सरकारला 'चले जाव' म्हणण्याची वेळी आली : संग्राम कोते पाटील
 महा एमटीबी  08-Feb-2018कोल्हापूर : राज्यातील भाजप सरकार हे सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले असून या सरकारच्या मनमानी कारभारामुळे राज्यातील समस्या आता आणखीनच बिकट होऊ लागल्या आहेत. त्यामुळे या सरकारला आता 'चले जाव' असे म्हणण्याची वेळ आली आहे', अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी केले आहे. कोल्हापूर येथे राष्ट्रवादीकडून आयोजित 'एल्गार मोर्चा'मध्ये ते बोलत होते.
लोकसभा निवडणुकांच्या प्रचारा दरम्यान पंतप्रधान मोदींनी देशभर फिरत असताना वर्षाला दोन कोटी युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु पंतप्रधानांच्या या सर्व घोषणा फक्त हवेत विरल्या आहेत. उलट बेरोजगारी कमी होण्याऐवजी वाढली आहे. आज समाजतील सर्व घटकांवर सरकारची दादागिरी सुरु आहे. सत्तेचा एवढ्या मोठ्या प्रमाणात गैरवापर कधी झाला नव्हता, असा आरोप करत पाटील यांनी केंद्र आणि राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.


सरकारच्या निषेधार्थ मोर्चामध्ये गाजराचे हार गळ्यात घालून राष्ट्रवादी कॉंग्रेसने सरकारविरोधात घोषणाबाजी केली. सरकारने कौशल्यविकास संस्थांना निधी द्याव, बंद पडलेली शिष्यवृत्ती पुन्हा सुरू करावी, विद्यार्थ्यांचे मोफत शिक्षण सुरु करावे, पेट्रोल, डिझेल व गॅसचे दर कमी करावेत, बेरोजगारांना रोजगार द्यावा अशा मागण्यांचे निवेदनात यावेळी राष्ट्रवादीकडून कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. तसेच बेरोजगार युवक व विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न लवकर सोडवावेत अन्यथा विधान भवनावर एक लाख तरुणांचा मोर्चा काढू असा इशारा देखील पाटील यांनी यावेळी दिला.