प्राप्तीकर सवलती साठीची गुंतवणूक
 महा एमटीबी  03-Feb-2018


 

 

रोहन खराडी येथील एका नामांकित आयटी कंपनीत नोकरी करत असून त्याचे वार्षिक उत्पन्न सुमारे १५ लाख इतके आहे. दरवर्षीप्रमाणे डिसेंबर महिना सुरु झाला कि आपण ८० सी व अन्य कर सवलत पात्र काय गुंतवणूक केली आहे याची माहिती योग्य त्या पुराव्यानिशी देण्याबाबत देण्याची सूचना एच आर विभागकडून दिली गेली, आत्ता पर्यंत या बाबत फारसा विचार न केल्याने रोहनची प्राप्तीकर वाचविण्यासाठी गुंतवणूक करण्यासाठी धावपळ सुरु झाली. बऱ्याचदा घाई गडबडीत केवळ कर बचत होतेय म्हणून चुकीची गुंतवणूक होत असल्याचे दिसून येते. परंतु एक जागरूक गुंतवणूकदार म्हणून रोहनने सेक्शन ८० सीच्या अंतर्गत उपलब्ध असणाऱ्या पर्यायांची माहिती घेणे अत्यंत आवश्यक आहे. ८० सी अंतर्गत असलेल्या अनेक पर्यायांपैकी पीपीएफ, लाईफ इंश्युरंस, एनएससी, कर सवलतीस पात्र असणारी ५ वर्षे मुदतीची ठेव, सुकन्या समृद्धी ठेव योजना हे पर्याय बहुतेक सर्वाना माहित असतो तथापि इएलएसएस किंवा एनपीएस हे पर्याय आजही बहुतेकांना फारसे माहित नाहीत. यातील काय आहे इएलएसएस हा पर्याय हे आज आपण पाहू व पुढील लेखात एनपीएस बाबतची सविस्तर माहिती घेऊ.

ईएलएसएस हा म्युचुअल फंडाचा डायव्हरसीफायीड इक्विटी फंड असून यातील गुंतवणूक ८० सी नियमानुसार रु.१५०००० पर्यंत कर सवलतीस पात्र असते. इएलएसएस मध्ये आपण कितीही गुंतवणूक करू शकता आपण मात्र केवळ १५०००० लाख पर्यंतची गुंतवणूक ८० सी अंतर्गत करसवलतीस पात्र असते. या गुंतवणुकीस ३ वर्षांच्या लॉक इन पिरीयड असतो, म्हणजे सुरवातीची तीन वर्षे आपण यातील रक्कम काढू शकत नाही मात्र तीन वर्षानंतर रक्कम काढायलाच पाहिजे असे बंधन नाही. सर्व म्युचुअल फंड इएलएसएस ही सुविधा गुंतवणुकदाराना देऊ करतात. यातील गुंतवणूक प्रामुख्याने शेअर बाजारात केली जाते त्यामुळे या गुंतवणुकीतून मिळणारा परतावा हा शेअर मार्केटच्या परताव्या प्रमाणे कमी अधिक होत असतो , असे असले तरी शेअर बाजारातील दीर्घ कालीन गुंतवणुकीतून १३ ते १६ % इतका परतावा मिळत असल्याचे दिसून येतो. ८० सी च्या अन्य पर्यायातून (उदा : इन्शुरन्स, एनएससी, पीपीएफ,बँकठेव, सुकन्या समृद्धी ठेव) सध्या जेमतेम ५ ते ८.३% इतकाच परतावा मिळत आहे त्या दृष्टीने कर बचतीसाठी गुंतवणूक करताना इएलएसएस पर्याय स्वीकारणे निश्चितच फायदेशीर आहे. आता आपण ४ प्रमुख म्युचुअल फंडांच्या इएलएसएसच्या गुंतवणुकीतून मिळालेले रिटर्न पाहू


फंडाचे नाव

गेल्या १ वर्षातील रिटर्न

गेल्या ३ वर्षातील रिटर्न

गेल्या ५ वर्षातील रिटर्न

डीएसपीबीआर इएलएसएस फंड

२३.४१%

१५.९८%

२१.४१%

बिर्ला सन लाइफ इएलएसएस फंड

२१.७५%

१८.११%

२२.१४%

फ्रान्क्लीन इएलएसएस फंड

१४.४७%

१५.४८%

१९%

रिलायन्स इएलएसएस फंड

३८.८%

१२.७%

२३.१%

 

वरील टेबलवरून आपल्या असे लक्षात येईल कि ८० सी च्या अन्य पर्यायांपेक्षा इएलएसएस मधील गुंतवणूक निश्चितच जास्त रिटर्न देऊ शकते आणि म्हणून कर बचतीसाठी केवळ पीपीएफ किंवा एनएससी, लाइफ इंश्युरंस पोलिसी अशा पारंपारिक पर्यायांचाच विचार न करता जास्तीतजास्त रक्कम इएलएसएस मध्येच गुंतविणे योग्य राहील, यातील गुंतवणूक रोहन एसआयपी पद्धतीने सुद्धा करू शकतो, रोहनने जर आपण दरवर्षी रु.१ लाख पीपीएफ मध्ये सलग गेली १५ वर्षे गुंतविले तर त्याला प्रचलित व्याजानुसार रु. २६.३३ लाख इतकी रक्कम मुदती नंतर मिळेल ( व्याज दर जर कमी होत गेले तर ही रक्कम याहूनही कमी असेल.) याउलट जर रोहनने रु.१लाख सलग गेली १५ वर्षे इएलएसएस मध्ये गुंतविले तर मुदती नंतर रक्कम रु. ५० लाख ते रु.८०लाखाच्या दरम्यान झालेली असेल. नेमकी रक्कम किती असेल ते सांगता येणार नाही मात्र ही रक्कम पीपीएफ मधील गुंतवणुकीपेक्षा नक्कीच जास्त असेल असे आतापर्यंतच्या अनुभवावरून म्हणता येईल. उदा: जर एखाद्याने मार्च १९९९ पासून दर वर्षी त्यावर्षी असलेल्या मर्यादेइतकी रक्कम पीपीएफमध्ये मार्च २०१७ पर्यंत गुंतवली असेल तर या १९ वर्ष्याच्या कालावधीतील एकूण गुंतवणूक रु.१६६०००० इतकी असेल व मार्च २०१७ अखेर पीपीएफ वरील वेळोवेळी बदललेल्या व्याजानुसार रु. ३४१६१७२.५३ एव्हढी रक्कम जमा झाली असेल या उलट नेमकी तेव्हढीच रक्कम दर वर्षी फ्रान्क्लीन टेम्पलटन या म्युचुअल फंडाच्या ईएलएसएस योजनेत गुंतविले असतील तर १९ वर्षा नंतर रु.१,२७,१४,९८३.७३ एव्हढी रक्कम जमा झाली असेल.

वरील विवेचनावरून असे लक्षात येईल कि प्राप्तीकर बचतीच्या उद्देशाने गुंतवणूक करताना म्युचुअल फंडाचा इएलएसएस हा एक अत्यंत फायदेशीर व सुलभ पर्याय आहे व या पर्यायाचा रोहनने निश्चितच विचार करणे आवश्यक आहे व केवळ पारंपारिक पर्याय निवडणे टाळले पाहिजे मात्र त्यासाठी थोडी जोखीम घायची तयारी असावी.

सुधाकर कुलकर्णी

सर्टिफायीड फायनान्सियल प्लॅनर, पुणे.