पशू पक्षी आम्हा सोयरे वनचरे
 महा एमटीबी  07-Feb-2018


मुक्या प्राण्यांचा त्यांच्या आपत्कालीन परिस्थितीत विचार करणारी, त्यांच्यावर वेळीच उपचार करणारी पॉज संस्था. पॉज अविरतपणे गेली १७ वर्षे मुक्या प्राण्यांसाठी कार्य करीत आहे. त्यांचे हे कार्य इतरांसाठी आदर्श असे ठरले आहे. भूतदयेचे सर्वोत्तम प्रतिनिधी म्हणून पॉज संस्थेचा विचार करता येईल.
 

खूप वर्षांपूर्वीची घटना आहे. मी आणि माझा लहान भाऊ प्रदीप खेळत असताना अचानक आकाशातून एक कबुतर पडले. ते जखमी होते. मुक्या पक्षाला वेदना व्यक्तही करता येत नव्हती. वाटले की, कबुतराला वाचवले पाहिजे. पण कसे? पशुपक्ष्यांच्या वेदना निवारणासाठीही वैद्यकीय सेवा उपलब्ध असू शकतात, असे ध्यानीमनीही वाटले नाही,पण आम्ही कबुतराला वाचविण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले. त्या मुक्या पक्ष्याला बोलता येत नव्हते पण त्याच्या डोळ्यातले दु:ख आणि कृतज्ञतेचे भाव मनावर कायम कोरले गेले. वाटत राहिले की, माणूस आपले सुखदुःख बोलू शकतो, व्यक्त करू शकतो. स्वतः किंवा इतरांच्या मदतीने त्या दुःखाशी सामनाही करू शकतो. पण आवाज नसलेल्या या पशुपक्ष्यांचे काय? त्यांनाही जीव आहे, संवेदना आहेत. त्यांच्या जखमांना आणि वेदनेला आराम मिळेल असे काही करायला हवे. त्या दिवसापासून पशुपक्ष्यांबद्दल अगदी मनाच्या आतून करूणा, दया दाटून आली. त्यातूनच मग २००१ साली ‘पॉज’ ही संस्था निर्माण केली. पॉज म्हणजे प्लान्ट ऍण्ड ऍनिमल वेल्फेअर असोसिएशन संस्था.’’ संस्थेचे अध्यक्ष संस्थापक निलेश भणगे सांगत होते.


आजस्थितीला ठिकठिकाणी अपघात घडतात पण त्या अपघातग्रस्ताला वैद्यकीय मदत करण्याऐवजी त्या ठिकाणी बघ्यांची गर्दीच दिसून येते. यात भर म्हणूनच की काय काही लोक अपघातग्रस्तांचे फोटो काढण्यास सरसावलेले असतात. यात अपघातग्रस्तांना तातडीने उपचार मिळणे अवघड जाते अर्थात यासाठी अनेक घटक कारणीभूत असतात, पण असा आरोप केला जातो की, काही नाही हो, सध्या माणुसकी लोप पावली आहे, पण या नकारात्मक भावनेला सकारात्मक छेद देत पॉज खूपच सेवाभावी काम करीत आहे.

या संस्थेचे काम पूर्णतः पक्षी, पशूंच्या सेवेशी संबंधित. कधीतरी रस्त्यावर, सोसायटीमध्ये साप, जखमी प्राणी-पक्षी आढळतात. असे काही आढळले की लोकांना पशुपक्ष्यांसंदर्भात काम करणार्‍या संस्था व्यक्ती आठवतात. त्यामुळे ‘पॉज’च्या कामाची व्याप्ती वाढली आहे. पण काही वर्षांपूर्वी मात्र हितचिंतक निलेशना सल्ला द्यायचे, ’’प्राण्यांसाठी काम करण्यापेक्षा माणसांचा जीव वाचविण्यासाठी काम करा.’’ थोडक्यात लोक म्हणत, हे बिनमहत्त्वाचे काम आहे. यातून फायदा काय? पण निलेश म्हणत,’’निसर्गाने सगळ्यांना जगण्याचा हक्क आणि अधिकार दिला आहे. एकमेकांना सहकार्य करून आपण जगले पाहिजे. ’वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्याला हेच तर अभिप्रत असते ना. त्यामुळे कितीही सल्ले मिळाले तरी प्राण्यांबद्दलचे माझे प्रेम, आस्था यात तिळमात्रही फरक पडला नाही.’’ निलेश यांचे म्हणणे खरे होते कारण प्राण्यांच्या बाबतीतील आत्मिक तळमळीमुळेच गेली कित्येक वर्षे त्यांनी प्राण्यांचे संरक्षण व संवर्धनाचे काम केले आहे.

डोंबिवली खूप सुंदर, टुमदार गाव होतं. रस्त्यावर गायी, म्हशी फिरताना दिसायच्या. यासाठी शहरातील लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने या संस्थेने कार्य केले आहे. मानवी हक्क आयोगाने व प्राणीमित्र संस्थांनी एकमेकांशी वाद घालून काम करण्यापेक्षा एकत्ररित्या काम करावे, असे भणगे यांचे म्हणणे आहे. संस्थेच्या वतीने गारुडी तसेच प्राणी खेळ करणार्‍या व्यक्तींना या कामापासून परावृत्त करण्यासाठी त्यांचे पुनर्वसन करण्यासाठीही काम केले जाते. ’नैसर्गिक आपत्ती’च्या काळात आपत्ती ठिकाणी जाऊन तेथील प्राण्यांचे संरक्षण करण्याचे कामही संस्था करते.

