मुघल उद्यान आजपासून सामान्य जनतेसाठी सुरु
 महा एमटीबी  05-Feb-2018
 
 
 
 
 
 
नवी दिल्ली: दरवर्षी सामान्य नागरिकांसाठी खुले करण्यात येणारे राष्ट्रपती भवनातील मुघल उद्यान हे आजपासून सामान्य नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे. साधारण एक महिन्यासाठी हे उद्यान दरवर्षी खुले करण्यात येते. यावर्षी हे उद्यान ६ फेब्रुवारी ते ९ मार्च पर्यंत खुले ठेवण्यात येणार आहे.
 
 
 
 
 
विविध फुलांच्या जातींनी रंगलेले हे उद्यान भारतीयांसाठी एक आकर्षणाचा बिंदूच आहे. राष्ट्रपती भवनाला लागुनच या उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे. राष्ट्रपती भवनाचे सौंदर्य खुलवण्यात हे उद्यान महत्वाची भर घालत असते. या उद्यानात विविध प्रकारची फुले पाहायला मिळतात. गुलाबाच्या एकूण १३५ जाती या उद्यानात नागरिकांना पाहायला मिळतात.
 
 
 
पिवळा, काळा, लाल, निळा, गुलाबी, पांढरा अश्या विविध रंगांचा गुलाब या उद्यानात पाहायला मिळतो. या उद्यानात बोन्सायची झाडे, म्युझिकल कारंजी, आध्यात्मिक उद्यान, हर्बल उद्यान, फुलपाखरु उद्यान अश्या विविध प्रकारची उद्यान तिथे पाहायला मिळतात. त्यामुळे पर्यटकांची आणि नागरिकांची गर्दी देखील बऱ्याच प्रमाणात तेथे पाहायला मिळते.