सातार्‍यातली एक ‘बीजमाता’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Feb-2018
Total Views |
 
 


आज गावरान बियाण्यांचं महत्त्व शेतकर्‍यांना पटू लागलं आहे, पण चांगल्या दर्जाची गावरान बियाणी उपलब्ध होणं, हे एक मोठं आव्हान बनलं आहे. म्हणून आज भारतीताईंचा हा उपक्रम महत्त्वाचा ठरतो.
 
आज शेतीमध्ये संकरित आणि जनुकीय बियाण्यांचा सर्रास वापर होत असल्याने बियाण्यांच्या पारंपरिक जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. ती नष्ट होऊ न देणं ही काळाची गरज आहे. भारतात काही अत्यल्प शेतकरी असे आहेत ज्यांनी नैसर्गिक बियाणी जतन करून ठेवली आहेत आणि त्यांचा ते प्रसार करतात. सातार्‍यातल्या भारती स्वामी या अशाच अत्यल्प शेतकर्‍यांपैकी एक आहेत. आज सुमारे साडेपाचशे प्रकारच्या गावरान बियाण्यांचा संग्रह त्यांच्याकडे आहे.
 
शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या भारतीताईंचा नागेश स्वामी यांच्याशी विवाह झाला. सातार्‍यातील उंब्रज या गावात हे जोडपं सेंद्रिय शेती करतं. शेतीमध्ये त्यांनी सुरुवातीला बाजारातील सुधारित बियाणी वापरून पाहिली. परंतु, त्याचे तोटे लक्षात आल्यानंतर त्यांनी नैसर्गिक बियाणी गोळा करण्याचा ध्यास घेतला. साधारण १५ वर्षांपूर्वी त्यांनी चार-पाच बियाणी मिळवून या उपक्रमाला सुरुवात केली. स्वत:च्या शेतात ती वापरून पाहिली आणि अतिशय कमी खर्चात चांगले उत्पादन मिळते, हा अनुभव त्यांना आला. यानंतर त्यांनी जिथे जिथे मिळतील तिथून तिथून त्या गावरान बियाणी गोळा करत गेल्या आणि आज १५ वर्षांनंतर त्यांच्याकडे साडेपाचशे प्रकारच्या बियाण्यांचा संग्रह आहे. यामध्ये खपली गहू, गट्टी ज्वारी, काळी कुसळी भात अशी धान्ये; पिवळा मूग, हिरवा मूग अशी कडधान्ये; फुल कारलं, सांबार घेवडा, देशी दोडकं अशा वेलवर्गीय भाज्या; रानचाकवत, पोकळा, कांदळी अशा पालेभाज्या; आंबुशी, पुनर्नवा, पाचरी अशा रानभाज्या; अशी आज पाहायलाही मिळणार नाहीत अशी बीजे आहेत. ही बियाणी नेण्यासाठी आजूबाजूचे अनेक शेतकरी भारतीताईंकडे येत असतात.
 

 
 
भारतीताईंनी बचतगटाच्या माध्यमातून एक ‘बीज बँक’ स्थापन केली आहे. या बीजबँकेमार्फत नैसर्गिक बियाण्यांचा संग्रह आणि वाटप केले जाते. भारतीताईंच्याच कल्पनेतून सेंद्रिय शेती करणार्‍या ३५ शेतकर्‍यांचा ‘मोकाट कृषी विद्यापीठ’ नावाचा गट स्थापन झाला आहे. चांगल्या दर्जाच्या बियाण्याचं आपापसांत वाटप करणं, शेतीविषयक ज्ञानाची देवाणघेवाण करणं, उत्पदनांचं एकत्र मार्केटिंग करणं अशा गोष्टी या गटामार्फत केल्या जातात. या विद्यापीठामध्ये ५४ प्रकारच्या रानभाज्यांवर सध्या संशोधन सुरू आहे. शेतीसंशोधन हे प्रयोगशाळेत होऊ शकत नाही, ते प्रत्यक्ष शेतातच होऊ शकतं, या भावनेने प्रेरित होऊन या गटाने ‘मोकाट कृषी विद्यापीठ’ असं आपलं नामकरण केलं आहे. संघर्ष करण्यापेक्षा स्वत: एक भक्कमउदाहरण म्हणून उभं राहण्याला भारतीताई पसंत करतात. याकामी त्यांचे पती नागेश स्वामी यांची मोलाची साथ राहिली आहे.
 
हरितक्रांतीनंतर जास्त उत्पादन मिळविण्याच्या अपेक्षेने संकरित बियाणी बाजारात आली आणि भारतातले बहुतांश शेतकरी ती विकत घेऊन शेती करू लागले. संकरित बियाण्यातून मिळणारं धान्य पुन्हा बियाणं म्हणून वापरता येत नसल्यामुळे शेतकर्‍यांना दरवर्षी ते बाजारातून विकत घेणं भाग पडलं. शिवाय संकरित बियाण्यांना खते आणि किटकनाशके आवश्यक असल्याने शेतीचा उत्पादनखर्च प्रचंड वाढला. दुसर्‍या बाजूला गावरान बियाण्यांचा शेतकर्‍यांकडून वापर पूर्ण थांबल्याने त्यांचं अस्तित्वच नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला. नैसर्गिक बियाणी सर्वांत जास्त रोगप्रतिकारक्षम असतात. ती शेतकर्‍याला विकत घ्यावी न लागल्यामुळे उत्पादनखर्च कमी होतो. या फायद्यांमुळे आज गावरान बियाण्यांचं महत्त्व शेतकर्‍यांना पटू लागलं आहे, पण चांगल्या दर्जाची गावरान बियाणी उपलब्ध होणं, हे एक मोठं आव्हान बनलं आहे. म्हणून आज भारतीताईंचा हा उपक्रममहत्त्वाचा ठरतो. शेवटी, ‘‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी.’’
 
 
 
 
- हर्षद तुळपुळे 
 
@@AUTHORINFO_V1@@