आजारपण.....
 महा एमटीबी  12-Mar-2018
' पडु आजारी मौज वाटे ही भारी ' हे लहानपणाचे दिवस कधीच सरले. तेव्हा खरच ३ - ४ दिवस येणारा ताप आवडून जायचा. आई साबुदाण्याची खीर करून द्यायची. बाबा कपाळावर गार पाण्याच्या घड्या ठेवायचे. कोणीतरी भेटायला आलं की सफरचंद, मोसंबी घेऊन यायचे. शाळेला दांडी, अभ्यासाला सुट्टी. सगळं कसं छानं छानं.
पण बालपणीचा सुखाचा काळ सरला आणि त्याचबरोबर ते आवडणारं आजारपणही संपलं. खर सांगू, आताशा आजारपण ही एक डोकेदुखी होऊन बसली आहे. हल्ली internet च्या मदतीमुळे सगळेच स्वत: ला थोडफार का होईना डॉक्टर समजू लागलेत. मग काय सल्ल्यांवर सल्ले. उपदेशाचे डोस आणि त्या विषयातील स्वत: चे अगाध ज्ञान प्रदर्शन. त्यात तुमचा आजार साधासोपा असेल तर बरी गती आहे, पण हा आजार गंभीर स्वरुपाचा असेल तर तुमची आणि तुमच्या नातेवाईकांची खैर नाही. विविध देशाचे, प्रातांचे, गावाचे अतिनिष्णात डॉक्टर, मग यांच्या जोडीला आयुर्वेद, होमिओपँथी, नँचरोपँथी हे प्रकार धावून येतात. बरं...
' मन खंबीर तर शरीर खंबीर ' किंवा उलट तरी. त्यामुळे मानसिक स्थिती उत्तम ठेवणे आवश्यक. मग योगासने, ध्यानधारणा, योगनिद्रा, रेकी, प्राणिक हिलींग, music therapy, art therapy, counseling, recreational therapy..... यादी संपतच नाही. यांच्या जोडीला मग देवधर्म, ऋषीमुनी, ज्योतिष, तांत्रिक, मांत्रिक उपाय, उपवास यांचीही जोड मिळते.
या सर्वात मूळ आजारापेक्षाही उपचाराला रुग्ण अजूनच घाबरून जातो आणि नातेवाईक गोंधळून जातात. त्यात या आजारात चुकून जरी मानसिक ताणतणावाची शक्यता जाणवली, तर मग मात्र रुग्ण पुरता वेडा होतो. भेटणारी प्रत्येक व्यक्ती आपण जणू M.D (psychiatry) किंवा M.A. (clinical psychology) आहोत असे मानून साधारण अर्धा पाऊण तासाचं तरी किमान एक सेशन घेतेच.
अगदी प्राचीन काळी जेव्हा psychology हे स्वतंत्र शास्त्र म्हणून विकसित झालेलं नव्हतं तेव्हा philosophy हाच त्याचा पाया मानला जायचा. त्यामुळे त्याकाळी मानसिक विकारांकडे बघण्याची पद्धत म्हणजे Demoralization of human values अशीच होती.
परंतु जसजसे या विषयातलं संशोधन वाढलं Dr. Sigmund Freud, Dr. Albert Elis यासारख्या महान विभूतींनी काही अद्भुत शोध लावले. Dissection करा नाहीतर Post martum करा जे आजपर्यंत कोणालाही दिसलेलं नाही असं मन अदृश्य, पण कार्य मात्र दिसून येणारी. अचिंत्य, पण चिंतन करण्याजोगं विचार्य, उह्य, ध्येय अशी अनेक कार्य लीलया करणार ते आपल मन.
आपलच असून आपलं कधीच न ऐकणारं आपल मन. उद्विग्न मनस्थितीत बेफाम, बेलगाम उधळलेल्या घोड्यासारखं आपलचं मन. तर कधी हिरमुसून जावून डोळ्यातून अखंड अश्रूधारा बरसवणारं आपलचं मनं. आनंदाच्या क्षणी या शरीराला रोमांचित करणार मनं.
एकच मन, पण रुपे अनेकविध. भीमरुपी स्त्रोत्रात ज्याला मारुताचा वेग आहे असं विलक्षण वेगवान मन.


