विलक्षण कार्यकर्ता, यशस्वी लोकनेता
 महा एमटीबी  06-Feb-2018
 

 
पक्ष देईल ती जबाबदारी वनगाजी आनंदाने पार पाडत असत. अफाट लोकसंपर्क असल्यामुळे त्यांना संघटनात्मक किंवा निवडणुकीची कोणतीही जबाबदारी पार पाडताना अडचण येत नसे. त्यांना त्यासाठी फार साधनेही लागायची नाहीत आणि अवघड परिस्थितीवर मात केल्याबद्दल ते कधी बोलूनही दाखवत नसत. असंख्य अडचणींवर मात करत चिंतामण वनगा यांनी आदिवासींची सेवा केली आणि भाजपच्या संघटनात्मक उभारणीत योगदान दिले. अत्यंत शांतपणे आणि निर्धाराने काम करणारे अॅड. चिंतामण वनगा अचानक आपल्याला सोडून गेले. सर्वांच्या मनाला चटका लावून ते गेले.
 
’’वनगाजी, पायातली चप्पल बदला आता, तुटायला आली,’’ मी सांगितले.
’’रवीजी, जाऊ द्या हो. आधी अशी चप्पलही नशिबात नव्हती,’’ अॅड. चिंतामण वनगा यांनी उत्तर दिले.
 
चिंतामण वनगा यांच्या या उत्तरानंतर मी गप्प झालो. अॅड. वनगा आमदार झाले, खासदार झाले, त्यांनी विविध पदे भूषवली, पण त्यांचा साधेपणा कायम राहिला आणि जमिनीशी नातेही घट्टच राहिले. आपण एकेकाळी गरिबीत वाढलो याची त्यांना सदैव जाण होती. ते नेहमी साध्या माणसांमध्ये रमायचे आणि त्यांच्यासारखेच जगायचे.
 
अॅड. वनगा यांचे आयुष्य एखाद्या कादंबरीसारखे होते. त्यांच्या वागण्या-बोलण्यावरून मात्र कोणाला त्यांच्या आयुष्यात किती नाट्य घडले याचा अंदाज यायचा नाही. नम्रपणा आणि साधेपणा ही त्यांची वैशिष्ट्ये होती. बोलायचेही कमी. शांतपणे मत मांडायचे. त्यांना वाद घालताना कधी कोणी पाहिले नाही.
 
जुन्या ठाणे जिल्ह्यातील तलासरीला विश्व हिंदू परिषदेच्या आश्रमशाळेत ते वाढले. ‘शाळेत वाढले’ म्हणायचे कारण म्हणजे, त्यांनी तेथे शिक्षण तर घेतले, पण शाळेचे संस्कार त्यांच्या व्यक्तिमत्त्वात पूर्ण रुजले. अत्यंत गरिबीत, प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेतले. भोवतालच्या आदिवासी समाजाच्या समस्या आणि अनंत अडचणींचा त्यांनी अनुभव घेतला. मग वास्तवाची ती जाण अखेरपर्यंत त्यांच्या वागण्याबोलण्यात कायम राहिली. म्हणून नवी चप्पल घेण्याऐवजी शक्य तेवढी जुनीच वापरण्याचा प्रकार घडत असे. परिषदेच्या शाळेत शिकल्यामुळे संघटनेच्या कार्यसंस्कृतीचे संस्कार त्यांच्यावर बालपणीच झाले आणि ते संस्कारही कायमच राहिले.
 
अॅड. वनगा मितभाषी आणि मृदुभाषी होते खरे, पण त्या व्यक्तिमत्त्वाच्या आड त्यांचा ठाम निर्धार लपलेला होता. हा निर्धार तसा कधी जाणवायचा नाही. पण प्रसंग आला की, त्यांचा निश्चय दिसून येत असे. एकदा एखादे काम ठरवले की ते कामपूर्ण होईपर्यंत त्याचा अथक पाठपुरावा करत राहायचा, हा त्यांचा स्वभाव होता. कितीही अडचणी आल्या तरी ते हटत नसत. शांत चेहर्‍याच्या आणि कमी बोलणार्‍या या माणसाचा इतका वज्रनिर्धार असेल असे कधी वाटतही नसे. वनगाजींचा निर्धार मी अनुभवला आहे. मी २०११ साली भाजप महाराष्ट्र प्रदेश संघटनमंत्री म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यावेळी चिंतामण वनगा विधानसभेचे आमदार होते. त्यापूर्वी त्यांची दोनवेळा लोकसभेचे खासदार म्हणून निवडही झाली होती. संघटनेच्या कामाच्या निमित्ताने वनगा यांच्याशी संवाद होत असे. ते शांतपणे ऐकून घेत, पटकन विषय समजून घेत आणि एकदा काही ठरले की तो विषय तडीला नेल्याशिवाय राहत नसत. कामाचा पाठपुरावा करताना त्यांचा निर्धार जाणवत असे. त्यांच्या नम्रतेसारखाच तो त्यांच्या मूळ स्वभावाचाच भाग होता.
 
