'हे' हिंदी नाही मराठी चित्रपटाचं पोस्टर आहे!
 महा एमटीबी  26-Feb-2018


 
मराठी चित्रपटांमध्ये सध्या बरेच वेगवेगळे प्रयोग होताना दिसत आहेत. यातले काही प्रयोग फसतात तर काही यशस्वी होतात. याच प्रयोगांमधला पुढचा प्रयत्न म्हणून कदाचित एप्रिल महिन्यात एक 'हॉट' चित्रपट मराठीत येऊ घातला आहे. 'शिकारी' असं या मराठी चित्रपटाचं नाव असून, आज या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. प्रसाद ओकने सोशल मीडियावर हे पोस्टर पोस्ट केलंय.
 
 
 
आशयघन चित्रपट म्हणून मराठी चित्रसृष्टीकडे नेहमीच पहिले जाते. त्यामुळे कदाचित हे पोस्टर बघितल्यावर अनेक मराठी रसिकांच्या भुवया उंचावल्या जातील. चित्रपटाचं नाव 'शिकारी' आहे आणि पोस्टरवर एक महिला दाखवण्यात आली आहे, त्यामुळे आता नक्की कोणाची शिकार होणार आणि शिकारी कोण आहे असे प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाहीत. अजून चित्रपटातील अभिनेता-अभिनेत्रीबद्दल उलगडा झालेला नाही. पण ज्या अर्थी प्रसाद ओक ने हे पोस्टर सोशल मीडियावर प्रसिद्ध केलं आहे, त्याअर्थी तो या चित्रपटाचा भाग असणार. त्याचबरोबर प्रसादने मृण्मयी देशपांडे, सुव्रत जोशी, भारत गणेशपुरे, भाऊ कदम व वैभव मांगले या कलाकारांना या पोस्ट मध्ये टॅग केलं आहे, कदाचित हे सर्व या चित्रपटाचा भाग असू शकतात.
 
विजू माने याने 'शिकारी'चे दिग्दर्शन केले असून महेश मांजरेकर या चित्रपटाचे प्रेझेंटर आहेत. येत्या २० एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होईल. आणखी एक लक्षवेधी बाब म्हणजे या पोस्टर वर 'एप्रिल मध्ये हिट वाढणार' असे स्लोगन देण्यात आले आहे. त्यामुळे हा चित्रपट 'सेक्स' संदर्भात असल्याची दाट शक्यता निर्माण झाल्याशिवाय राहात नाही. खरंच या विषयाला केंद्रस्थानी ठेऊन चित्रपट प्रदर्शित झाला तर मराठीसाठी हा एक वेगळा व धाडसी प्रयोगच म्हणावा लागेल. पण या प्रयोगाला प्रेक्षक किती प्रतिसाद देतील हे येणारा काळच ठरवेल...