‘डार्पा’चा मायाबाजार
 महा एमटीबी  09-Feb-2018

‘डार्पा’ म्हणजे ‘डिफेन्स ऍडव्हान्सड् रिसर्च प्रोजेक्ट एजन्सी’ किंवा ‘डी.ए.आर.पी.ए.’ अमेरिकेतली ही संशोधन संस्था अमेरिकन संरक्षण खात्यासाठी म्हणजे पेंटेगॉनसाठी सतत नवनवीन उपकरणं किंवा उपकरणप्रणाली विकसित करण्याचं काम करते. इंटरनेट आणि जीपीएस या प्रणाली मुळात सैनिकी उपयोगासाठीच विकसित झाल्या. आता त्यांचा जास्तीत जास्त उपयोग नागरी कामांमध्ये होत असतो. इंटरनेट आता सगळ्यांनाच माहिती आहे. जीपीएस म्हणजे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम. तुम्ही भूमीवर, आकाशात किंवा सागरावर कुठेही असा, तुमचा नेमका ठावठिकाणा नक्की करण्याचं कामही जीपीएस प्रणाली करते. त्यासाठी ती अवकाशातल्या कृत्रिम उपग्रहांचे साहय्य घेते. आज ही प्रणाली सर्वसामान्यांच्या इतकी आवाक्यात आली आहे की, युरोप-अमेरिकेत प्रत्येक नव्या मोटारीत स्टिअरिंग व्हीलच्या बाजूला जीपीएस प्रणालीचा स्क्रीन असतोच. भारतातही ज्यांच्या खिशात थोडा अधिक पैसा आहे, ते जीपीएस प्रणाली घेऊ शकतात.

तुम्ही जेम्स बॉंडचे चित्रपट नक्कीच पाहिले असतील. जसा बॉंडचा बॉस ‘एम’ असतो आणि तो बॉंडला नव्यानव्या कामगिर्‍या सोपवतो, तसा बॉंडच्या ’एम.आय. ६’ या गुप्तहेर खात्यात एक ‘क्यू’ नावाचाही माणूस असतो. बॉंडला सतत नवीनवी चमत्कारिक उपकरणं पुरवणं हे त्याचं काम असतं. सिगारेट लायटरमधले कॅमेरे, गोळ्या झाडणारं पेन, कुठेही लपवले जाणारे ढेकणांएवढे मायक्रोफोन्स, सिगारेट केस एवढे टेपरेकॉर्डर्स, तोफांएवढे मॉर्टर्स डागणारी मोटार, अशी अद्भुत, जादुई वाटणारी उपकरणं बॉंडपटांसह इतरही गुप्तहेर चित्रपटांमधून वापरलेली आपण पाहिली असतील. गेल्या २०-२५ वर्षांत ही उपकरणं नुसती प्रत्यक्षात आली आहेत. एवढंच नव्हे तर सर्वसामान्यांनाही सहजपणे उपलब्ध झाली आहेत. ही सगळी अमेरिकेची ‘डार्पा’ आणि अन्य देशांच्या तिच्याचसारख्या संशोधन संस्थांची कृपा आहे. १९९६ साली ‘मिशन इम्पॉसिबल’ नावाचा एक गुप्तहेर चित्रपट आला होता. टॉमक्रूझ हा त्याचा नायक होता. आपल्याकडे देव आनंद हा ग्रेगरी पेकची स्टाईल मारायचा. शम्मी कपूर जेम्स डीनची स्टाईल मारायचा, तसा अक्षयकुमार हा टॉमक्रूझची स्टाईल मारतो. हा ’मिशन इम्पॉसिबल’ चित्रपट मुळात १९६६ ते १९७३ पर्यंत दूरदर्शनवर गाजलेल्या त्याच नावाच्या हेरकथा मालिकेचं एकत्रीकरण होतं. त्यात हेरगिरी करणार्‍या नायकाला त्याच्या वरिष्ठांकडून पुढील सूचना किंवा माहिती देणारी एक ध्वनिफित मिळते. त्याने ती ऐकली की, पुढच्या पाच सेकंदात ती आपोआप नष्ट होते. ‘डार्पा’ संशोधन संस्था आता अशा आपोआप नष्ट होणार्‍या इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांच्या संशोधनात व्यस्त आहे. त्यासाठी पेंटेगॉनने ‘डार्पा’ला १७ दशलक्ष डॉलर्सचा निधी मंजूर केला आहे.