सद्यस्थितीला या संस्थेचे मुरबाड येथे इस्पितळ असून येथे प्राण्यांवर शस्त्रक्रियाही करण्यात येत आहेत. १२ कर्मचारी व २०० हून अधिक स्वयंसेवक येथे कार्यरत आहेत. जखमी किंवा आजारी प्राण्यांवरचे नुसतेच उपचार नाहीत तर बेवारस, आसरा नसलेल्या प्राण्यांना घर उपलब्ध करून देण्याचे काम ही संस्था करीत आहे तसेच महाशिवरात्री व नागपंचमी या सणांना शिवपिंडावर वाहण्यात येणारे दूध वाया जाऊ न देता ते गोळा करून भटक्या प्राण्यांना खाऊ घालण्याचा अनोखा उपक्रम या संस्थेच्या वतीने केला जात आहे. प्रत्येक आठवड्याच्या शेवटच्या दिवशी कुत्र्यांना लसीकरण केले जाते. भटक्या कुत्र्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. भटक्या कुत्र्यांना ठार करा, असे सरसकट म्हणणे अयोग्य आहे. भटकी कुत्री आणि त्यांच्यापासून होणारा त्रास यावर कायमच चर्चा केली जाते. पण त्यांना मारण्यापेक्षा त्यांच्या उत्पत्तीवर आळा घालणे गरजेचे आहे. या २००५ साली लिम्का बुकने ही या संस्थेच्या कामाची दखल घेतली आहे. शाळा व विद्यालयात जाऊन ब्युटी विदाऊट क्रूऍलिटी, कम्पॅशिनिएट सीटिझन, कल्चरल अवेरनेसचेही काम ही संस्था करते. तसेच संस्थेच्या वतीने छायाचित्रे प्रदर्शने भरविण्याचे काम केले जाते.

तसेच विशेष मुलांनी बनविलेल्या वस्तू खरेदी करणे व त्या विकण्याचेही काम संस्थेच्या वतीने केले जाते. येणार्‍या काळात केडीएमसी हद्दीतील रुग्णालयीन सुविधा सुकर करण्यासाठी भर देणार असल्याचे भणगे यांनी सांगितले तर प्राण्यांबाबत दया दाखवा आणि काम करा, असे आवाहनही संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

प्राणीमात्रासंदर्भात सर्वतोपरी कार्य करणारी ही संस्था, अनेक अंगाने सामाजिक कामही करते. जसे सापाच्या चावण्याने अपघात तसेच संस्थेचे सर्व स्वयंसेवक हे प्रशिक्षित आहेत व त्यांच्यासाठी प्रशिक्षण घेण्यासाठीचे कार्यक्रमही वरचेवर केले जातात. कल्याण-डोंबिवलीमध्ये वर्षाला ५० मांजरी या दत्तक घेतल्या जातात. या प्रमाणात कुत्र्यांना दत्तक घ्यायचे प्रमाण कमी आहे. या संस्थेत काम करणारे सर्व हे तरुण असून ते स्वतः प्राण्यांची शुश्रूषा करण्याचेही काम करतात. याचबरोबर संस्थेच्या वतीने पावसाळ्यात झाडे लावण्याचा उपक्रम केला जातो. तर भटक्या कुत्र्यांबरोबर जंगली प्राण्यांचे संवर्धनही केले जाते.

नोव्हेंबर २०१० साली संस्थेचे मुरबाड येथे इस्पितळ बांधण्यात आले. यात मुरबाड शहर व ठाणे शहरातील प्राणी आणून त्यांची काळजी घेतली जाते. त्यांच्या निगराणीसाठी २ तज्ज्ञ डॉक्टर्सही येथे कार्यरत आहेत. रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमी प्राण्यांना वाहून नेण्याचे काम केले जाते. काही वेळेस याच रुग्णवाहिकेत प्रथमोपचार देण्याचे कामही केले जाते. तसेच या संस्थेच्या वतीने इतर गरजू संस्थांनाही मदत करण्याचे काम केले जाते. केडीएमसी हद्दीतील रुग्णालयात व्हेंटिलेटर सेवा सुरू करण्यात यावी. सर्पमित्रांसाठी प्रशिक्षण देण्यात येते.संस्था जनजागरणाचेही काम करते. कुठेही अस्ताव्यस्त कचरा टाकून पर्यावरणाला हानी करू नये यासाठी जागृती कार्यक्रम घेतला जातो. आपण पाहतो की, कित्येक लहान मुलं कुत्र्याची, कोंबडीची, मांजरीची पिल्लं उचलून आणतात. पिल्लांची आबाळ होते. यासाठी लहान मुलांना मार्गदर्शन केले जाते. बाटलीत फुलपाखरू बंदिस्त करू नये यासाठी पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येते. पुढील उपक्रमातून सणाच्या निमित्ताने प्राण्यांवर होणारे अत्याचार रोखण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. वर्षाला सुमारे २००० भटक्या कुत्र्यांचे लसीकरणही संस्थेच्या वतीने केले जाते.

२००५ सालच्या महापुरात सुमारे ५०० म्हशी या सोडून देण्यात आल्या होत्या. त्यामधील २०० म्हशींना वाचवून दुर्गाडी किल्ल्यावर नेण्यात आले होते.दत्तक घेतलेल्या प्राण्यांसाठी त्यांच्याशी निगडित वस्तूंचे किटही देण्यात येते. पाळीव प्राण्यांवर होणार्‍या अत्याचाराबाबत माहिती मिळताच त्यांच्या मालकांना न्यायालयीन नोटीस पाठविण्याचे कामही संस्थेच्या वतीने केले जाते.
 
- रोशनी खोत