झांकी हिंदुस्थान की...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Mar-2018
Total Views |


ज्ञान प्रबोधिनीच्या गुरुकुलातले मातृभूमी परिचय शिबीर म्हणजे व्यक्तिमत्व समृध्द करणारा दरवर्षीचा प्रेरणादायी अनुभव असतो. इ. ९ वीच्या १३ जणांचा गट घेऊन मातृभूमीचा परिचय करून घ्यायला कुठे जावं असा विचार करीत असताना प्रबोधिनीचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रा. विवेकराव पोंक्षे यांच्याशी चर्चा करण्याची संधी मिळाली. त्यांनी मला ‘देशाचा परिचय करून घ्यायचा हे व्यापक उद्दिष्ट आहे; यावर्षी त्यातलं नेमकं काय करायचं?’ असा विचार करायला सुचविले. माझ्या मनात तेंव्हा नक्षलवाद हा विषय सतत घोळत होता. त्यामुळे मी नक्षलवाद हे प्रकरण काय आहे हे समजून घेण्याचा माझा विचार त्यांच्या समोर मांडला. त्यांनी ‘रेड कॉरीडॉर’, ‘नक्षलबाडी’ असे विषय सांगत सांगत त्याबद्दलचा खोल विचार करायला मला उद्युक्त केले. आमच्या पुढच्या भेटीत मी ‘छत्तीसगड’ला जाण्याची माझी कल्पना मांडली. शेवटी चर्चेअंती फक्त नक्षल प्रश्न म्हणजे छत्तीसगड नाही असे ठरले आणि छत्तीसगडमधली काही विधायक काम करणारी माणसं बघायची, त्याचं काम समजून घ्यायचं, भरभरून निसर्गाने दिलेली संपत्ती अनुभवायची, तिथल्या पाड्या वस्त्यांवर राहणाऱ्या सामान्य माणसांशी मैत्री करायची असा अधिक नेमका विचार झाला आणि शिबिराचे ठिकाण निश्चित झाले दक्षिण छत्तीसगड मधल्या ‘दंतेवाडा’ जिल्ह्यात दंतेवाडा, बारसुर आणि अजून काही स्थानिक वस्त्यांमध्ये!


इ. ९ वी च्या गटात ‘छत्तीसगडची’ घोषणा झाली आणि तयारी सुरु झाली ती नकाशात दंतेवाडा, बारसुर ही गावे शोधण्यापासून ते तिथले लोकजीवन आणि संस्कृती याबद्दल इंटरनेट आणि पुस्तकात काही सापडते का हे पाहण्यापर्यंत! तयारी सुरु असताना मध्येच शंका यायची की इतक्या आत जंगलात जावे का? हा धोका पत्करावा का? काही भलते सलते होणार नाही ना? पण आजवर या देशात जेवढी भटकंती केली तेवढ्या भटकंतीत या देशावर, इथल्या माणसांवर भरभरून प्रेम करणारी, अतिथींचे देवासारखे स्वागत करणारी अशीच माणसं भेटली होती. प्रवासात किंवा भटकताना काही अडचण आली की हमखास अशा माणसांचे ‘दर्शन’ होते असा आजवरचा अनुभव! त्या विश्वासावरच बस्तर सारख्या भागात जायचा विचार पक्का झाला.


पुस्तकात मिळालेल्या माहितीमुळे आणि पोंक्षे सरांच्या अनुभवांमुळे छत्तीसगडला जाण्याची उत्सुकता खूपच वाढली. इ.९ वी च्या वर्गातील चि.पार्थ देशपांडे याचे आई बाबा तब्बल गेली १३ वर्षे छत्तीसगडच्या राजधानीत रायपूरला पूर्वांचलातील मुलींचे वसतिगृह चालवीत होते. अर्थातच रायपूरला उतरल्यावर त्यांनी आमचे छान स्वागत केले आणि आम्हाला स्थानिक लागणारी सर्व प्रकारची मदत केली. श्री. दिनकर देशपांडे यांनी आमच्या शिबिराचा ढाचा बनविण्यास खूप सहकार्य केले तर सौ. देशपांडेताईंनी सतत आमच्या सोबत राहून ‘हिशोब’ चोख ठेवण्याची जबाबदारी स्वीकारली.


