मराठी भाषेचे समृद्ध अंतरंग
 महा एमटीबी  27-Feb-2018
इंग्रजी ही जागतिक भाषा आहे आणि तिचे वाङ्मय समृद्ध आहे. पण वाङ्मयाच्या दृष्टीने नव्हे, तर भाषेच्या दृष्टीने विचार केला, तर मराठीचे अंतरंग कसे समृद्ध आहे, याचा विचार या लेखात आला आहे. यात इंग्रजीचा अधिक्षेप करण्याचा हेतू नाही.
मानवी भाषा ध्वनींची बनलेली आहे. विशिष्ट भाषेतील ध्वनींना ‘स्वनिम’ असे म्हणतात. मराठीत भाषेचे किती स्वनिम आहेत, हे मुळाक्षरांवरून आणि इंग्रजीतील स्वनिम अल्फाबेटस्वरून कळते.
स्वनिमांच्या दृष्टीने मराठी भाषा निश्चितच शास्त्रशुद्ध व समृद्ध आहे.
 
१) मराठी भाषेत जेवढे स्वनिम तेवढी लिपिचिन्हे म्हणजे मुळाक्षरे आहेत. ‘अ’ हे स्वनिम वेगळे, ‘आ’ हे स्वनिम वेगळे. हे दोन ध्वनी वेगळे आहेत. इंग्रजीत या दोन्ही स्वनिमांना मिळून एकच ध्वनिचिन्ह ‘ए’ (अ) आहे. त्यामुळे अंबा (देवी) व आंबा, घर आणि घार (पक्षी), धर आणि धार (प्रवाह) या वेगवेगळ्या शब्दांचे स्पेलिंग एकच लिहावे लागते.
 
२) मराठीत एका स्वनाचा एकच उच्चार अशी शास्त्रशुद्ध रीत आहे. ‘कूस’ ला मराठीत ‘कस’ किंवा ‘तर’ ला तूर असे कधीच उच्चारत नाही. त्यांचे उच्चार निश्चित आहेत. इंग्रजीत मात्र असा नेमकेपणा नसून नुसता गोंधळ आहे. उदा. ‘बट’ आणि ‘पुट’ यात ‘यु’ हा एकच स्वर आहे. पण, बटसारख्या शब्दात ‘यु ’चा उच्चार ‘अ’ करतात आणि ‘बट’ (परंतु) म्हणतात, तर ‘पुट’ (ठेवणे) सारख्या शब्दात त्याच स्वराचा उच्चार ‘उ’ असा करून ‘पुट’ म्हणतात. ‘यु’ हा जर एकच स्वर आहे तर ‘बट’ ला ‘बट’ व ‘पुट’ला ‘पट’ का म्हणू नये? मराठीत कोणत्याही स्वराचा उच्चार कोणत्याही शब्दात एक व सारखाच होत असतो. इंग्रजीत मात्र ‘सी’ चा उच्चार कधी ‘क’ तर कधी ‘स असा होत असतो. उदा. ‘कॅच’मध्ये ‘सी’चा उच्चार ‘क’ आणि ‘सेंटर ’मध्ये ‘स. ’
 
३) ‘ळ’ हा स्वनिमच इंग्रजीत नाही. यामुळे गाल आणि गाळ यांचं ‘जीएएल’ असं एकच स्पेलिंग लिहावं लागतं आणि बाळाच्या गालाला गाळ बनवावं लागतं.
 
४) मराठीत सर्व स्वनिमांचा उच्चार अपरिहार्यपणे होत असतो. शब्दात अनुच्चारित विनाकारण स्वनिम कधीच येत नाहीत. उच्चार कमल असा करायचा व लिहायचं मात्र ‘खकमळ’ असं कधीच होत नाही. इंगजीत तेही होतं. उदा. जज या शब्दात ‘ड’ या स्वनाचा उच्चार कुठेच नाही, पण स्पेलिंगमध्ये ‘डी’ आहे. राईट (बरोबर)मध्ये ‘जीएच’चा उच्चार नाही, पण स्पेलिंगमध्ये ते लिहिण्यात येतात. ज्यांचा उच्चारच नाही ते लिहायचेच कशाला?
 
