बुद्धिबळातली राणी...
 महा एमटीबी  28-Feb-2018

बुद्धिबळ आणि भारतीय बुद्धिबळपटू म्हटले की साहजिकच विश्वनाथन आनंद या जगज्जेत्याचे नाव डोळ्यासमोर येते. पण, बुद्धिबळाच्या या खेळात महिलाही तितक्याच अग्रेसर. अशीच एक चाणाक्ष बुद्धिबळपटू म्हणजे तानिया सचदेव...


बुद्धिबळाचा खेळ म्हणजे चलाखीचा, डावपेचांचा... काहींना अगदी लहानपणापासूनच या बुद्धिबळाच्याकाळ्या-पांढर्‍या चौकटींचा पट आणि सोंगट्या आकर्षित करतात. तानियालाही अशीच लहानपणापासून बुद्धिबळाची आवड. तिच्या आईने तिला वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी बुद्धिबळाच्या नियमांशी अवगत करून दिले. तानियाचे बुद्धिबळाचे हे धडे केवळ घरगुती किंवा चार भिंतींपर्यंत मर्यादित राहू नये म्हणून तिच्या पालकांनी तिला बुद्धिबळाचे रीतसर प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला. मग काय, आवड आणि त्यात कौशल्याची भर पडत गेली आणि तानिया बुद्धिबळाच्या डावपेचांत तरबेज झाली. तिचा खेळ लहानपणीच इतका उत्कृष्ट होता की, वयाच्या आठव्या वर्षी तानियाने सर्वप्रथमआंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धेत आपले नाव कोरले. के. सी. जोशी यांच्या प्रशिक्षणाखाली बुद्धिबळाच्या खेळाचे बळ तानियाला मिळत गेले. बुद्धिबळाच्या या आवडीपोटी तानियाच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होणार नाही, याची काळजीही तिच्या पालकांनी घेतली आणि फलस्वरूप तानियाने देशात आणि विदेशातही आपल्या खेळाची वैशिष्ट्यपूर्ण छाप सोडली. लहानपणीच कित्येक बुद्धिबळाच्या स्पर्धांमध्ये तानियाने आपले नाव कोरलेच, पण जसजशी ती मोठी होत गेली, तिचा खेळ अधिकाधिक खुलत गेला आणि तानिया सचदेव हे नाव भारतीय बुद्धिबळाच्या पटलावर परिचयाचे झाले.


१२ वर्षांखालील बुद्धिबळाची स्पर्धा, एशियन यु-१४ मुलींची चॅम्पियनशीप अशा अनेक मानाच्या स्पर्धांमध्ये तानियाने आपल्या कामगिरीने लोकांंना तोंडात बोटं घालण्यास भाग पाडले. २००५ साली वुमन ग्रँडमास्टरचा किताब पटकावणारी तानिया आठवी महिला ठरली. भारतातील महिलांसाठीच्या बुद्धिबळाच्या स्पर्धेवरही २००६ आणि २००७ अशी सलग दोन वर्षं तानियाने आपला दबदबा कायमठेवला. २००७ मध्ये आशियाई चॅम्पियनशीपचीही ती मानकरी ठरली. बुद्धिबळाच्या क्षेत्रातील दिल्लीतील तानियाची ही नेत्रदीपक कामगिरी पाहता अर्जुन पुरस्काराने २००९ साली तिला सन्मानित करण्यात आले. तानियाच्या यशाचा आलेख इथवर संपत नाही, तर २०१६ साली रेकजॅविक ओपन आणि कॉमनवेल्थ महिलांच्या बुद्धिबळ स्पर्धेतही तानियाच अव्वल ठरली. तिचा एकटीचा खेळ उत्तमहोता, पण टीम चेस स्पर्धेतही तानियाने आपल्या खेळाने सर्वांची मने जिंकली.


अशा या बुद्धिबळाच्या राणीचे युट्यूबवरही बुद्धिबळाच्या डावपेचाविषयी मार्गदर्शन करणारे व्हिडिओज प्रसिद्ध आहेत. अनेक बुद्धिबळप्रेमी तानियाची ‘चेक-मेट’ खेळी शिकण्यासाठी तिच्या व्हिडिओजना पसंती देतात. २०१४ साली तानिया विवाहबद्ध झाली असली तरी बुद्धिबळ खेळणे आणि इतरांना त्याची गोडी लावण्यामध्ये ती आजही अग्रेसर आहेच. बुद्धिबळाबरोबरच तानिया एक प्रशिक्षित नृत्यांगनादेखील आहे. तिला वाचनाबरोबरच खरेदीचीही भरपूर आवड आहे. तेव्हा, पालकांनीही आपल्या मुलांना अभ्यास एके अभ्यास असे एकांगी गुंतवून न ठेवता, खेळ, कला अशा मानवी व्यक्तिमत्त्वाला पैलू पाडणार्‍या घटकांकडेही लक्ष द्यायला हवे. मग तो बुद्धिबळासारखा खेळ असो वा अन्य कला. तेव्हा, तानियासारखे आज अनेक आदर्श समाजात आहे, फक्त त्यांची निवड मात्र आपल्याला करायची आहे.


- विजय कुलकर्णी