ब्लड बॅंक ऑन व्हील्स
 महा एमटीबी  09-Feb-2018

 
 
जनकल्याण रक्तपेढीमधल्या कुरियर सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मासिक बैठक चालु होती. कामकाजाचे विषय झाल्यानंतर मी नेहमीप्रमाणे सर्वांना विचारले, ’आता तुम्हाला काही सांगायचं असेल, विचारायचं असेल तर अगदी मोकळेपणाने बोला.’ यावर काही वेळ जरा शांततेत गेला. प्रथम परस्परांमध्ये थोडी चुळबूळ झाली आणि मग शेवटी काहीशा त्रासिक स्वरात त्यातला एक कुरियरमित्र म्हणाला, ’सर, आम्ही दिवसाला जवळपास सत्तर-ऐंशी किलोमीटर्स फ़िरत असतो. कधी कधी तर याहूनही जास्त. फ़िरण्याचे काही वाटत नाही. पण काही वेळा किरकोळ कारणांसाठी आम्हाला रुग्णालयांमधूनही बोलणी खावी लागतात आणि रक्तपेढीच्या तांत्रिक विभागाकडूनही ऐकून घ्यावे लागते. बऱ्याचदा तर चूक आमची नसतानाही आम्हालाच तोफ़ेच्या तोंडी जावे लागते. यावरच काही करता आले तर पहा.’ अगदी मोकळ्या आणि स्वच्छ शब्दांत त्याने कुरियर सेवेच्या कर्मचाऱ्यांची बाजु मांडली. त्याने उपस्थित केलेला हा मुद्दा विचार करण्यायोग्य होता. पुढे याच मुद्द्यावर काही घटनांच्या आधारे थोडा वेळ ही चर्चा चालली. या सर्वांना योग्य शब्दांत आश्वस्त करत मी बैठक संपवली. पण या विषयावर माझे विचारचक्र मात्र चालुच राहिले.


रक्तपेढीने कुरियरसेवा – हल्ली ज्याचे नामकरण आम्ही ’रक्तदूत सेवा’ असे केले आहे – २०११ च्या सुमारास चालु केली. रक्तपेढीची सुविधा प्रत्येक रुग्णालयात उपलब्ध नसते, किंबहुना पुण्यातील मोजकीच रुग्णालये रक्तपेढीने युक्त आहेत. अन्य सर्व रुग्णालयांतील रुग्णांना जेव्हा रक्तघटकांची आवश्यकता भासते तेव्हा अर्थातच बाहेरील रक्तपेढीतून हे रक्तघटक घेऊन येण्यासाठी रुग्णाच्या नातलगांना सांगितले जाते. अशा वेळी रक्तपेढीच्या शोधापासून सुरुवात होते. मुळात विभक्त कुटुंबपद्धतीमुळे रुग्णाजवळ थांबुन राहणारे नातलग अत्यंत कमी. त्यात अशा काही कामासाठी रुग्णालयाच्या बाहेर पळापळ करायची असेल तर जवळ असणाऱ्या मोजक्या माणसांची खूपच तारांबळ उडते. यात भर म्हणजे हा रुग्ण जर वयाने ज्येष्ठ असेल किंवा बाहेरगांवचा असेल तर मग विचारायलाच नको. या सर्व अडचणींचा विचार करुन या कुरियर सेवेची सुरुवात जनकल्याण रक्तपेढीने केली. म्हणजे रुग्णालयात प्रत्यक्ष जाऊन रक्तघटकांच्या मागणीचा अर्ज (requisition form) आणि रुग्णाचा रक्तनमुना (blood sample) या दोन गोष्टी रक्तपेढीत आणण्याचे आणि डॉक्टरांच्या सांगण्यानुसार रक्तघटक रुग्णालयात नेऊन देण्याचे काम थेट या सेवेव्दारेच होऊ लागले. यामुळे अर्थातच रुग्णांच्या नातलगांची धावपळ थांबली आणि रुग्णांनाही मोठाच दिलासा मिळाला. प्रारंभीच्या काळात बाहेरील एका संस्थेच्या मदतीने (outsourcing) ही सेवा सुरु केली गेली होती, पण वर्षभराच्या आतच रक्तपेढीने यासाठी स्वत:चा कर्मचारी वर्ग नेमला. या सेवेसाठी एका समन्वयकाचीही नियुक्ती केली आणि याच टीमच्या आधारावर आजही पुण्यातील अनेक रुग्णालयांना ही सेवा दिली जाते आहे.