५) अनुनासिकाचा विचार केला, तर मराठीत पाच अनुनासिके आहेत आणि इंग्रजीत फक्त दोनच आहेत. त्यामुळे उच्चाराच्या दृष्टीने इंग्रजीत शास्त्रीयता नाही. अनुनासिके शीर्षबिंदूंनीही दाखवली जातात. उदा. सन्त- संत, पम्प-पंप. आता ‘गंगा’ हा शब्द पाहा. तो ‘गन्गा’ असाही लिहिता येत नाही किंवा ‘गम्गा’ असाही लिहिता येत नाही कारण त्याचा उच्चारच भिन्न आहे. त्याचा उच्चार ‘गङ्गा’ असा आहे. प्राचीन वाङ्मयात ‘गंगा’ हा शब्द ‘गङ्गा’ असाही लिहिलेला आढळतो. कारण त्याचा उच्चारच तसा आहे. त्याचे उच्चारस्थान कंठ्य आहे, तर ‘न’ चे उच्चारस्थान दंत्य आणि ‘म’ चे ओष्ठ्य आहे. ‘ग’चे उच्चारस्थान कंठ्य असल्यामुळे त्याला न् किंवा म् ही अनुवासिके जोडता येत नाहीत. ही सूक्ष्मता इंग्रजीत नाही.
 
स्वनिम विशिष्ट क्रमाने एकापुढे एक ठेवल्यास त्यातून शब्द तयार होतात. उदा. ‘कमळ’ क्रम बदलला की ‘मकळ’ होईल, तो शब्द होणार नाही. अशा शब्दांचा विचार केला, तरी मराठीचे अंतरंग अधिक समृद्ध असल्याचे दिसून येते.
 साधा ‘पाणी’ हा शब्द पाहा. इंग्रजीत पाण्याला ‘वॉटर’ म्हणतात. ‘वॉटर’ला दुसरा पर्यायी शब्द नाही. मराठीत मात्र पाण्याला-
१. जल, २. उदक, ३. नीर, ४. अंबु, ५. तोय, ६. आब एवढे पर्यायी शब्द आहेत. ‘आब’ हा संस्कृत ‘आप’ शब्दाचा अपभ्रंश होय. त्यावरूनच झेलम, चिनाब, रावी, व्यास व सतलज या पंच नद्यांचे ‘आब’ जिथून वाहते तो प्रदेश म्हणजे ‘पंच+आब= पंजाब’ असे नाव पडले.
 
आता शब्दांचे अर्थ पाहू या. वॉटर म्हणजे पाणी हा एकच अर्थ वॉटरला आहे. मराठीत ‘पाणी’ या शब्दाला कितीतरी अर्थ आहेत- १. पाणी म्हणजे जल, उदक. २. पाणी म्हणजे हात- चक्रपाणी म्हणजे ज्याच्या हातात चक्र आहे तो. ३. पाणी म्हणजे धमक- त्याच्यात बिलकूलच पाणी नाही. ४. पाणी म्हणजे तेज- तिच्या चेहऱ्यावर पाणी आहे. ५. पाणी म्हणजे धार-शिवाजी महाराजांच्या तलवारीचं पाणी तिखट होतं.
 एकाक्षरी शब्दांमुळे शब्दांचा मूल अर्थ कळतो. इंग्रजीत ‘आय’ या शब्दाचा अपवाद वगळता एकाक्षरी शब्द नाहीत. मराठीत कितीतरी एकाक्षरी शब्द आहेत- १) ‘ज’- म्हणजे जन्मलेला, सर:+ज = सरोज म्हणजे तलावात जन्मणारे (कमळ), अंबु+ज = अंबुज म्हणजे पाण्यात जन्मणारे (कमळ), नीर+ज = नीरज म्हणजे पाण्यात जन्मणारे (कमळ), पंक+ज = पंकज म्हणजे चिखलात जन्मणारे (कमळ) खनि+ज = खनिज म्हणजे खाणीत जन्मणारे, पूर्व+ज =पूर्वज म्हणजे पूर्वी जन्मलेले, अग्र+ज = अग्रज म्हणजे आधी जन्मलेले. कुसुमाग्रज म्हणजे कुसुमच्या आधी जन्मलेला मोठा भाऊ, अनु+ज= अनुज म्हणजे नंतर जन्मलेला. रामानुज म्हणजे रामचा धाकटा भाऊ, द्वि+ज= द्विज म्हणजे दोनदा जन्मणारे. प्रथम अंडे व नंतर पिलू असे पक्ष्यांचे दोनदा जन्म होतात म्हणून द्विज म्हणजे पक्षी.
 
