‘ती’ची ऐतिहासिक गगनभरारी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Mar-2018
Total Views |

दि. १९ फेब्रुवारीला एका भारतीय महिलेने प्रथमच लढाऊ विमानातून झेप घेतली. ही झेप ऐतिहासिक होती, कारण ही केवळ तिची वैयक्तिक झेप नव्हती, तर तिच्यासारख्या फायटर पायलट म्हणून भरारी घेऊ इच्छिणार्‍या हजारो महिलांची होती...


त्यांच्यासाठी हा नवा आसमंत खुला करणारी ही महिला पायलट म्हणजे फ्लाईंग ऑफिसर अवनी चतुर्वेदी. म्हणूनच गेल्या काही दिवसांपासून त्या सोशल मीडियावरही अवनी यांच्या नावाची जोरदार चर्चा असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. २४ वर्षांच्या अवनी यांनी ‘मिग-२१’ विमानातून केलेल्या ३० मिनिटांच्या उड्डाणाने महिलांनी आणखी एक नवे शिखर पादाक्रांत केले आहे. त्यांनी आणखी एक चौकट मोडली आहे. वायुदलाचे प्रवक्ते अनुपमबॅनर्जी यांच्या शब्दांत सांगायचं तर, ‘‘आज आणखी एक ग्लास सिलिंग तोडलं गेलं.’’ अवनी या भारतीय वायुदलात दाखल होणार्‍या पहिल्या तीन महिला वैमानिकांपैकी एक. त्यांचे असे हे ऐतिहासिक उड्डाण १९ फेब्रुवारीला पूर्ण झाले आणि त्यांच्या या धडाकेबाज कामगिरीनंतर करोडो भारतीयांसह माध्यमांनीही त्यांच्या या गगनभरारीची दखल घेतली. अवनी यांनी जून २०१६ साली भावना कांत आणि मोहना सिंगसमवेत आपले प्रशिक्षण पूर्ण केले होते. लवकरच या दोघीही अशाच विमानात आपापली पहिली उड्डाणे पूर्ण करतील, असे वायुदलाने सांगितले आहे. तसेच, सर्वांसाठी समान संधी उपलब्ध करून देण्यास आम्ही तत्पर आहोत, असे वायुदलाने म्हटले आहे आणि हा क्षण त्याच दिशेने टाकलेले एक मोठे पाऊल म्हणावा लागेल.


भारतीय लष्करात महिलांचे प्रमाण २०१६ सालापूर्वी केवळ २.५ टक्के होते. त्यातही बहुतांश जणींना प्रत्यक्ष लढण्यास पाठवले जात नाही. दुसरीकडे, पाकिस्तान वायुदलाने २००६ पासून महिलांनाही प्रत्यक्ष लढाईसाठी दाखल करण्यास सुरुवात केली होती. आज त्यांच्या वायुदलात २० महिला फायटर पायलट आहेत. भारतात ऑक्टोबर २०१५ रोजी केंद्र सरकारने महिलांना लढाऊ वैमानिक होण्याची संधी उपलब्ध करुन दिली. महिला लढाऊ वैमानिक बनवण्यासाठी २०१६ मध्ये पहिल्यांदाच तीन महिला अवनी चतुर्वेदी, मोहना सिंह आणि भावना यांना हवाई दलात कमिशन केले होते. जगभरात आज असे निवडक देश आहेत जिथे महिलांना लढाऊ वैमानिक होण्याची संधी दिली जाते. यामध्ये ब्रिटन, अमेरिका, इस्रायल आणि पाकिस्तानचा समावेश आहे. अवनी चतुर्वेदीचा जन्म२७ ऑक्टोबर १९९३ रोजी झाला. तिचे वडील दिनकर चतुर्वेदी हे मध्य प्रदेश सरकारमध्ये जलसंवर्धन विभागात कार्यकारी अभियंता आहेत, तर तिची आई गृहिणी आहे. अवनीचा मोठा भाऊ लष्करात अधिकारी पदावर आहे. अवनीचे शालेय शिक्षण मध्य प्रदेशातील शाहदोल जिल्ह्यातील एका छोट्या गावात देऊलंद येथे झाले. २०१४ मध्ये तिने राजस्थानच्या बनस्थली विद्यापीठातून पदवी संपादित केली. यानंतर तिने भारतीय हवाई दलाची परीक्षा उत्तीर्ण केली. अवनी मध्य प्रदेशातील रेवा जिल्ह्यातील आहे. २५ वर्षीय अवनीने आपले प्रशिक्षण हैदराबाद एअरफोर्स अकॅडमीतून पूर्ण केले आहे. एकटीने लढाऊ विमान उडवणे हे तिचे लढाऊ वैमानिक होण्याच्या दृष्टीने टाकलेले पहिले पाऊल आहे. तिच्या या यशामुळे नक्कीच अनेकींना प्रेरणा मिळणार आहे. त्यामुळे अवनीासारख्या अनेक मुली, महिला यातून प्रेरणा घेतील आणि भारतीय वायूदलात भरती होतील अशी आशा आहे. अवनीच्या गगनभरारीसाठी तिला सलाम...
 
 
- तन्मय टिल्लू
 
@@AUTHORINFO_V1@@