The Dying Art of Disagreement
 महा एमटीबी  28-Feb-2018



काही महिन्यांपूर्वी The New York Times मधील ‘The Dying Art of Disagreement’ या नावाचा एक सुंदर लेख वाचनात आला. अर्थात लेखाचा रोख अमेरिकेतील तत्कालीन परिस्थितीच्या संदर्भातील होता. पण आज राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने लेखातील मला भावलेल्या एका वाक्याने एका नवीन विषयावर लिहिण्यासाठी प्रेरणा दिली. ते वाक्य असं आहे – ‘Every great idea is really just a spectacular disagreement with the some other great idea.’ सामाजिक संदर्भासोबातच हे वाक्य मला विज्ञानाच्या प्रगतीची दिशा दर्शविणारे देखील वाटले. Rutherford च्या प्रयोगाने Dalton च्या Atomic Model सोबत disagreement दर्शविली. Newtonian Mechanics च्या मर्यादा आईनस्टाईन यांच्या सापेक्षतावादाने दाखवून दिल्या. या सगळ्या विज्ञान क्षेत्रातील ‘disagreements’ च नाहीत काय? आणि यामुळेच तर विज्ञानाची प्रगती कशी झाली याचे आपण साक्षी आहोतच.

संस्कृतमध्ये एक सुंदर वचन आहे – ‘वादे वादे जायते तत्त्वबोधः’. शेवटी विज्ञान तरी काय आहे? सभोवताली घडणाऱ्या घटनांची सुसंगत मांडणी करण्याची प्रक्रिया म्हणजेच विज्ञान. आता प्रत्येक वेळी ही मांडणी सर्वार्थाने परिपूर्ण असतेच असे नाही किंवा ती परिपूर्ण करण्याची प्रक्रिया म्हणजेच ‘वैज्ञानिक प्रगती’ होय. आणि ही प्रक्रिया साध्य होते ती निरपेक्ष चर्चेतून. आता चर्चा आली म्हणजे ‘वाद’ आलाच. अर्थात ‘वाद’ हा शब्द कायम नकारात्मक दृष्टीनेच का पहिला जातो हे मला माहित नाही पण बहुतेक त्या ‘वादा’मागचा उद्देश हा त्याची सकारात्मकता / नकारात्मकता ठरवत असावा. कोणत्याही ‘established’ गोष्टी सोबत दाखवलेली disagreement हा ‘वाद’ सुरु करते. मग ती गोष्ट establish करणाऱ्याच्या आणि तिला ‘follow’ करणाऱ्या समूहाच्या ego ला धक्का बसतो. यातून एका संघर्षाला सुरुवात होते. यातला सामाजिक किंवा राजकीय पैलू तात्पुरता सोडून देऊयात किंवा तो या लिखाणाचा उद्देश नाहीच. आपण आता हीच प्रक्रिया विज्ञानाच्या संदर्भातून बघूयात. कोणीतरी एक एखादा सिद्धांत अभ्यास करून मांडतो. मग वेगवेगळ्या तत्कालीन कसोट्यांवर त्याची पडताळणी होते आणि काही काळ तो सिद्धांत सर्वमान्य होतो. मग आणखी कोणी एक डोकं चालवतो आणि वेगळ्याच पद्धतीच्या एखाद्या प्रयोगातून त्या ‘established’ सिद्धांताला आव्हान देतो. कालानुरूप त्यावर चर्चा होऊन, त्याची सत्यता पडताळून हळूहळू हा नवीन मांडलेला सिद्धांत जुन्या प्रस्थापित सिद्धांताची जागा घेतो. विज्ञान क्षेत्रातील ही प्रक्रिया म्हणजे एका चिरंतन सत्याचं आपल्याला वेगवेगळ्या स्तरांवर होत असलेलं आकलन होय. म्हणजे एका अंतिम सत्याचे आकलन अधिक चांगल्या पद्धतीने आपल्याला होत राहते. पण म्हणून सध्याच्या क्षणाला मान्य असलेले सिद्धांत परिपूर्ण असत नाहीत किंवा अधिक परिपूर्ण सिद्धांत मांडला गेला म्हणून मागील सिद्धांत कमी दर्जाचा ठरत नाही. कारण तो त्याच प्रक्रियेतली एक पायरी असते. आता ‘वादा’च्या नकारात्मक प्रवासाची सुरुवात होते ती इथेच. नव्याने मांडलेला सिद्धांत हा केवळ ‘established’ सिद्धांताशी सहमत नाही म्हणून तो श्रेष्ठच किंवा तो ‘established’ सिद्धांताशी सहमत नाही म्हणून चुकीचाच हे दोन्हीही मार्ग ‘वैज्ञानिक’ अजिबात नाहीत. आणि दुर्दैवाने हे दोन्हीही अवैज्ञानिक मार्ग आज प्रामुख्याने अनुसरले जातात असं दिसून येईल.

