आत्मपरीक्षणाची गरज
 महा एमटीबी  09-Feb-2018
 
 
 
 
वय वर्षे २९. एमबीएचे शिक्षण घेतलेल्या घाटकोपरमध्ये राहणार्‍या एका तरुणाने नोकरीत मिळणारे असमाधानकारक यश आणि एकटेपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. ऐन तारुण्यात स्वतःहून मृत्यूला आमंत्रण देऊन या तरुणाने उचललेले हे पाऊल काही गोष्टींचा विचार करायला भाग पाडत आहे. शालेय वयापासून अत्यंत हुशार, विविध स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळविण्याची किमया केलेला हा तरुण असं कसं वागू शकतो?, असा प्रश्‍न पडतो. काही गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या नाही, अपयशाचे काही प्रसंग आले तर लगेच आत्महत्या करणे हाच त्यावर पर्याय असू शकतो, असं काहींना वाटत असतं. आपलं स्वप्न, ध्येय गाठण्यासाठी मेहनत, कष्ट हे केलेच पाहिजे, अर्थात त्याला पर्याय नाही. पण, हे सगळं करत असताना एक व्यक्ती म्हणून समाजामध्ये वावरताना आपले इतरांबरोबरचे संबंध कसे आहेत, याचाही विचार करणे तितकेच गरजेचे असते. आयुष्यात तुमचे इतरांबरोबरचे नातेसंबंध कसे आहेत, यावर बर्‍याच गोष्टी अवलंबून असतात. पण, होतं असं की, आपण आपल्या विश्‍वामध्ये इतके रमलेलो असतो की त्याचं भान सहसा राहत नाही.
 
मानवी मनामध्ये प्रेम, माया, राग, क्रोध, लोभ, नैराश्य अशा भाव-भावना येत असतात. जशी परिस्थिती बदलते त्यानुसार या भावना निर्माण होत असतात. त्यामुळे योग्य वेळी या भावनांवर आवर घालणे महत्त्वाचे असते. त्यावर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. जर तुम्हाला निराश, एकटं पडल्यासारखं वाटत असेल तर तुम्हाला एका भावनिक आधाराची, मायेची गरज असते. मग अशा या कठीण परिस्थितीमध्ये तुम्हाला तुमच्या हक्काच्या माणसांबरोबर मन मोकळं केलं पाहिजे. यासाठी तुम्ही तशी माणसे जोडणं गरजेचं असतं. शिक्षण आणि नोकरी या दोन गोष्टींवर आयुष्याची अनेक समीकरणे अवलंबून असतात. शिक्षणामुळे तुमची प्रगती होत असते. तुमच्या आचार-विचारांमध्ये शिक्षणाच्या प्रभावामुळे बदल होत असतो. समाजात जगताना कसं वागावं, चांगलं-वाईट यामध्ये फरक कसा करावा, हे ठरविण्याची दिशा मिळते ती शिक्षणामुळेच. शिक्षण संपल्यानंतर तुम्ही करत असलेली नोकरी तुम्हाला स्वावलंबी बनवते. त्यातून मिळणार्‍या आर्थिक उत्पन्नामधून तुमच्या गरजा पूर्ण होत असतात. मनात एक महत्त्वाकांक्षा बाळगून यापेक्षा अधिक चांगली नोकरी, पगाराचा आकडा कसा वाढवता येईल, यामध्ये स्वतःला इतके गुंतवून घेतले जाते की त्याचा नकळत आपल्या नातेसंबंधांवर दुष्परिणाम होत असतो. आपण मनसोक्त, मनमोकळेपणे बोलणे विसरलो आहोत. काही गोष्टी मिळविण्याच्या नादात कित्येक आनंदाचे क्षण आपल्या हातातून निसटत आहेत, यावर खरंच विचार करायला हवा.
 
 
थोडं भान ठेवा...
मुझे लडकी मिल गयी,’’ असं ट्विट बॉलिवूडमधील दबंग सलमान खानने केलं आणि त्याच्या तमाम चाहत्यांनी ’चला, जमलं बुवा एकदाचं,’ असं म्हणून सलमानच्या चाहत्यांना कमालीचा आनंद झाला. मात्र, या ट्विटमागील गुपित अखेर दोन तासांनी स्वतः सलमाननेच फोडले आणि पुन्हा एकदा त्याच्या चाहत्यांची निराशा झाली. मनोरंजन क्षेत्र हे प्रत्येकालाच आवडतं, हवंहवंसं वाटत असतं. आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनातून थोडासा वेळ काढून चित्रपट, नाटक, लघुचित्रपट बघण्याकडे अनेकांचा कल असतो. अर्थात त्यात गैर काहीच नाही. अनेक अभिनेते-अभिनेत्रींचा खूप मोठा चाहता वर्ग असतो. त्यांचे सौंदर्य, त्यांचा अभिनय अशा एक ना अनेक गोष्टींचा प्रभाव या चाहत्यांवर पडत असतो. त्यांच्या लहान-सहान गोष्टींचे अनुकरण करण्याकडे खास करून तरुणांसोबतच, शालेय विद्यार्थ्यांचा कल दिसून येतो. त्यांची गाणी, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील बारीक-सारीक गोष्टींकडे त्यांचे चाहते नजर ठेवून असतात. पण, अलीकडच्या काळात मनोरंजन क्षेत्राशी संबंधित असलेल्या मंडळींच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक घडामोडी या जरा जास्तच चर्चेत येऊ लागल्या आहेत. त्यात सोशल मीडियामुळे त्यात आणखीनच भर पडली आहे.
 
अर्थात, काही गोष्टी या चर्चेत येण्यासाठी जाणून-बुजून काही मंडळी करत असतात, ही बाब खरी असली तरी एक चाहता म्हणून आपण त्याला किती महत्त्व द्यायचे याचाही विचार करणे गरजेचे आहे. अभिनेते-अभिनेत्रींची लग्ने, त्यांची प्रेम प्रकरणे, अभिनेत्रींना दिवस जाणे, त्यांचे घटस्फोट, त्यांची मुले या सगळ्या गोष्टी आज इतक्या रंगवून सांगण्याच्या प्रमाणामध्ये जास्तच वाढ झाली आहे. पहिली गोष्ट म्हणजे ते तुमच्या-आमच्यासारखे एक मानव प्राणी असून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात असे प्रसंग, घडामोडी या घडणारच. मग त्याबद्दल इतकी उत्सुकता किंवा चर्चा करण्याची काहीच गरज नाही. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये चाहत्यांनी ढवळाढवळ करण्याची गरज भासता कामा नये. चाहत्यांच्या या अशा वागणुकीला कंटाळून काही मनोरंजन क्षेत्रातील मंडळींनी आमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये जास्त लक्ष देऊ नका, अशी विनंतीदेखील केली होती. एका ठराविक मर्यादेपर्यंत त्यांची चर्चा करणे योग्य ठरतं. परंतु, त्याचा अतिरेक होणार नाही याची दखल घ्यायला हवी. समाजात, देशात इतर अनेक प्रश्‍न भेडसावत आहेत. अनेक समस्या आ वासून उभ्या आहेत. त्याचा निपटारा करण्यासाठी खरंतर तरुण नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे अशा गोष्टींमध्ये अमूल्य वेळ घालवण्यापेक्षा समाजाचं भलं करण्यासाठी, इतरांना माझी मदत कशी होईल, याकडे थोडं लक्ष देण्यास काहीच हरकत नाही.
 
 
 
- सोनाली रासकर