अमेरिकेत गुप्तहेरांच्याच नव्हे, तर सामान्य सैनिकांच्याही हाती विपुल प्रमाणात इलेक्ट्रॉनिक उपकरणं असतात. उदाहरणार्थ, अंधारातही दिसू शकणारे काळे चष्मे. इराक, अफगाणिस्तान इथल्या रणभूमींवर लढणार्‍या अमेरिकन सैनिकांकडे अशी अनेक अत्याधुनिक उपकरणं अगदी सर्रास असतात. समजा, ही उपकरणं शत्रूच्या हाती पडली तर? तर अर्थातच शत्रू त्यांचा वापर करणार. एवढंच नव्हे, तर शत्रूपक्षाकडील वैज्ञानिक त्यांच्यावर प्रयोग करून त्यांच्याच सारखी वा आणखी प्रभावी उपकरणं विकसित करणार. मग अशी उपकरणं काढा की, जी ’मिशन इम्पॉसिबल’मध्ये दाखविल्याप्रमाणे रिमोट कंट्रोलने नष्ट करता येतील किंवा ठराविक काळाने आपोआप नष्ट किंवा निरुपयोगी होतील. पेंटेगॉनच्या आदेशानुसार, ‘डार्पा’चे संशोधक आता अशी ‘अंतर्धान पावणारी’ इलेक्ट्रॉनिक उपकरणं विकसित करीत आहेत.

आपल्या पुराणकथांमध्ये वर्णन केलेला मायाबाजार अशा रीतीने प्रत्यक्षात येत आहे. प्राचीन मराठी काव्यामध्ये ‘वत्सलाहरण’ नावाचं एक गमतीदार आख्यान आहे. अर्जुन-सुभद्रेचा मुलगा अभिमन्यू, तसा भीमाला त्याच्या राक्षस वंशीय पत्नी हिडिंबेपासून झालेला मुलगा घटोत्कच. सुभद्रेला अभिमन्यूचे लग्न बलरामाची मुलगी वत्सला हिच्याशी करायचं असतं, पण बलरामवत्सलेचं लग्न दुर्योधनाचा मुलगा लक्ष्मण याच्याशी ठरवतो. पांडव तर बारा वर्षांच्या वनवासात गेलेले. मग सुभद्रा घटोत्कचाला मदतीला घेते. कौरवांचं लग्नाचं वर्‍हाड हस्तिनापूरहून द्वारकेला येताना वाटेत घटोत्कच आणि त्याचे राक्षस मित्र एक ‘मायाबाजार’ उभा करतात.
उत्तमोत्तमदागिने, भरजरी वस्त्रे, वाहन, आसने आणि म्हणाल ती वस्तू तिथे उपलब्ध असते. कौरव आणि त्यांच्या स्त्रिया मोठ्या आनंदात भरपूर खरेदी करतात. लग्न उभे राहाते आणि ऐन मुहूर्ताच्या घटकेला घटोत्कचाच्या एका इशार्‍यासरशी त्या सार्‍या वस्तू अदृश्य होतात. कुणाच्या कानातले, नाकातले, गळ्यातले दागिने एक हिसका मारून नाहीसे होतात.कुणाचा कंबरपट्टा नाहीसा झाल्यामुळे त्याचा पीतांबर खाली घसरतो, तर कुणाचा पीतांबरच नाहीसा झाल्यामुळे त्याचे अंग उघडे होते. लग्नमंडपात कुणाचे आसनच गायब होऊन तो दाणकन जमिनीवर आदळतो, तर मंडपाबाहेर कुणाचा घोडा, कुणाचा हत्ती, कुणाचा रथच अदृश्य झाल्यामुळे तो धुळीत आदळतो. स्त्रियांची अवस्था तर फारच केविलवाणी होते. कौरवांची ही फजिती पाहून यादव मंडळी आणि द्वारकेचे नागरिक हसून-हसून बेजार होतात. या गोेंधळात अभिमन्यू वत्सलेचे हरण करतो.

