आझाद मैदानावरील आजचे वातावरण
 महा एमटीबी  13-Mar-2018
 
 
 
 
 
 आपल्या मागण्यांसाठी आझाद मैदानावर आज हजारो शेतमजूर, वनजमीन कसणारे शेतकरी राज्याच्या निरनिराळ्या भागातून आले होते. ज्या लाल बावट्याखाली हा सगळा समाजगट इथे आला, त्यांना मागण्या मान्य होण्याचे, शेतमालाला हमीभाव मिळवून देण्याचे आमिष दाखवून इथे येण्यासाठी प्रवृत्त केल्याचे जमीन कसणार्‍यांच्या बोलण्यावरून, वागणुकीवरून दिसत होते. बर्‍याच लोकांच्या मागण्या या कसत असलेली जमीन स्वतःच्या नावावर करण्याच्याच होत्या. सलग सात दिवस पायपीट केल्याने, वर्षानुवर्षे जमीन कसत असूनही आपले हक्क न मिळाल्याने, शेतमालाला भाव न मिळाल्याने, उत्पन्नाचे स्थिर साधन नसल्याने भवितव्याच्या चिंतेने ग्रासल्याने अनेकांच्या चेहर्‍यांवर दुःख, दैन्य, त्रासाचे भाव दिसत होते. शिवाय गेल्या सात दिवसांत जे हाल सोसले, त्यानंतर आज आझाद मैदानात मुंबईकरांनी केलेल्या भोजन, अल्पोपहार, पाण्याच्या व्यवस्थेने आनंदी झालेले चेहरेही पाहायला मिळाले.
 
 
जवळजवळ सर्वच शेतकर्‍यांच्या अंगावर परिस्थितीच्या अपरिहार्यतेमुळे अतिशय हलाखीची स्थिती दाखविणारे कपडे होते तर कित्येकांच्या डोळ्यांत आपल्या समस्या सोडवल्या जाण्याची आशा पल्लवित झाल्याचेही दिसले. पण स्वामीनाथन आयोग लागू करण्याच्याबाबतीत प्रश्न विचारल्यानंतर अनेकांनी हा आयोग माहिती नसल्याचे सांगितले तर कित्येकांनी हा आयोग जे शेतकरी आहेत, त्यांच्या भल्यासाठी लागू केला जावा, असे मत व्यक्त केले. उन्हाळ्याचे दिवस असल्याने डोक्यावर कडक ऊन येत असल्याने, घामाने अंग माखत असल्याने कितीतरी शेतकर्‍यांनी आपल्याबरोबर आणलेल्या शाली, चादरी, पाण्याच्या बॉक्सचे रिकामे खोके सावलीसाठी डोक्यावर घेतले होते. एकूणच आझाद मैदानावर आलेल्या शेतकर्‍यांचे जथ्थे हे त्रासलेले, समस्यांनी ग्रस्त असलेले, त्यांच्या सोडवणुकीसाठी सरकारने निर्णय घ्यावा, अशा आशेवर असलेलेच होते.