रायपुर – दंतेवाडा – पोटा केबिन स्कूल्स – बारसूर – बेंगलूर ( दंतेवाडा मधील एक छोटे गाव ) – नारायणपूर – कुटुंबसर धबधबा आणि कांकेर- भिलाई – रायपुर असा सगळा आराखडा आखला. अनेक व्य्क्तीभेटी आणि संस्था भेटी ठरवल्या. सर्वात महत्वाचे आमच्या मनाची आणि पालकांची या सगळ्यासाठी तयारी झाली आणि मातृभूमीच्या असा परिचय करून घ्यायला आम्ही तयार झालो.


राजधानीचे रायपुर शहर इतर ‘शहरासारखेच’ वैशिष्ट्ये बाळगणारे म्हणजे ‘व्यस्त’ आणि ‘अस्ताव्यस्त’ वाटले. अनेक सुंदर तलाव आणि उंच झाडी नाहीशी होण्याच्या महामार्गावर दिसली. पूर्वतयारीत नक्षलवादाविषयी वाचताना ‘आमच्या संस्कृतीवर’ विकासाची कुऱ्हाड का? असा प्रश्न केलेला आठवला. पुर्खोती मुक्तांगण नावाच्या नव्याने उभारलेल्या स्थानिक लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या एका बागेला भेट दिली. विविध प्रकारची आदिवासी नृत्ये, कला आणि लोकजीवन यांचे पुतळ्यांच्या माध्यमातून उभे केलेले एक दर्शन तिथे झाले. हे असं सगळं अजूनही आतल्या भागात टिकून आहे असे तिथले लोक सांगत होते.

रायपुर ते दंतेवाडा हा एका रात्रीचा प्रवास आहे. खाजगी बसने जाता येतं. एकदम १५ तिकिटं काढतोय तर थोडी सवलत मिळेल का म्हणून त्या तिकीट खिडकीवर आम्ही हुज्जत घालत होतो तेंव्हा त्या ट्रॅव्हल्सच्या मालकाने आत बोलावलं आम्ही पुण्याहून ‘मातृभूमीचा’ परिचय करून घ्यालला आलोय आणि दंतेवाडा सारख्या भागात चाललोय हे ऐकून थक्क झालेल्या त्या माणसाने आम्हाला इथूनच परत जा असा सल्ला दिला, किंबहुना त्याने ‘आप को दिल्ली, आग्रा जैसी जगह जाना चाहिये’ अशीही समजूत काढली. त्याच्याशी सविस्तर चर्चा केल्यावर ‘स्लीपर बसने मी तुमची जायची व्यवस्था करतो पण एका अटीवर’ असा आमच्याशी तह केला! त्याची ती अट ऐकून आम्ही थक्क झालो. ‘आप इस टिकट के कोई पैसे नही देंगे’! ( साधारण अंतर ३०० किमी ) देशाचा अभिमान बाळगणाऱ्या ‘त्या’ रूपाचे दर्शन तिकीट खिडकीत झाले. रात्री १० वाजता बसने रायपुर सोडले.


माझ्या मनात विचारांची चक्रं फिरत होती. सकाळी पोहचू तेंव्हा कसा असेल परिसर? आम्हाला रात्रीत कोणी काही करणार तर नाही ना? जर काही झाले तर माझ्या सोबतच्या ९ वी च्या मुलांच्या पालकांना मी कसा सामोरा जाईन? असे प्रश्न मनात येत होते. माझ्या बसच्या खिडकीतून मधेच एखादा तारा लख्ख चमकताना दिसायचा, गाडीने वळण घेतले की नाहीसा व्हायचा. विचाराचे चक्र वळण बदलायचे आणि वाटायचे की पुढच्या प्रवासात नक्षल, पर्यावरण, विकास की संस्कृती अशा अनेक प्रश्नांच्या अंधारात आपल्याला काही तारे दिसतील कदाचित....


“ या स्वागत आहे!” चक्क मराठी आवाज! ज्योतीताई मुळची सोलापूरची, (वय साधारण २३/२४) पण सध्या मुक्काम दंतेवाडा, छत्तीसगड !
“आवरून घ्या आणि मग दंतेश्वरी मातेच्या मंदिरात जाऊन या; आमच्यापैकी कोणीतरी येईल तुमच्यासोबत.”