नम्र निर्धाराचा हा गुणविशेष वनगा यांच्या व्यक्तिमत्त्वात कायम राहिला. त्यामुळेच ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण आदिवासी भागात राहून त्यांनी उच्च शिक्षण घेतले. ते बीए, एलएलबी होते. मुंबई विद्यापीठात त्यांनी शिक्षण घेतले. काही वर्षे वकिली केली. ठामनिर्णय आणि कठोर परिश्रमहेच त्यांचे भांडवल होते, ज्याच्या जोरावर त्यांनी असंख्य अडचणींवर मात करत उच्च शिक्षण घेतले. आयुष्याचा हा टप्पा गाठल्यानंतर आता वकिली करत सुखाने आयुष्य जगणे शक्य होते. तसे करणे त्यांचा अधिकारही होता, पण त्यांच्या शांत, नम्र चेहर्‍याच्या आतील चळवळ्या स्वभाव गप्प बसू देत नव्हता. मुख्य म्हणजे आपण ज्या ग्रामीण आदिवासी परिसरात वाढलो तेथील गोरगरिबांचे सामाजिक देणे लागतो याची जाणीव त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यातूनच ते भारतीय जनता पार्टीच्या कामात आले.
 
त्या काळात ठाणे जिल्ह्याचा ग्रामीण भाग म्हणजे कम्युनिस्टांचा बालेकिल्ला होता. आदिवासींच्या पाड्यापाड्यांवर कम्युनिस्टांचे जाळे होते आणि विरोधात जाईल त्याची घरे जाळून टाकण्याची दहशत होती. ग्रामपंचायतीच्या निवडणुका म्हणजे कम्युनिस्टांचाच खेळ होता. गोदाताई परुळेकर, अहिल्या रांगणेकर अशा समर्पित कम्युनिस्ट कार्यकर्त्यांमुळे त्या पक्षाची प्रतिमाही चांगली होती आणि जनाधार होता. दहशत आणि जनाधाराच्या कम्युनिस्टांच्या मिश्र औषधाचा परिणाम असा होता की, ठाणे जिल्ह्यात त्यांच्या विरोधात संघ विचाराने प्रभावित नेत्याला उभे राहणेही अशक्य होते. गोरगरीब आदिवासींना वास्तव समजून द्यायचे, त्यांचे गैरसमज दूर करायचे आणि त्यांना राष्ट्रीय विचारांच्या प्रवाहात आणायचे, हे जवळजवळ अशक्यच काम होते. अशा वातावरणात ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात भाजपचा झेंडा अॅड. चिंतामण वनगा यांनी फडकावला. ते १९९० ते १९९६ ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष होते. त्यांच्या जोडीला आता राज्याचे आदिवासी विकासमंत्री असलेले विष्णू सावरा यांचे प्रयत्न आहेत. आज पालघर लोकसभा मतदारसंघ, जिल्ह्यातील पाचपैकी डहाणू आणि विक्रमगड हे दोन विधानसभा मतदारसंघ, पालघर जिल्हा परिषद आणि अनेक ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकत आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांना डोकेही वर काढू न देणारे कम्युनिस्ट आपले जुने वैभव कसे लयाला गेले याची चिंता करत आहेत.
 
सदैव लोकांमध्ये राहणे, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणे, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी रात्रंदिवस धडपड करणे, पैशापेक्षा माणसे जोडणे हा चिंतामण वनगा यांचा स्वभाव होता. राजकारणात यशापयशाचा खेळ चालू राहिला तरी त्यांचे वागणे-बोलणे कधी बदलले नाही. १९९६ साली ते त्यावेळच्या डहाणू लोकसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून आले. त्यानंतर १९९८च्या निवडणुकीत थोडक्यात पराभूत झाले. पुन्हा १९९९ साली मोठ्या मताधिक्याने निवडून आले. २००४ साली त्यांना डहाणूमध्ये पराभव सहन करावा लागला. २००९च्या विधानसभा निवडणुकीत ते विक्रमगड मतदारसंघात भाजपचे उमेदवार म्हणून विजयी झाले. २०१४ साली लोकसभा निवडणुकीत पक्षाने मोठ्या विश्वासाने त्यांना पालघर मतदारसंघात उमेदवारी दिली आणि भरभक्कममताधिक्याने त्यांनी निवडणूक जिंकली. पक्ष देईल ती जबाबदारी ते आनंदाने पार पाडत असत. अफाट लोकसंपर्क असल्यामुळे त्यांना संघटनात्मक किंवा निवडणुकीची कोणतीही जबाबदारी पार पाडताना अडचण येत नसे. त्यांना त्यासाठी फार साधनेही लागायची नाहीत आणि अवघड परिस्थितीवर मात केल्याबद्दल ते कधी बोलूनही दाखवत नसत.
 
 
असंख्य अडचणींवर मात करत चिंतामण वनगा यांनी आदिवासींची सेवा केली आणि भाजपच्या संघटनात्मक उभारणीत योगदान दिले. अत्यंत शांतपणे आणि निर्धाराने काम करणारे अॅड. चिंतामण वनगा अचानक आपल्याला सोडून गेले. सर्वांच्या मनाला चटका लावून ते गेले. आपल्या समाजासाठी आणि संघटनेसाठी समर्पित असलेला कार्यकर्ता म्हणून त्यांचे मनामनातील स्थान मात्र कायमचे अबाधित राहील.
 
 
 
- प्रा. रवींद्र भुसारी 
(लेखक भाजप महाराष्ट्राचे माजी प्रदेश संघटनमंत्री आहेत.)