खेड्याकडे नेणारा सेल्वाकुमार...
 महा एमटीबी  13-Mar-2018
 

 
शेतीतून नफा कमावला जातो, यावर आज बरेच जण विश्वास ठेवणार नाही. पण, योग्य मेहनत घेतली तर शेती ही फक्त नफा कमावणारी नव्हे, तर रोजगाराची संधी निर्माण करणारीही व्यवस्था होऊ शकते, हे सिध्द केलंय सेल्वाकुमार यांनी...
 
शेती हा आतबट्‌ट्याचा व्यवहार झाला आहे. शेतीत आता पूर्वीसारखा राम उरला नाही, ही वाक्यं हल्ली सतत कानी पडत असतात. लहरी हवामान, शेतमालाला न मिळणारा हमीभाव यांसारख्या गोष्टींनी हा समज तर अजून दृढ केला. पण, शेती हा व्यवसाय आहे. त्याच्याकडे हल्ली आपण आर्थिकदृष्ट्या कमी आणि राजकीयदृष्ट्या जास्त पाहतो. शेती हा व्यवसाय नफ्यातही चालतो. त्यासाठी फक्त मेहनतीची नव्हे, तर योग्य मेहनतीची गरज असते. शेतीतून फक्त नफा नाही, तर रोजगार निर्मितीही होऊ शकते, हे सिद्ध केलंय कोईम्बतूरच्या सेल्वाकुमार वरधराजन यांनी. सेल्वाकुमार यांचे काम तसे साधे, पण कमालीचा नफा देणारे. सेल्वाकुमार यांनी शेतकरी आणि ग्राहक यांच्यातली दरी मिटवली. यामुळे शेतकर्‍यांना आपल्या उत्पादनासाठी योग्य भाव तर मिळालाच, पण ग्राहकांना वाजवी दरात चांगल्या दर्जाच्या वस्तू मिळाल्या.
 
सेल्वाकुमार यांना शाळेपासून शेतीच्या कामात रस होता. सेल्वाकुमार यांचे आजोबा पिकवलेल्या भाज्या मंडईत विकत. मंडईत १ किलो टोमॅटोला ८ रुपये भाव मिळायचा, तो थेट ग्राहकांना विकल्यास १२ रुपये भाव मिळायचा. सेल्वाकुमार स्वतः दारोदारी जाऊन आपल्या शेतातली भाजी विकत. सेल्वाकुमार यांनी कला विभागात पदवी मिळवल्यानंतर व्यवस्थापन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आणि बंगळुरूमध्ये नोकरी धरली. या काळात त्यांचे लग्न झाले आणि त्यांना मुलगी झाली. त्यांची मुलगी दोन वर्षांची झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मुलीला बाहेरचे दूध देण्यास सांगितले. सेल्वाकुमार यांच्या पत्नीने काही दिवस बाहेरचे दूधही सुरू केले, पण ते भेसळयुक्त असल्याचे त्यांच्या पतीला सांगितले. आपल्या मुलीलासुद्धा शुद्ध दूध मिळावे म्हणून त्यांनी विचार केला आणि त्यातून उभा राहिला ‘लेमॅन ऍग्रो’चा डोलारा. ‘लेमॅन ऍग्रो’ची त्रिसूत्री म्हणजे शेतकर्‍यांची प्रगती, ग्रामीण युवकांना रोजगार आणि शहरी ग्राहकांचा फायदा. यानुसार सेल्वाकुमार परत कोईम्बतूरला आले आणि शेतीला सुरुवात केली. त्यांनी काही शेतकर्‍यांना हाताशी घेतले. सेल्वाकुमार यांच्या संस्थेतून भाज्या आणि दुग्धजन्य पदार्थ शहरी भागातल्या ग्राहकांना घरपोच विकले जातात. ज्या वस्तू सेल्वाकुमार यांच्याकडून विकल्या जातात, त्या नाशवंत असतात. आणि या पदार्थात हल्ली कमालीची भेसळ आढळते. ही गोष्ट हेरून सेल्वाकुमार सर्व भाज्या सेंद्रिय पद्धतीने पिकवतात. शहरी मध्यमवर्गीय पैसा खर्च करण्यास तयार असतो, पण वाजवी दरात योग्य पदार्थ त्यांना मिळत नाही आणि त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. ही उणीव कमी करण्यात सेल्वाकुमार यांना यश आले.
 
आज शहरात एक पदवीधर तरुण सुरुवातीस १०-१५ हजारांची नोकरी करतो. पण, सेल्वाकुमार यांच्याकडे १७ युवक काम करतात आणि त्यांना महिना ३५ हजार रुपये पगार मिळतो. त्यांचे काम साधे, सरळ आहे. सेल्वाकुमार त्यांना दुचाकी देतात. सकाळी चार तास आणि संध्याकाळी तीन तास हे युवक या दुचाकीवरून शेतमालाची विक्री करून येतात. मधल्या काळात शेतीची कामे करतात. खरा भारत खेड्यात वसतो अशी गांधींची धारणा होती म्हणून ते म्हणत की, ‘‘खेड्याकडे चला.’’ कारण, शहरांवर जर लोकसंख्येचा ताण आला, तर सार्वजनिक सेवांवर ताण येतो. गांधींची ’खेड्याकडे चला’ ही संकल्पना सेल्वाकुमार यांनी यशस्वी करून दाखवली. सध्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील युवकांपुढे मोठ पेच आहे. रोजगार नसल्यामुळे ते संभ्रमात आहेत. अशा युवकांनी सेल्वाकुमारचा आदर्श घेणे गरजेचे आहे.
 
 
 
 
- तुषार ओव्हाळ