणून येनकेनप्रकारे समर्थन करणारे डाव्या विचारसरणीचे तमाम शहरी कार्यकर्ते मला दिसले. ज्या गावचा सरपंच कम्युनिस्ट पक्षाचा आहे, त्या ठराविक भागातून म्हणजे डहाणू, नाशिकच्या सुरगणा, त्र्यंबक भाग तसेच शहापूर आणि उरण पट्ट्यातील वनवासी बांधवांना तिथे डाव्यांनी आणले होते. या गरीबभोळ्या जीवांना वनजमिनी तुमच्या नावावर करून देतो म्हणून आमिष दाखवून आणले होते. याहीपेक्षा दुःखद गोष्ट हीच की, शहरी भागातले सुशिक्षित डावे कार्यकर्ते झाडून या मोर्चात शेतकरी म्हणून सामील झाले होते. शेतकर्‍यांचा मोर्चा शेतकर्‍यांचा मोर्चा म्हणून संपूर्ण महाराष्ट्राकडून या डाव्यांनी आपली पाठ थोपटवून घेतली. इतका खोटारडेपणा? शेतकर्‍यांच्या नावावर आपल्या कार्यकर्त्यांना मोर्च्यात उतरवून या डाव्यांनी महाराष्ट्राचा विश्वासघात केला आहे. शोषित वंचित जीवांच्या दुःखाचा बाजार मांडून त्यामध्ये आपल्या रक्तलांछित अभद्र इतिहासात आणखी एक अभद्र लबाडीचा डाव साधला आहे.