मालदीवमधील आणीबाणी मागे घेण्याची अमेरिकेची सूचना
 महा एमटीबी  08-Feb-2018


वॉशिंग्टन : मालदीवचे राष्ट्रपती अब्दुला यामीन' यांनी आपल्या देशात लागू केले आणीबाणी तातडीने मागे घ्यावी, अशी सूचना अमेरिकेकडून देण्यात आली आहे. यामीन यांनी मानवाधिकारांची गळचेपी करू नये, अन्यथा यामध्ये आंतरराष्ट्रीय हस्तक्षेप करण्यात येईल, असा इशारा देखील अमेरिकेकडून देण्यात आला आहे.

यामीन यांनी मालदीवमध्ये आणीबाणी लागू करून नागरिकांच्या अधिकारांचे हनन करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे अशा घटनेला कसल्याही प्रकारचे समर्थन दिले जाऊ शकत नाही. त्यामुळे यामीन यांनी ही आणीबाणी तातडीने मागे घेऊन देशात पुन्हा एकदा संवैधानिक राज्य पद्धत लागू करून देशातील संसदेचे कामकाज पूर्वीप्रमाणे सुरु करावे. अन्यथा यामध्ये आंतरराष्ट्रीय हस्तक्षेप करण्यात येईल, असे अमेरिकेने म्हटले आहे.

गेल्या तीन दिवसांपूर्वी येमेन यांनी मालदीवमध्ये राष्ट्रपती आणीबाणी लागू केली आहे. आणीबाणी लागू केल्यानंतर यामीन यांनी देशांतर्गत असलेल्या अनेक बड्या अधिकाऱ्यांना अटक करून तुरुंगात डांबले आहे. यामध्ये मालदीव सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांचा देखील समावेश करण्यात आला आहे. यावर अमेरिकेबरोबरच संयुक्त राष्ट्र मानवाधिकार संघटनेकडून देखील टीका करण्यात आली आहे.