पेपर कट्‌सचा अवलिया...
 महा एमटीबी  09-Feb-2018


कलेच्या या जत्रेत पुण्याच्या ऋषीकेशची कला अशीच आगळीवेगळी, पण लक्ष वेधून घेणारी आहे. पुणेकर ऋषीकेश पोतदारची कला नेमकी आहे तरी काय, ते जाणून घेऊया...

‘कलाकृती’ शब्दात दोन गोष्टी एकत्र आहेत. एक ‘कला’ व दुसरी ‘कृती’. कला म्हणजे काय हे सांगणे, त्याची व्याख्या करणे कठीण आहे, असे बरेचदा म्हटले जाते. त्यामुळे जर का कला म्हणजे काय हे सांगणे कठीण असेल, व्याख्या करणे कठीण असेल तर ते समजणे, शिकणेही कठीण नसेल काय, असा प्रश्र्न साहजिकच निर्माण होतो. त्यामुळे आपण ‘कला’ शिकतो म्हणजे काय? हाही प्रश्र्न समोर उभा ठाकतो. या प्रश्र्नांमुळे आपल्याला कळते की, आपण कला, चित्रकला शिकत असताना त्या संबंधातील ‘कृती’ करणे शिकत असतो. म्हणजे कागदावर किंवा कुठच्याही पृष्ठभागावर रेखाटने करणे व रंग वापरून प्रतिमा तयार करायला शिकतो. या प्रतिमा तयार करण्यासाठी आवश्यक कृती- पेन्सिल, पेन, ब्रश आदी साधनांच्या साहाय्याने रेखाटने करणे व रंग पृष्ठभागावर लावणे, त्यातून आकार घडवणे हे करायला शिकतो. आपण ‘कृती’ शिकतो आणि म्हणतो ‘कला’ आली. कला म्हणजे विविध घटकांची अनुभूती देणारी मांडणी. एकापेक्षा एक सरस आणि जीव ओतून तयार केलेल्या कलाकृतींचे प्रदर्शन आणि त्या विश्वात रममाण होणारे कलेचे खरे पारखी हे चित्र प्रत्येक कला प्रदर्शनात पाहाण्यास मिळते. यातील प्रत्येक कलेत काहीतरी दडलेले असते. अर्थात, ते शोधण्याची व्यापक दृष्टी मात्र बघणार्‍यांकडे हवी. कलेच्या या जत्रेत पुण्याच्या ऋषीकेशची कला अशीच आहे. ‘पेपर कट्स’ या कलाप्रकारातून ऋषीकेश आपली कला सादर करतो. एकावर एक कागदांची अनोखी रचना करून ते कोरून त्यातून चित्र निर्मिती करणे अशा स्वरुपात पेपर कट्‌स ही कला सादर करण्यात येते. पण, या ऋषीकेशने कुठल्याही कला महाविद्यालयातून यासाठी शिक्षण घेतले नसून केवळ आंतरजालावर शिकून त्याने ही कला आत्मसात केली आहे.

ऋषीकेश मूळचा पुण्याचा. कोणतीही गोष्ट त्याच्या कलेने करणे म्हणजे कला! आणि हेच ऋषीकेशने केले. कलेच्या छंदापायी त्याने इंजिनिअरिंग सोडले. टीव्हीवरील ‘इंडियाज् गॉट टॅलेन्ट’ या कार्यक्रमाच्या पाचव्या सिझनमध्ये ऋषीकेशला त्याची ‘पेपर कट्स’ ही कला जगासमोर सादर करण्याची संधी मिळाली होती. ‘पेपर कट्‌स’ या प्रकारात पातळ कागदावर कटरच्या साहाय्याने कलाकृती कोरुन वर काढण्यात येते. कागद पातळ असल्याने मोठ्या संयमाने कलाकृती कोरावी लागते. यात कागद फाटण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे संयम आणि तितकेच परफेक्शनही आवश्यक असते. छोटी चूक पूर्ण कलाकृती खराब करू शकते. गेल्या चार वर्षांहून अधिक काळ ऋषीकेश या कलाप्रकारात काम करतोय. एक पेपर कट आर्ट तयार करण्यासाठी पाच ते सहा मिनिटांपासून काही तासांचा अवधी लागतो. रचना जितकी जटील तितके त्यावर काम करण्याचे तास वाढतात.

सध्या ऋषीकेश पेपर कट आर्टचे लाईव्ह कार्यक्रम करतो. प्रत्येक कार्यक्रमासाठी ऋषीकेश पन्नास हजारांहून जास्त रक्कम आकारतो. पेपर कट्‌स प्रकारात तो समोरच्या व्यक्तीचे पोट्रेट काही मिनिटांत कागदावर कोरून काढू शकतो. आतापर्यंत देशभरात त्याने दीडशेहून अधिक लाईव्ह कार्यक्रम सादर केले आहेत. अनेक बड्या वाहिन्यांच्या कार्यक्रमातही त्याने ‘पेपर कट’चे सादरीकरण केले आहे. कलेच्या छंदापायी त्याने शिक्षण सोडले आणि याच कलेला आपल्या उपजिविकेचे साधन बनवले. सुरूवातीला शिक्षण अर्धवट सोडल्याने त्याला घरच्यांचा विरोध झाला. पण, या सगळ्यावर मात करत ऋषीकेशने आपली कला जोपासली आणि पुढे नेली. त्याने घडवलेल्या कलाकृतीत अनेक दिग्गजांच्या कलाकृतींचा समावेश आहे.
 
- तन्मय टिल्लू