शानभाग विद्यालय व मनशक्ती प्रयोग केंद्रातर्फे विद्यार्थी आणि पालक यांना मार्गदर्शन
 महा एमटीबी  13-Mar-2018
जळगाव:
विवेकानंद प्रतिष्ठान संचालित कै. श्रीमती ब. गो. शानभाग विद्यालय, सावखेडा आणि मनशक्ती प्रयोग केंद्र, लोणावळा यांचेतर्फे सातवी ते नववीच्या विद्यार्थी आणि पालकांसाठी विशेष पालकसभा झाली. सुजाण पालकत्व आणि विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकास या विषयावर एकाचवेळी वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेण्यात आल्या.
 
 
मनशक्तीच्या साधक कल्पना बोरोले पालकांना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, आई वडील होणे खूप सोपे आहे परंतु चांगले पालक होणे त्यामानाने खूप कठीण आहे. वयाप्रमाणे विद्यार्थ्यांच्या मेंदूचा विकास होत असतो. यात वयाच्या ७ व्या वर्षापर्यंत उजव्या मेंदूचा म्हणजेच भावनिक विकास होतो, ८ ते १४ वर्षापर्यंत डाव्या म्हणजेच मानसिक विकास होत असतो तर १५ ते २१ वर्षापर्यंत दोन्ही म्हणजेच शारीरिक विकास होत असतो हे समजून सांगतांना त्यांनी लिओनार्डो दि व्हिंची, राजा रविवर्मा, सचिन तेंडूलकर यांच्यासह अनेकमहान व्यक्तिमत्त्वांचे दाखले दिले. अभ्यास घेतांना त्यांच्या अडचणी जाणून घ्या, भावनिक नाते निर्माण करा, संवाद करतांना मित्र म्हणून करा, मुलांना आशीर्वाद देवून त्यांना भारताच्या आणि स्वतःच्या भविष्यासाठी जागृत करा. म्हणूनच विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासामध्ये पालकांचे योगदान फार महत्वाचे आहे हे त्यांनी अनेक उदाहरणे देवून स्पष्ट केले.
 
 
साधक कल्याणी खांदे यांनी व्यक्तिमत्वाचा विकास कसा करण्यासाठी विविध युक्त्या सांगितल्या. आपली शक्ती मोबाईल, गेम, व्हाटस अप व इंटरनेटवर न घालविता आपले एक निश्चित ध्येय ठरवा. असा सल्ला देत विज्ञानाच्या अभ्यासातून स्वामी विज्ञानानंद यांनी मांडलेले ‘न्यू वे’ तत्वज्ञान त्यांनी समजावून सांगितले.
 
 
कॉम्पुटराइज चाचण्यांची माहिती सांगितली व शंका निरसनही केले. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन मनोज पाटील आणि सौ दीपिका चौधरी यांनी केले पाहुण्यांचे स्वागत मुख्याध्यापिका अंजली महाजन यांनी केले.