उत्तराखंडमध्ये बस अपघात, १३ नागरिकांचा मृत्यू
 महा एमटीबी  13-Mar-2018
 
 
 
 
 
 
अल्मोडा : उत्तराखंडमधील अल्मोडा जिल्ह्यात आज एका बस दुर्घटनेत १३ नागरिकांचा मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे. तसेच या अपघातात १२ अन्य नागरिक जखमी झाले असल्याची माहिती सध्या मिळत आहे. जखमी नागरिकांवर जवळच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे, तसेच घटनास्थळी बचाव कार्य कार्यरत झाले आहे.
 
 
 
देघाटपासून रामनगर येथे ही बस प्रवास करत होती. टोटाम येथे ही बस दरीत कोसळली. या बसमध्ये जवळपास २४ प्रवासी होते ज्यामधील १३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाने घटनास्थळी रुग्णवाहिका पाठवून परिस्थिती आटोक्यात आणली आहे. मात्र अजून देखील बचावकार्य सुरु आहे. भतरोजखान-रामनगर मार्गावर कालीधार-मुहानाच्या जवळ हा अपघात घडला आहे.
 
 
 
या घटनेवर उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग यांनी दुख: व्यक्त केले आहे. बचाव कार्यात कुठलाही हलगर्जीपणा करू नका असे आदेश त्रिवेंद्र सिंग यांनी दिले आहे. तसेच उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनी देखील या घटनेवर दुख: व्यक्त केले आहे.