विस्मृतीत गेलेल्या म्हणी आणि वाकप्रचार भाग - ५४
 महा एमटीबी  09-Feb-2018


अवंती : मेधाकाकू... माझी मावशी आणि तिचे सगळे कुटुंबीय डिसेंबर महिन्यात पुण्यात रहायला गेले, मुंबईच घर ठेवलंय अजून कालच मावशीने फोनवर सगळ्यांना पुण्याला बोलावलंय, या मार्च महिन्यातील गुडी पाडव्याच्या दिवशी. आम्ही सगळे दोन-तीन दिवस तिच्याकडे जाणार आहोत. पण कांय गं... पुणे शहराचे नाव आले की, सगळ्यांचे चिमटे आणि टपल्या सुरु होतात. पुणेरी किस्से – पुणेरी पाट्या – पुणेरी रिक्षाचालक – पुणेरी अपमान असे अनेक विषय लगेच चर्चेत येतात. असं नेमके कशामुळे होते. मला काही समजत नाहीये.

मेधाकाकू : अरेच्या... अवंती तुझ्या भाषेत सांगायचे तर मस्त... मस्त... मस्त... पुणेरी किस्से. असे बघ, प्रत्येक शहराला एक खास व्यक्तिमत्व असते. तिथली एक प्रचलित भाषा असते. तिथल्या रहिवाशांचे काही विशेष गुण-अवगुण असतात. समाजातील काही पध्दती-लकबी-आवडी असतात. काही शतकांपासून प्रत्येक शहराची अशी ओळख निर्माण झालेली असते. नागपूर शहर आणि विदर्भातील अगत्य आणि पाहुणचार, इंदूर आणि मावळातील खाऊ गल्ल्या आणि खवय्यांची रसना तृप्ती, सोलापूरच्या चादरी आणि समाजातील आपुलकी, धुळे-जळगावातील उन्हाळा-वांग्याचे भरीत आणि भरली कारली. प्रत्येक शहराची अशी खास ओळख एकेका वाक्यात सर्वांनाच परिचित असते. तीच गोष्ट पुणे-मुंबई या शहरांची सुद्धा. वेगाने विकसित झालेल्या समाज माध्यमांमुळे अशी चर्चा होते हे आपल्याला आज जाणवते. म्हणूनच हे तुझ्यापर्यंत पोहचले. म्हणूनच आपल्या चतुर पूर्वजांनी, अशी व्यक्तीच्या नावातील आणि शहरांची वैशिष्ट्ये लोकश्रुतींमध्ये कायमची अजरामर केली. प्रत्येक पिढीत संक्रमित होत राहिली. मात्र असे संक्रमण, “सामूहिक अबोध” म्हणजेच (collective unconscious) या प्रकारे होत राहिले. म्हणजेच शहरांविषयी असे सगळे प्रत्येकाला माहित आहे पण प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगळा आहे, आकलन वेगळे आहे.

अवंती : अरेच्या... मेधाकाकू... हे खूप वेगळ आहे. सांग... सांग अजून काही. पुणे-मुंबई बद्दल.

मेधाकाकू : एक वाकप्रचार असा आहे की, कोणालाही कोडे वाटावे. लोकमानसात अशाच श्राव्य परंपरेने रुजलेली एक धारणा असे म्हणायला हरकत नाही.

नाव सांगावे पण गाव सांगू नये.
मेधाकाकू : आपण स्वतः जसे आहोत ते लोकांनी पहावे, आपले शिक्षण-अनुभव-गुणवत्ता याची नोंद घावी. अशा धारणेने तरुण मुले – मुली व्यवसाय नोकरीसाठी शहरात येतात. मात्र नावाबरोबर गावाचा परिचय मात्र हातचे राखून दिला जातो. कारण गावाबद्दल झालेल्या कोणाच्या गैरसमजुती. असं सामान्यत: होत असले तरी एक लबाड आणि हुशार मुलगी स्वतः च ओळख मात्र अशी करून देते. मग बघणाऱ्याला – ऐकणाऱ्याला या वाकप्रचाराचा आधार घ्यावा लागतो.


पांचट गुणाची, म्हणते मी पुण्याची.
मेधाकाकू : पुण्यातल्या मुली चपळ, चतुर, शिकलेल्या, आधुनिकतेचा, नव्या गोष्टींचा स्वीकार करणाऱ्या अशा गुणवत्तेच्या. आपल्या वाकप्रचारातली ही मुलगी सुद्धा हुशार - चपळ मात्र स्वतः च्या जिभेवर नियंत्रण नसलेली आणि फसव्या प्रवृत्तीची आहे. आपण पुण्याच्या असल्याचा बहाणा करून ही लोकांवर छाप पाडते. मात्र आपल्या लोकश्रुतींनी अशा फसव्या आणि बहाणेबाज व्यक्तींपासून सावध राहायचा सल्ला आपल्याला दिलेला आहे.

अवंती : अच्छा... म्हणजे पुण्याच्या मुलींच्या गुणवत्तेचा असा गैरफायदाही घेतला जातोय. या बहाणेबाज – फसव्या मुलींकडून. मेधाकाकू, हे तुझे पुण्याच्या मुलीचे ‘स्टोरी मे ट्वीस्ट’ मला फारच आवडलंय.