आता यावर ‘वैज्ञानिक’ म्हणतील की मग याचा आमच्याशी काय संबंध? खरं आहे.. ‘वैज्ञानिकां’चा याच्याशी संबंध नाहीच कारण विज्ञान क्षेत्र हे ‘निसर्गातील मूलतत्वांचा वेध’ या दिशेने कार्यरत असते, ज्यामध्ये व्यक्तिगत वैचारिक भूमिकेला काही स्थान नसते अशी एक सर्वमान्य समजूत आहे. पण ही आदर्श स्थिती आज अस्तित्वात आहे का, असा प्रश्न मला तरी पडलेला आहे. (अर्थात ही पण एक disagreement असू शकते.)

अगदी अलीकडच्या काळात Nature मध्ये बनावट शोधपत्रिका आणि नियतकालिकांची संख्या वाढत असल्याची माहिती देणारे लेख प्रकाशित झाले आहेत. (मार्च आणि सप्टेंबर २०१७) हे लेख हेच दर्शवितात की आता या ‘वादा’त आम्ही वैज्ञानिकही मागे नाही. आणि म्हणूनच ‘आमचा काय संबंध?’ असा प्रश्न विचारणाऱ्या वैज्ञानिकांनी याचे उत्तर द्यावे.

याच संदर्भात एक थोडा वेगळा अनुभव सांगावा वाटतो आहे. काही दिवसांपूर्वी एक सुंदर ‘शास्त्रसभा’ ऐकण्याची संधी मिळाली होती. ज्यामध्ये एका खूप interesting विषयावर चर्चा झाली. कोणतीही नवीन गोष्ट समजून घेण्याची प्रक्रिया कशी असते या संदर्भात भारतीय परंपरेतील न्याय शास्त्राला अनुसरणारी ती चर्चा होती. कोणतीही नवीन fact सहजासहजी स्वीकारली न जाता त्या संदर्भात आपल्याला माहिती असलेल्या पूर्व संदर्भांसोबत तुलना अखंड होत राहते हा त्या चर्चेचा गाभा होता. हीच प्रक्रिया विज्ञानाला सुद्धा लागू होते नाही? जोपर्यंत उपलब्ध माहितीला छेद देणारे नवीन निरीक्षण समोर येत नाही तोपर्यंत जुन्या सिद्धांतालाच ‘सत्या’चे स्थान असते. पण त्याला छेद देणारी एखादी नवीन गोष्ट समोर आली तरी आधी ज्ञात माहितीच्या आधारावरच नव्याची तुलना होत राहते. या चर्चेचा इथे उल्लेख अशासाठी की Art of disagreement कशाला म्हणायचं याचं सुंदर उदाहरण ती चर्चा होती. दोन्ही बाजूंनी विवेकी विचार, उद्देशाशी एकनिष्ठा आणि निष्कर्ष स्वीकारण्याची प्रामाणिकता या पायावर जी चर्चा होईल ती एखाद्या सुंदर कलाकृतीपेक्षा कमी असेल काय? पण दुर्दैवाने अशा सुंदर कलाकृती आज नामशेष होत आहेत आणि त्यात विज्ञान क्षेत्रही मागे नाही याचं दुःख वाटतं.
असो.. यानिमित्ताने ‘वैज्ञानिक’ आणि ‘वैज्ञानिकता’ यावर एकदा नव्याने विचार करण्याची गरज अधोरेखित करावीशी वाटली यासाठी लिहिण्याचा हा प्रयत्न. बाकी मी काही ‘वैज्ञानिक’ नव्हे त्यामुळे यावर बोलण्याचा काय अधिकार वगैरे प्रश्न निर्माण होतीलच जे परत एकदा ‘the art of disagreement is dying’ हे सिद्ध करतील. अर्थात ‘सोयीस्कर विज्ञानवादी’ असणाऱ्यांना ‘वैज्ञानिक’ तरी म्हणायचं का हा प्रश्नच आहे. आणि परत एकदा इथेही disagreement ला वाव आहे. अर्थात ‘आम्ही नाही त्यातले’ ही पळवाट कायमस्वरूपी उपलब्ध असतेच. अर्थात असे सगळे प्रश्न आणि मुद्दे ‘ethics’ पाशी येऊन थांबतात. पण शेवटी ethics म्हणजे पण स्वतःच्या चुकीच्या मार्गावर जाण्यासोबत असणारी disagreement च नाही का? किमान ती disagreement तरी जिवंत ठेवण्याचा संकल्प आजच्या विज्ञान दिनी करूयात.
- शर्वरी कुलकर्णी