मानवतेच्या भल्यासाठी आपापल्या कक्षा रुंदावणे गरजेचे : पंतप्रधान मोदी
 महा एमटीबी  11-Mar-2018


नवी दिल्ली :
मानवतेच्या भल्यासाठी सर्व देशांनी आपल्या विकासाच्या आणि विचारांच्या कक्षा रुंदावणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले आहे. भारत आणि फ्रांस यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलेल्या जगातील पहिल्या आंतरराष्ट्रीय सौर उर्जा परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
'आज संपूर्ण जगाला पर्यावरणाच्या समस्येने ग्रासले आहे. वातावरणातील ग्लोबल वॉर्मिंगचे प्रमाण वाढत निघाले आहे. त्यामुळे पर्यावरणाचा संतुलन राखत आपापल्या देशाचा विकास करणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे आतापासून सौर उर्जेचा वापर वाढवून त्याद्वारे पर्यावरणपूरक विकास घडवला पाहिजे', असे मोदी म्हणाले. तसेच यासाठी सर्व देशांनी आपल्या विचारांच्या आणि कार्याचा कक्षा देखील रुंदावणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
भारतीय संस्कृतीमध्ये सूर्याला हजारो वर्षांपासून महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. सूर्य हा संपूर्ण विश्वाचा आत्मा असून तोच सर्वांचे भरणपोषण करत असल्याची उदात्त भावना भारतीय ऋषीमुनींनी व्यक्त केली आहे. तसेच आताच्या काळात देखील सौर उर्जा आणि सौर शक्तीची हीच खऱ्या विकासाचा चावी असल्याचे त्यांनी म्हटले. त्यामुळे सर्व देशांना आता एकत्र येऊन या सोलर अलायन्सला वाढवून त्याद्वारे सर्वानाच्या विकासावर भर दिला पाहिजे, असे ते म्हणाले.फ्रांसचे राष्ट्रपती इमॅन्यूएल मैक्रॉन यांनी देखील सौर उर्जेचे महत्त्व सांगत परिषदेला आलेल्या सर्व देशांच्या प्रतिनिधींचे आभार व्यक्त केले. भारताच्या मदतीने सुरु करण्यात आलेले सौर अलायन्स भविष्यात सर्व जगाला अत्यंत फायद्याचे ठरले असे त्यांनी म्हटले.


२०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या फ्रांस दौऱ्यामध्ये या सोलर अलायन्सची स्थापना केली होती. यामोहिमेअंतर्गत मकरवृत्त आणि कर्कवृत्त या दोन वृत्तांमध्ये असलेल्या देशांच्या समावेश या सोलर अलायन्समध्ये करण्यात आला आहे. या दोन वृत्तांमध्ये असलेल्या सर्व देशांमध्ये वर्षभर उन्हाचे प्रमाण जास्त असल्यामुळे याचा फायदा सर्व देशांना वीजनिर्मितीसाठी होऊ शकतो, जेणेकरून पर्यावरणपूरक वीजनिर्मिती होऊ शकते.