आधुनिक वत्सलाहरणात किंवा एकंदर मायाबाजारात हा घटोत्कचाचा इशारा म्हणजे रिमोट कंट्रोल, आपल्या हातात असला पाहिजे, अशी पेंटेगॉनची अपेक्षा आहे आणि ती पूर्ण व्हायला अडचण तर काहीच नाही. कारण, अमेरिका विज्ञान-तंत्रज्ञानात जगात सर्वात पुढे आहे, यात काहीच संशय नाही.


आपल्या मनात असं आलं असेल की, हिंदूंच्या पौराणिक कथांमधले चमत्कार आज युरोप-अमेरिका विज्ञानाच्या साहय्याने प्रत्यक्षात आणून दाखवित आहेत आणि आम्ही फक्त पाहा, हे सगळं आमच्याकडे पूर्वी होतंच असं म्हणत बसणार आहोत का? मग, आमच्या कुराणात सगळं आहेच किंवा आमच्या बायबलात जे आहे तेच खरं, असं म्हणणार्‍या मुल्ला-मौलवी आणि बिशप पाद्री यांच्यात नि आमच्यात काय फरक?


असं समजण्याचं अजिबात कारण नाही. आमच्याकडेही अमेरिकन ‘डार्पा’प्रमाणेच अनेक संशोधन संस्था सतत नवनवीव संशोधनात मग्न आहेत. उदा. ‘डीआरडीओ’ उर्फ ‘डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन’ या आपल्या संस्थेने विकसित केलेल्या अत्याधुनिक क्षेपणास्त्रांच्या पल्ल्यात भारताच्या सर्व शत्रूदेशांच्या राजधान्या येतात. ज्येष्ठ वैज्ञानिक आणि माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे अब्दुल कलामयांच्या समर्थ नेतृत्वाखाली आपणही खूप प्रगती केली आहे. अब्दुल कलामांचं ’अग्निपंख’सारखं आत्मवृत्त वाचलंत किंवा डीआरडीओंचं संकेतस्थळ पाहिलंत तरी त्या प्रगतीची कल्पना येईल.
म्हणजे, बरेचदा असं जे म्हटलं जातं की, सज्जन झोपून राहतात आणि दुर्जन जागे राहून संघटितपणे सतत काहीतरी उद्योग करत राहतात नि त्यामुळे तेच नेहमी जिंकतात, हे सर्वस्वी खरं नाही.

फक्त सज्जनांचे राजकारणी नि सज्जनांची प्रचारमाध्यमं ही स्वतःचं परधार्जिणी असल्यामुळे त्यांच्या कर्तबगारीची माहिती त्यांच्या आपल्या माणसांनाच व्हावी तितकी होत नाही.


असो. अमेरिकेची ‘डार्प’ संशोधन संस्था काय काय करतेय हे तिथल्या खुल्या वातावरणामुळे निदान कळतं तरी, पण रशिया, चीन काय करतायत याचा पत्ताच लागत नाही.

***

माजी पोप बेनेडिक्ट

पाच वर्षं कापरासारखी उडून गेली. ११ फेब्रुवारी, २०१३ रोजी पोप बेनेडिक्ट सोळावे यांनी आपला पोपपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला होता, मग २८ फेब्रुवारीला ते प्रत्यक्ष निवृत्त झाले. १३ मार्च २०१३ ला नवे पोप फ्रान्सिस यांनी पदभार स्वीकारला.

गेल्या पाच वर्षांत पोप बेनेडिक्ट यांच्याबद्दल फारसं कुठे काही आलं नव्हतं. कसं येणार ?  एक म्हणजे व्हॅटिकन संस्थेतल्या प्रचंड घोटाळ्यांना कंटाळून बेनेडिक्टनी राजीनामा दिला होता. म्हणजेच कॅथलिक चर्चच्या जगभर पसरलेल्या धार्मिक साम्राज्यात भरपूर घोटाळे आहेत आणि ते निस्तरण्याच्या पलीकडचे आहेत, यावर या राजीनाम्याने शिक्कामोर्तब झालं आणि दुसरं म्हणजे मावळत्या सूर्याला विसरणं हा मनुष्यस्वभावच आहे.