हे ‘आमच्यापैकी’ म्हणजे सगळे पंचविशी तिशीतले तरुण. ‘बचपन बनाओ’ च्या कार्यालयाबाहेर पल्सर, स्प्लेंडर भोवती वाफाळलेल्या चहाचे कप हातात घेऊन ३/४ जणांच्यात गप्पा चालल्या होत्या, आज कोणत्या वस्तीवर जायचं, शाळेत आज मी काय भन्नाट आयडिया करून बघणार आहे वगैरे! मी जाम ‘टेंम्ट’ झालो. ह्या असल्या जंगलात कसली शाळा? कुठली भन्नाट आयडिया? ही सगळी तरुण मंडळी इथे काय करतायत? कुठून आलीयेत? असं सगळच मला ऐकायचं होत.


“चलो आपको दर्शन करा के लाते है!” असं म्हणत एकाने तिथली ‘सिक्स सीटर’ काढली. त्यामध्ये आम्ही १२ जण बसलो. उरलेले ३ जणही ‘बसवले’ आणि आम्ही मंदिराकडे निघालो. त्या चालकाशी काहीतरी मी बोलणार इतक्यात तो सांगू लागला, “मै प्रणित... बचपन बनाओ का कार्यकर्ता....” माझ्या डोक्यात ‘ट्यूब’ पेटली, “ओह! हा केवळ चालक नाही तर बचपन बनाओ या संस्थेचा संचालक आहे!”


प्रणितदादा दंतेवाडाचा पुराणकाळातला संदर्भ सांगत होता....


भगवान विष्णूच्या सुदर्शन चक्राने सती देवीच्या शरीराचे जे तुकडे केले त्या ५२ तुकड्यांपैकी एक म्हणजे सती देवीचा दात जिथे पडला ते हे ठिकाण. ५२ शक्तीपीठांपैकी एक दंतेवाडा ! आणि मग त्या अन्नान राजाचीही लोककथा सांगितली. देवी ने त्याला ‘वर’ दिला होता की जोपर्यंत तू मागे वळून न बघता चालतोस तोपर्यंत मी तुझ्या मागे येईन आणि जेवढी जमीन चालून जाशील तेवढे तुझे राज्य! आणि नेमकं ‘शंकिनी – डंकिनी’ नद्यांच्या संगमावर राजाने मागे पाहिले आणि देवी तिथेच थांबली ती आजवर इथेच आहे. दक्षिण बस्तर भागातल्या अनेक आदिवासी जन जातींचे ‘दंतेश्वरी’ हे आराध्य दैवत. अनेकांची कुलदेवता. दसऱ्याला जंगलाच्या आतल्या आतल्या भागातनही अनेक लोक श्रद्धेने इथे एकत्र येतात. कुणाला यायला एक तास लागतो तर कुणाला एक महिना ! चालत चालत ही मंडळी जंगलाची वाट तुडवत देवीच्या दर्शनाला एकत्र येतात. १४ व्या शतकात हे मन्दिर बांधलेलं आहे. गर्भ गृह, महा मंडप, सभा मंडप आणि गरुड खांब यांच्यासह अतिशय विस्तीर्ण परिसर असलेले असे हे मंदिर आहे. अखंड वस्त्र नेसलेले असेल तरच गाभाऱ्यात प्रवेश मिळतो; आम्ही सर्वांनी ‘लुंगी’ नेसून गाभाऱ्यात दर्शन घेतले. काळ्या दगडातून घडवलेली, अलंकार आणि वस्त्रांनी सजवलेली देवीची सुंदर मूर्ती परिसरातल्या आदिवासी संस्कृतीची साक्ष देत होती.


या वनवासी भागाला निसर्गाने भरभरून दिलेलं वैभव आम्ही डोळ्यात भरून घेत होतो. नजरेच्या कुठल्याही टप्प्यात सिमेंट, प्लास्टिक, विजेचे खांब, त्याला जोडलेल्या (किंवा लटकलेल्या) तारा असा ‘विकास’च झालेला दिसत नव्हता!


इथे ही तरुण मंडळींची ‘टीम’ काय काम करतेय? कसल्या प्रश्नांना उत्तरं शोधत, खूप उत्सुकता मनात घेऊन आम्ही ‘बचपन बनाओ’च्या कार्यालयात परतलो.

(क्रमशः)
 
- आदित्य शिंदे  
@@AUTHORINFO_V1@@