आठ कर्मचारी, प्रत्येकाचा सुमारे सत्तर ते ऐंशी किलोमीटर्स इतका रोजचा प्रवास, सोबत रक्तघटक वाहुन नेण्यासाठी उत्तम सॅक्स, त्यात आईस-बॉक्सेस, सुसज्ज वाहन या सर्व गोष्टींचा अंतर्भाव कुरियर सेवेमध्ये होतो. हे सर्वजण चोवीस तासांच्या कामासाठी बांधलेले आहेत आणि आपली सेवा ही कुणाच्यातरी जीवन-मरणाशी संबंधित आहे याची प्रत्येकाला पुरेपूर जाण आहे. याबरोबरच ’एखाद्या व्यक्तीकडे पैसे नाहीत या कारणासाठी त्याला सेवा नाकारायची नाही’ या जनकल्याण रक्तपेढीच्या सवलतविषयक धोरणाची योग्य पद्धतीने अंमलबजावणी हे रक्तदूतही करत असतात. रोज सुमारे दहा ते पंधरा रुग्णालयांमध्ये प्रत्यक्ष जाऊन येणे, रक्तनमुना अथवा रक्तघटक योग्य तापमानात योग्य त्या ठिकाणी पोहोचेल याची काळजी घेणे, पावत्या करुन पैशांचे व्यवहार काळजीपूर्वक करणे, सातत्याने येणाऱ्या फ़ोन कॉल्समध्ये किंवा विभिन्न प्रकृतीच्या व्यक्तींशी होणाऱ्या संवादांत आपली वाणी संयमित ठेवणे आणि ही सर्व कामे सातत्याने करत राहणे हा सर्व उद्योग वाटतो तितका सोपा नाही. पण मुळातच या सेवेमागील रक्तपेढीचा असलेला मुख्य हेतु या सर्वांनी चांगल्या पद्धतीने समजून घेतलेला असल्यामुळे हे काम सक्षमपणे करण्याची हातोटी यांनी संपादन केली आहे. गंमत म्हणजे सुरुवातीला काही संबंधित जुन्या जाणत्यांनीच ’पिझ्झा डिलिव्हरी’ वगैरेसारखे तद्दन धंदेवाईक प्रकार आपण करु नयेत किंवा ’अन्न व औषध प्रशासन (FDA) याला हरकत घेण्याची शक्यता आहे’ अशी कारणे सांगत अशा सेवेला खरं तर विरोधच केला होता. मात्र नंतर या सेवेची उपयुक्तता लक्षात घेऊन हीच मंडळी अन्य रक्तपेढ्यांना ही सेवा चालु करण्याबाबत आग्रह करु लागली. आता तर शासनाने देखील काही ठिकाणी अशी सेवा देण्यास प्रारंभ केला आहे.


एक लक्षात राहिलेली घटना आहे. मागे एकदा पुण्यातील एका मोठ्या रुग्णालयामध्ये एका महिलेच्या प्रसुति-शस्त्रक्रियेच्या दरम्यान तिला प्रचंड रक्तस्त्राव झाला. वैद्यकीय परिभाषेत याला पी.पी.एच. (Post Partum Hemorrhage) असे संबोधले जाते. या विशिष्ट परिस्थितीत जर वेळेवर रक्तसंक्रमण झाले नाही तर रुग्णाचा जीव जाण्याचा धोका असतो. त्यामुळे रक्तपेढीच्या मुख्य प्रयोगशाळेत पी.पी.एच. ही तीन अक्षरे नुसती ऐकण्याचा अवकाश, की सर्व तंत्रज्ञ हातातले काम सोडुन आधी या रुग्णाचे काम हाती घेतात. या घटनेच्या वेळीही अर्थात अशीच धावपळ झाली. त्यावेळी आमची कुरियर सेवा तशी नव्यानेच सुरु झाली होती. या महिलेच्या जवळही धावपळ करेल असे कुणी नव्हते. मला आजही सांगताना अभिमान वाटतो की या प्रसंगी वेळेवर रक्तघटक पुरविण्याची जबाबदारी आमच्या कुरियर टीमने समजून तर घेतलीच परंतु आपले जेवणखाणेही बाजुला ठेवून ती अत्यंत यशस्वीपणे पूर्णत्वासही नेली. शिवाजीनगर भागात असलेल्या या रुग्णालयात कुरियर सेवेतील तीन ते चार जणांनी केवळ या एका रुग्णासाठी दिवसभर जणू जिवंत साखळी उभी केली होती. कुरियर सेवेच्या समन्वयकाने सेवेतील सुसमन्वय साधण्याचे आपले काम चोख बजावले होते. आवश्यक ते रक्तघटक वेळेच्या आधी रुग्णाजवळ पोहोचविले जात होते. या एकाच रुग्ण महिलेस सुमारे सतरा ते अठरा रक्तपिशव्या यावेळी द्याव्या लागल्या आणि अखेरीस या साऱ्याचे चीज होऊन ही महिला मृत्यूच्या छायेतून बाहेर आली. तेव्हा तिच्या नातलगांनी आणि डॉक्टरांनीही आमच्या या मुलांचे भरभरुन कौतुक केले. अर्थात या महिलेस मिळालेले नवजीवन तिच्या कुटुंबीयांप्रमाणेच आमच्यासाठीदेखील कुठल्या आनंदोत्सवापेक्षा कमी नव्हते.