परंतु, एखाद्या पोपने राजीनामा देऊन स्वखुशीने पदावरून बाजूला होणं, हे गेल्या ६०० वर्षांत प्रथमच घडल्यामुळे काही पत्रकारांनी मुद्दाम व्हॅटिकनला भेट दिली. निवृत्तीला पाच वर्षं होत असताना, माजी पोप काय करतात, कुठे राहतात, दिवस कसा घालवतात, याचं त्यांना कुतूहल होतं. ते म्हणजे माजी पोप नि आजी पोप (पक्षी - वर्तमान पोप) यांच्यात कसे संबंध आहेत? बघितलंत, याला म्हणतात पत्रकार! म्हणजे त्यांचे संबंध फारसे बरे नाहीत, असा नुसता वास लागला तरी मथळ्याची जोरदार बातमी तयार!
पण तसं काही घडलं नाही. पत्रकारांना तिथे भेटले आर्चबिशप जॉर्ज गॅन्सविन. ते म्हणाले की, ‘‘बेनेडिक्ट निवृत्त जीवन आनंदात जगत आहेत. ते वाचन, लेखन, पियानो वादन करतात. ठरलेल्या वेळी व्हॅटिकनचं मुख्य चर्च म्हणजे बॅसिलिकामध्ये प्रार्थनेला जातात. दोघे पोप एकमेकांशी नेहमी प्रत्यक्ष किंवा दूरध्वनीवरून संपर्क साधत असतात. बोलणे, भेटणे, गप्पा मारणे आणि सल्लामसलत करणे हे सतत चालूच असते.’’ आर्चबिशप जॉर्ज गॅन्सविन ही दोन्ही पोपना सगळ्यात जवळची अशी व्यक्ती समजली जाते. गॅनस्विन पुढे म्हणाले की,’’आपल्या राजीनाम्याच्या निर्णयाबद्दल बेनेडिक्टना आजही काही दुःख होत नाही आणि जे त्यांच्यावर टीका करतात, त्यांच्याबद्दलही त्यांना काहीही म्हणायचं नाही.’’
 
२००५ ते २०१३ ही पोप बेनेडिक्ट यांची आठ वर्षांची कारकीर्द अनेक चुकीचे निर्णय आणि चुकीचे पायंडे यांनी गाजली. व्हॅटिकन संस्थेतला आर्थिक भ्रष्टाचार आणि देशोदेशींच्या कॅथलिक चर्च संस्थांमधला लैंगिक स्वैराचार यांच्या असंख्य प्रकरणांनी एरवी ’परमिसिव्ह’ मानल्या जाणार्‍या पाश्चिमात्त्य समाजामध्येही खळबळ उडाली. ही प्रकरणे हाताबाहेर गेल्यामुळे बेनेडिक्टनी राजीनामा दिला होता.
 
पण म्हणजे त्यांनी व्हॅटिकन किंवा चर्च संस्था सोडलेली नाही. ख्रिश्र्चन संन्याशाचा पांढरा झगा उतरवून ठेवलेला नाही. त्यांनी जबाबदारीचे पद सोडले, पण पूर्णवेळ धर्मप्रचारकाचा पेशा सोडलेला नाही. मग चर्च संस्थेतला अनाचार रोखण्यासाठी ते कोणतं कार्य करीत आहेत? नव्या पोपबरोबरच्या त्यांच्या सल्लामसलतीत याबाबत कोणता विचार केला जातो? की आशिया-आफ्रिकेतल्या बिगर ख्रिश्र्चनांना पूर्णपणे ख्रिश्र्चन बनवणं याच एककलमी कार्यक्रमावर त्यांचा विचारविमर्श होतो? आर्चबिशप जॉर्ज गॅन्सविन यांच्या मुलाखतीत याबद्दल एकही शब्दही नाही. साहजिकच आहे. व्हॅटिकनचं धर्मपीठ हे केव्हाच जगावर सत्ता गाजवू पाहणारं राजकीय पीठ बनलं आहे आणि कोणतंही राजकीय पीठ आपला पराभव कधीच मान्य करीत नाही.
 
- मल्हार कृष्ण गोखले