गरज ओळखा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Feb-2018
Total Views |

उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातील प्रेमगंज गावामधल्या लग्नाच्या उंबरठ्यावर असलेल्या तरुण-तरुणींनी तसेच त्यांच्या कुटुंबाने समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. तो असा की, लग्न ठरवताना आधी एचआयव्हीच्या चाचणीला पहिले प्राधान्य द्यायचे मग आणि मगच कुंडली, अर्थात पत्रिका बघायची. प्रेमगंज गावातील लग्नाच्या बेडीत अडकलेल्या काही जोडप्यांना एचआयव्हीची लागण झाल्यामुळे त्यातून धडा घेऊन तिथल्या गावकर्‍यांनी हा निर्णय घेतला आहे. लग्नाचं वय झालं की वधू-वरांची शोध मोहीम सुरू केली जाते. प्रेमविवाह असो किंवा रितसर कांदेपोह्याचा कार्यक्रम; लग्न ठरवताना आपल्याकडे पत्रिका बघण्याला नेहमीच प्राधान्य दिले जाते. अर्थात, पत्रिका बघूच नये, अशी विचारसरणी रूजवायला हवी, असा हेतू नसला तरी एका नव्या नात्याला सुरुवात करताना एका विशिष्ट चौकटीपुरता विचार न करता इतर गोष्टींचा विचार करणे तितकेच गरजेचे असते. किंबहुना, त्या करायलाच पाहिजे. मुलगा किंवा मुलीचे लग्न जमल्यानंतर कुटुंबातील इतर सदस्य, मित्रपरिवार एक प्रश्न मात्र आवर्जून विचारत असतो तो म्हणजे पत्रिका पाहिली होती ना? खरंतर लग्नानंतर वधू-वरांचे भविष्य कसं असेल हे पत्रिका बघून ठरवलं जातं. अर्थात, काळजीपोटी काही गोष्टींची खबरदारी घेणे हे योग्यच आहे. पण, त्याच्यापलीकडे जाऊन इतर गोष्टी ध्यानात घेतल्या पाहिजेत. साधारणपणे, मुला-मुलीचे वय, उंची, शिक्षण, नोकरी, कौटुंबिक पार्श्वभूमी यावरच जास्त भर दिला जातो. पण, त्यापलीकडे जाऊन मुला-मुलींचे स्वभाव जुळणे, त्यांच्या आवडी-निवडी, एक जोडीदार म्हणून त्यांच्या असणार्‍या अपेक्षा जाणून घ्यायला हव्या. अर्थात पूर्वी लग्न ठरवताना एकमेकांचे स्वभाव जुळतात की नाही, याचा फार विचार होत नसे. मग ‘आमच्यावेळेस असं फॅड नव्हतं,’ असं म्हणणारी काही जुनी मंडळी पाहायला मिळतात. पण आता परिस्थिती, काळ बदलला आहे. आजची मुलं स्वतंत्र विचारसरणी असलेली असल्यामुळे त्यांचा आयुष्याकडे बघण्याचा एक स्वतंत्र दृष्टिकोन आहे. त्यामुळे त्यांच्या भावनांचा, विचारांचा आदर हा करायला हवा. मग नात्यामध्ये गुंतल्यानंतर वाद, क्षुल्लक कारणांवरून वाद-विवाद निर्माण होणार नाही. कोणतंही नातं हे विश्वासाच्या जोरावर टिकत असतं. त्या नात्यातला गोडवा संवाद साधून, आदर करूनच टिकत असतो. लग्न हा आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. त्यामुळे समजूतदारपणा दाखवून निर्णय घेतलेलाच बरा.


मुंबईच आघाडीवर...

महाराष्ट्रात आलेल्या बाहेरच्या राज्यांतील लोकांना नोकर्‍या मिळतात, पण इथल्या भूमिपुत्रांना, मराठी माणसाला नाही, असा ज्वलंत चर्चेचा मुद्दा नेहमीच उपस्थित केला जातो. पण, परराज्यांतील तर सोडाच, परदेशांतील नागरिकांनाही मुंबईत चांगल्या पगाराच्या नोकर्‍या मिळत असल्याचे वास्तव समोर आले आहे. भारताची आर्थिक राजधानी असलेली ’मुंबई’ विदेशी कर्मचार्‍यांना पगार देण्यात जगात प्रथमस्थानावर असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. एक काळ असा होता की, कोट्यवधींचा पगार देण्यात अमेरिका तसेच युरोपीय देश अव्वल असायचे. आता मात्र २१व्या शतकामध्ये मुंबईने सर्वच देशांना मागे टाकत प्रथमस्थान पटकावले आहे. परदेशांतील नागरिकांना मुंबईत चांगल्या पगाराच्या नोकर्‍या मिळत असल्याचे वास्तव ’एचएसबीसी बँक इंटरनॅशनल लिमिटेड’च्या सर्वेक्षणानुसार समोर आले आहे. इतर देशांच्या तुलनेत मुंबईत विदेशी कर्मचार्‍यांना अधिक मानधन दिले जाते. एचएसबीसीच्या अहवालानुसार मुंबईत कामकरणार्‍या विदेशी नागरिकांचे वार्षिक उत्पन्न सरासरी २.१७ लाख डॉलर म्हणजेच १.४० कोटी आहे. हा आकडा ’ग्लोबल एक्सपर्ट ऍव्हरेज’पेक्षा दुप्पट आहे. या सर्वेक्षणामध्ये आघाडीच्या दहा देशांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये शांघाय, जकार्ता आणि हॉंगकॉंग यांसारख्या अन्य आशियाई देशांचा समावेश आहे. एचएसबीसीच्या सर्वेक्षणानुसार, एक कोटी ८० लाख कोटींपेक्षा अधिक लोकसंख्या असणार्‍या मुंबईत रोजगाराच्या संधी अमेरिका आणि ब्रिटनपेक्षा कमी आहेत. अमेरिका आणि युरोपमधील नोकर्‍या आर्थिकदृष्ट्या आणि तांत्रिकदृष्ट्या आकर्षक असतात. तसेच आपल्या कौशल्याला पुढील पातळीवर पोहोचविण्यास मदत व्हावी, म्हणून या देशांत नोकरी मिळविण्यासाठी नोकरवर्गाची नेहमीच धडपड सुरू असते, पण असे असतानाही मुंबईनगरी जगात आपले वैशिष्ट्यपूर्ण स्थान टिकवून ठेवण्यामध्ये अग्रेसर ठरली आहे. मुंबईत रोज बाहेरून ये-जा करणार्‍यांची संख्या आणखी तीस लाखांच्या घरात गेली आहे. हे सारेच रोजगार मिळविण्याच्या आणि त्यातूनच आपले जीवन पुढे घडविण्यासाठी मुंबईत दाखल होतात. ९०च्या दशकापासून जगाबरोबरच मुंबईच्याही व्यापारी आणि सामाजिक वातावरणात बदलाचे वारे वाहू लागले आहेत. एकेकाळच्या मराठी माणसांच्या तसेच भूमिपुत्रांच्या मुंबापुरीत येणार्‍या काळात कोणाचे वर्चस्व असणार, हे माहीत नाही. पण, मुंबईला नेहमीच विशिष्ट कालखंडानंतर परिवर्तनाला सामोरं जावं लागलं आहे. परंतु, याही परिस्थितीत मुंबईची रोजगार निर्मितीची गंगोत्री कधीच आटणार नाही. ही उतरंड अशीच अमोघ राहणार, यामध्ये काही दुमत नाही.




- सोनाली रासकर
@@AUTHORINFO_V1@@