अशा या रक्तदूतांचे महत्व रक्तपेढी व्यवस्थापन उत्तम रितीने जाणून आहे. रक्तदूतांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जे जे करता येईल ते सर्व करण्यासाठी रक्तपेढी कायमच प्रयत्नशील राहिलेली आहे. त्यांचे शिक्षण, कौशल्यवाढ, तांत्रिक प्रशिक्षण आणि अन्य हलकेफ़ुलके कार्यक्रम या बाबींकडे व्यवस्थापन मनापासून लक्ष देते आणि आपल्या निरंतर परिश्रमाने हे कर्मचारीदेखील या सर्वाचे चीज करतात. या सेवेची सुरुवात झाल्यापासून म्हणजे गेल्या सहा-सात वर्षांत या सेवेत काहीजण जसे सलग काम करत आलेले आहेत तसे काहीजण काही काळासाठी काम करुन अन्य क्षेत्रातही गेले आहेत. मात्र जाणारा प्रत्येक जण जाताना या कामातून मिळालेले आत्मिक समाधान येथून घेऊन गेला आहे आणि अजूनही रक्तपेढीशी संपर्क ठेवून आहे. सुरुवातीच्या काळात कुरियर सेवेचा समन्वयक म्हणून बराच काळ इथे काम केलेल्या आणि आता रक्तपेढीतून जाऊनही बऱ्यापैकी काळ गेलेला आमचा मित्र स्वप्नील तर रुग्णालयांतून क्वचित त्याच्या फ़ोनवर गेलेले महत्वाचे निरोप अजूनही न कंटाळता आणि न विसरता योग्य वेळेत मला सांगत असतो कारण सध्या वेगळ्या क्षेत्रात काम करत असला तरी या ’निरोपांचे’ महत्व तो चांगल्या पद्धतीने जाणून आहे.


बसल्या जागी एखादी मेल पाठविणे आणि तेच पत्र पाकिटात घालुन योग्य त्या व्यक्तीला तो असेल तेथे प्रत्यक्ष नेऊन देणे या दोन्हीमध्ये लागणाऱ्या श्रमांत खूप फ़रक आहे. पत्राच्या किंवा कुठल्याही कागदपत्राच्या बाबतीत इंटरनेटची मदत घेता येऊ शकते. पण कोणतीही वस्तु त्यात ती रक्तघटकांसारखी जगण्या-मरण्याशी संबंधित असेल तर प्रत्यक्ष धावपळ केल्याशिवाय इलाजच नाही. यातील धावपळीचे श्रम, रक्तघटकांची जबाबदारी आणि जोडीला पुन्हा पैशांची जबाबदारी अशी कसरत साधत रक्तदूत आपले काम अधिकाधिक निर्दोष होईल यासाठी प्रयत्न करत असतो. पण क्वचित एखादी कारकुनी स्वरुपाची त्रुटी राहुन जाणे अगदीच अस्वाभाविक नसते. ही त्रुटी कुणाकडुनही राहु शकते. मला आठवते, ’अनिरुद्ध’ नावाचे स्पेलिंग नीट न कळल्यामुळे ’अनुराधा’ असे लिहिले गेले आणि संबंधित रुग्ण ’स्त्री’ की ’पुरूष’ यावरच रक्तपेढीमध्ये गोंधळ सुरु झाला. शेवटी रुग्णालयातूनच हे चुकीचे स्पेलिंग लिहिल्याचे स्पष्ट झाले. या आणि अशा प्रकारच्या त्रुटी कोणाकडूनही राहुन गेल्या तरी लगेच तोफ़ेच्या तोंडी जातो तो हा रक्तदूतच ! त्यामुळे आमच्याकडून एक विषय नेहमी आग्रहाने मांडला जातो तो हा की ’रक्तदूत’ हा प्रत्यक्ष धावपळ करणारा घटक असल्याने त्यांच्याशी संवाद करताना, व्यवहार करताना त्याचा उचित सन्मान राखला गेला तर तो कदाचित तेवढ्यानेदेखील उत्साहाने आणि अधिक तत्परतेने काम करेल.


आपल्या वाहनावर जणू रक्तपेढी घेऊन फ़िरणाऱ्या या रक्तदूतांना आपल्या या कामामुळे अनेक रुग्णांना नवजीवन मिळत आहे, याची पुरेपूर जाणीव असते. त्यामुळे रक्तपेढीमध्ये सर्वाधिक पुण्य कमावणारा हा घटक आहे, असे आम्ही नेहमी म्हणतो.


गोस्वामी तुलसीदास यांनी हनुमंताचं खूप सुंदर शब्दांत आणि यथार्थ वर्णन केलं आहे –
…आनि सजीवन हाथ दई तब लछिमन के तुम प्रान उबारो।
को नहिं जानत है जग में कपि संकटमोचन नाम तिहारो

आमच्या कुरियर कर्मचाऱ्यांना ’रक्तदूत’ म्हणण्यामागची आमचीही भावना अशीच आहे.


- महेंद्र वाघ