कुसुमाग्रज
 महा एमटीबी  27-Feb-2018
मागच्या वर्षी आमच्या शाळेचा अमृतमहोत्सव साजरा झाला. त्यात एक छोटी नाटिका आमच्या एका ग्रुपने बसवली होती. मराठीचा तास स्टेजवर उभा केला होता आणि त्या तासात कुसुमाग्रजांची 'कणा' ही कविता सादर केली होती.


त्यात रसग्रहण नव्हतं. कुसमुग्रजांच्या कवितेचं रसग्रहण करायची वा त्यावर दोन शब्ददेखील लिहायची पात्रता आमच्या कोणाचीही नाही त्यामुळे त्या फंदात आम्ही कोणी पडलो नाही. मात्र शंभरएक वर्षाहुन जास्त काळ आधी जन्माला आलेल्या एखाद्या कवीची कविता माझ्या नंतरची पिढीसुद्धा सादर करते, 'नटसम्राट' ह्या चित्रपटाला २०१७ सालीसुद्धा मराठी प्रेक्षक उत्तम प्रतिसाद देतात किंवा व्हॅलेंटाईन डे ला 'प्रेम कर भिल्लासारखं' कुठेतरी वाचायला मिळतंच- कुसुमाग्रजांचं साहित्य समकालीन आणि सर्वकालीन असल्याचा पुरावा ह्याहून अधिक चांगला काय असू शकतो!


लिखित स्वरूपात हजारभर वर्षं अस्तित्वात असलेल्या मराठी भाषेचा दिन साजरा होण्यासाठी शिरवाडकरांचा जन्मदिवस निवडला गेला ह्यात कुसुमाग्रजांचा जितका बहुमान आहे तितकंच सद्भाग्य त्यांच्या साहित्यावर प्रेम करणाऱ्या वाचकांचं आहे. कुसुमाग्रजांच्या शब्दांच्या श्रीमंतीला हा मानाचा मुजरा आहे.


सामाजिक माध्यमातून मराठीत लिहिणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एकामागोमाग एक दर्जेदार साहित्यकृती आजही निर्माण होत आहेत. आणि ह्या सर्वामागे शिरावडकरांसारख्या अनेकांची पूर्वपुण्याई आहे.


मागच्या आठवड्यात जागतिक मातृभाषा दिवस साजरा केला गेला. आज महाराष्ट्राचा मातृभाषा दिवस- जागतिक मराठी दिन आहे. जगातल्या प्रत्येक भाषेच्या सन्मानार्थ असा एक दिवस असावाच आणि संपूर्ण वर्षभरात त्या त्या भाषा, त्यातलं साहित्य वृद्धिंगत होत जावो.


'लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी' ह्या इतकंच 'लाभले आम्हांस भाग्य वाचतो मराठी' हेही असायला हवं. अनेक महनीयांनी उत्कृष्ट साहित्य निर्मिती करून वाचकांना फार मोठी देणगी दिली आहे. मराठी भाषा दिनानिमित्त हा वारसा पुढे न्यायची सर्व मराठी जनतेवर एक सामुदायिक जवाबदारी आहे.


आजच्या दिवसाच्या निमित्ताने कुसुमाग्रजांना मानवंदना आणि मराठी भाषा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!


- सारंग लेले