मेधाकाकू : अवंती... आता तुला नक्कीच जाणवलं असेल किती तऱ्हा या लोकश्रुतींच्या, किती आडवळण, आणि अशा प्रवृत्तीवर नेमकी टिप्पणी किती शेलकी. आता गेल्या काही शतकांपासून, आपली मुंबई सुद्धा अशा लोकश्रुतींचे आकर्षण ठरली, या शहराची खास वैशिष्ट्ये लोकमानसात नोंदली गेली.

मुंबईची वसवस आणि कोणी म्हणेना खाली बस.
मेधाकाकू : ‘मुंबईची वसवस’... हा खरा गावरान शब्दप्रयोग, रोजी-रोटी साठी मुंबईत आलेल्या चाकरमान्यांच्या गृहलक्ष्मीचाच असावा हे नक्की. आपला नवरा मुंबईत एकटा रहातोय, दिवस-रात्र श्रम करून आपले घर, संसार सांभाळण्याचे काम करतोय मात्र हे कष्ट करताना मी त्याच्या बरोबर नाहीये अशी खंत, दूर गावात रहाणाऱ्या त्या माऊलीला सतत अस्वस्थ करत असावी. दोनशे वर्षांपूर्वी सुद्धा मुंबई शहरातले दैनंदिन जीवन असेच कष्टाचे असावे आणि या चाकरमान्याला दोन-चार क्षण निवांत बस, असे म्हणायलाही कोणाला फुरसत होत नसावी, हे या वाकप्रचारातून आपल्या परिचयाचे होते. अवंती... मुंबईत नव्याने आलेल्या चाकरमान्याला सुरुवातीला खूप अडचणी येत असणार हे नक्की.
मुंबईचे पाणी आणि हातपाय ताणी.
मेधाकाकू : गावाकडच्या सवयी आणि जीवनशैली घेऊन मुंबईत आलेल्या बाबूला (कारकून) आणि चाकरमान्याला (कामगार) प्रथमचे मुंबईतिल विहिरींचे ‘पाणी चाखायला’ लागत असेल आणि या पाण्यातील क्षारांची सवय होईपर्यंत त्याला थोडयाशा अपचन आणि थंडी-हिवताप याचा अनुभव नक्कीच आला असेल. गावाकडे रहाणाऱ्या त्याच्या गृहलक्ष्मीला, चिंतेचे वेगळे कारण त्या दिवसात मिळाले असेल हे नक्की. लोकश्रुतीतून परिचित होणारी अशी ही “बडी बाकां – मुंबैनगरी”...!!

अवंती : एक नंबर पुण्यनगरी आणि अफलातून मुंबैनगरी आणि त्यांचा चार-सहा शब्दांत तू करून दिलेला विलक्षण परिचय. मस्त.. मस्त... मस्त... अवाक होण्याच्या दोन जागा.
 
मेधाकाकू : अवंती... शहरांचे असे स्थळ महात्म्य आणि प्रत्येकाची आपल्या जन्मस्थळाशी असणारी बांधिलकी, हे फार गहन-गंभीर आणि व्यक्तीसापेक्ष आहे. आमच्या गावातील देवीचा-देवाचा उत्सव. आमच्या गावातील जत्रा. आमच्या गावातील घराचा गणपती. गावातील आमचा होलिकोत्सव आणि शिमगा, या सगळ्या व्यक्तीच्या, कुटुंबाच्या आणि समाजाच्या अस्मितेचा भक्कम पुरावा असतो. मात्र मृत्यू समीप असलेल्या या वृध्द गृहस्थाला वेगळाच पेचं पडलाय.


मरावे काशी कि मरावे मिराशी.
मेधाकाकू : या वाकप्रचारातील ‘मिरास’ या शब्दाचा अर्थ आहे. पिढीजात संपत्ती, शेतजमीन, घर. अशा वडिलोपार्जित संपत्तीचा, शेताचा, घराचा, अशा वतनाचा वर्तमानातील मालक, यासाठी ‘मिराशी’ किंवा ‘मिरासदार’ असे संबोधन, या वाकप्रचारात वापरले गेले आहे. कुटुंब कल्याण, आपली शेती आणि देवभक्ती या फक्त तीन गोष्टीत अनेक वर्षे रमलेला आणि मृत्यूची वाट पहाणारा आपला हा श्रद्धाळू वृद्ध... आता विचार करतोय आपले मरण कुठे यावे ? काशीला जाऊन भगवंताचरणी प्राण सोडवा की, जिथे खेळलो, बागडलो, मोठा झालो त्या माझ्या मिराशित, माझ्या स्वत: च्या जन्मस्थळी राहून वैकुंठ प्रवासाला निघावे ? अवंती... आज मात्र या लोकश्रुतीने डोळ्यात असावे उभी केली आपल्या.!

अवंती : मेधाकाकू... खरंच... किती विलक्षण संवेदनशील आपला समाज आणि किती अर्थवाही या लोकश्रुती मलाही फार भरून आलंय. हे तुझे निरुपण ऐकताना.
 
- अरुण फडके