पंतप्रधान मोदी आजपासून अरब देशांच्या दौऱ्यावर
 महा एमटीबी  09-Feb-2018
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजपासून युएई, ओमान आणि फिलीस्तान या तीन देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. आपल्या या चार दिवसांच्या दौऱ्यामध्ये पंतप्रधान मोदी या तिन्ही देशांच्या प्रमुखांच्या भेटी घेणार असून भारत आणि या तीन देशांमधील मैत्रीपूर्ण संबंधांच्या वाढीवर ते चर्चा करणार असल्याचे पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. तसेच दुबईमध्ये उभारण्यात आलेल्या एका हिंदू मंदिराचे देखील पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे.

पंतप्रधान मोदींनी देखील आपल्या या चार दिवसीय दौऱ्याविषयी माहिती दिली आहे. पंतप्रधानांनी आपल्या सोशल मिडियाच्या माध्यमातून या विषयी माहिती देत २०१४ नंतर अरब देशांमधील हा ५ दौरा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच मध्य आशियातील देशांबरोबर असलेले आपले संबंध हे भारताच्या परराष्ट्र धोरणातील अत्यंत महत्त्वाचा भाग असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या भेटीमध्ये आपण दुबईमध्ये होणाऱ्या डब्ल्यूजीएस परिषदेमध्ये सहभागी होणार असून या ठिकाणी उपस्थित झालेल्या दुबईतील सर्व बड्या उद्योजकांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यानंतर ओमान आणि आणि युएईमध्ये असलेल्या सर्व भारतीय नागरिकांची देखी भेट घेऊन त्यांच्या चर्चा करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तसेच या दौऱ्यादरम्यान आपण फिलीस्तानच्या दौऱ्यावर देखील जाणार असल्याचे पंतप्रधानांनी सांगितलेले आहे. फिलीस्तानचे राजे अब्दुला दुसरे यांच्या आग्रहाच्या आमंत्रणावरून आपण या दौऱ्यावर जात असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले आहे. भारत आणि फिलीस्तान यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून मैत्रीपूर्ण संबंध असून या संबंध आणखीन दृढ करण्याच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वपूर्ण ठरेल असेही त्यांनी म्हटले आहे.