"आत्मा मनजा संयुज्यते, मन:इंद्रियेण, इंद्रिय: अर्थेन, तत: ज्ञानम् " !


हे मनच शब्द, स्पर्श, रुप, रस, गंध याव्दारे या चराचराच ज्ञान आत्म्याला करुन देते. आणि हे मन जागेवरच नसलं तर समोरची वस्तू आपल्याला दिसूनही त्याची जाणीव होत नाही, त्याचं ज्ञान होतं नाही.
हव्याहव्याशा वाटणाऱ्या लहानपणीच्या आजारापासून सुरु झालेली गोष्ट कुठे येऊन ठेपली पहा. पण खर सांगू, मंडळी मला याच विषयावर लिहायचं होतं, पण जर सुरुवातच नैराश्य, अस्वस्थता, भीती अशा शब्दांनी केली असती ना तर चार सुह्रद सोडले तर ही गोष्ट कोणी वाचली नसती.
मग काय करावे बरे अशा अवस्थेमध्ये डॉक्टरांकडे जावे हा साधा सोपा सल्ला. ध्यानाला बसा, मन शांत होईल, पण जर त्या ध्यानाच्या आधीची यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार ही पाच योगाची अंगं केलीच नसतील तर ध्यान लागणार कसे ?
मनाचा उत्तम नियंत्रक म्हणजे श्वास. त्यामुळे प्राणायाम करा, मन ताब्यात राहील. मंडळी, वरील सर्व उपाय अतिशय योग्य आणि तज्ञांनी मान्यता दिलेले आहेत, त्यामुळे त्यावर मी भाष्य करावं ही क्षमताच नव्हे.
पण मला मात्र एका प्रश्नाचे अगदी प्रामणिकपणे उत्तर द्या...
या सर्व उत्तमोत्तम गोष्टी नित्यनेमाने कोण कोण करतं ? WHO च्या एका मतानुसार येत्या दहा वर्षात मानसिक समस्येने ग्रस्त रुग्णांची सर्वात जास्त संख्या आपल्या भारतात असणार आहे.मग काय करावे ?


काहीच साधेसोपे, आमच्यासारख्या कशातच फारसं सातत्य न टिकवणाऱ्या लोकांनी काय करायचे ?
मग काय, थोडा अभ्यास केला, वाचन केलं, तज्ञांचे मार्गदर्शन घेतले आणि उपाय सापडले. खूप साधेसोपे सरळ.


रोज एकदा आरशात दिसणारा व्यक्तीशी बोला. सारा समाजाचं, घराचं, office च करता करता ती आरशातली व्यक्ती आहे ना तिच्यासाठी काहीतरी करा. तिच्याकडेही थोड़े लक्ष द्या.
तिची दुख, वेदना, सुख, आनंद समजून घ्या आणि तो अंमलात आणा. कारण...., कारण आरशात दिसणारी ती व्यक्ती ही फक्त तुमची प्रतिमा नसून तो तुमचा जीवात्मा आहे. साक्षात परब्रह्म, परमात्म्याचं एक रुपं." कुठे शोधिशी अन् कुठे शोधिशी काशी...
ह्रदयातील भगवंत राहिला ह्रदयातून उपाशी".....
आणि हे ज्ञान आपल्याला देणारे जसे वर उल्लेखलेले महान तज्ञ आहेत ना तसेच आहेत आपले संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत मीराबाई, संत नामदेव आणि आवडीने ज्याचं नावं घ्यावं असा रुक्मिणीचा लाडका पांडुरंग....
-  डॉ. अनुपमा माढेकर