२) ‘ग’ - म्हणजे चालणारे, फिरणारे. एक कावळा उष्टं खाऊन पुष्ट झाला. त्यानं समुद्र उल्लंघनाची गरुडाबरोबर पैज लावली. दोघंही समुद्राच्या मध्यभागी आल्यावर कावळ्याचं बळ संपलं. आधारासाठी त्यानं इकडेतिकडे पाहिलं पण त्याला झाडं, पर्वत कुठंच दिसेना. मोरोपंत आर्येमध्ये लिहितात, ‘न दिसे अग नग मग तग खग पक्ष काय काढील?’ अ+ग = अग म्हणजे न चालणारे (वृक्ष), न+ग = म्हणजेही न चालणारे (पर्वत) ख+ग = खग म्हणजे आकाशात फिरणारे (पक्षी) ख म्हणजे आकाश हाही एक अक्षरी शब्द. ३) ‘द’ = देणारे. सुखद म्हणजे सुख देणारे, दुःखद म्हणजे दुःख देणारे, वरद म्हणजे आशीर्वाद देणारे. वरदहस्त = वर देणारा हात, ‘पुंडलिक वरदा हरि विठ्ठल’ ४. ‘प’ = पालन करणारे, गोप म्हणजे गार्इंचं पालन करणारे गुराखी, नृप म्हणजे नराचं पालन करणारा (राजा), भूप म्हणजे भूमीचं पालन करणारा (राजा).
 
मराठी भाषेचे अंतरंग असे समृद्ध आहे. म्हणूनच संत ज्ञानेश्वर म्हणतात की, अमृत व मराठी यांच्यात मधुरतेची पैज लावली तर मराठी अमृतालाही जिंकेल! महानुभाव कवी नरेंद्राने मराठीची आईप्रमाणे पूजा केली. अन्य भाषेत लिहू नये, असा दंडकच महानुभावांचे आचार्य भटोबास यांनी घालून दिला होता. ही सारी मराठी माणसं, पण पोर्तुगालचा फादर स्टीफन्स गोव्यात आला आणि मराठी शिकला. तो म्हणतो, ‘‘पक्ष्यांमध्ये जसा मोर तशी मराठी सर्व भाषांमध्ये थोर आहे!’’ पण, आमची आजची काही मराठी माणसं मात्र इंग्रजीच्या तुलनेत मराठीला तुच्छ समजतात.
 
आपली आई असते. ती विश्वसुंदरी नसेल, प्रगाढ ज्ञानी नसेल, उत्तम नर्तिका नसेल, श्रेष्ठ गायिका नसेल, तरी जगातल्या सर्व स्त्रियांपेक्षा आपले उत्कट, नितांत एकनिष्ठ प्रेम आपल्या आईवरच असते. मराठी आपली आई आहे. आईवर प्रेम करा, आईवर प्रेम करा...!
 
डॉ. मनोहर रोकडे
नागपूर