प्रिय 'श्री', हे काय वय असतं का ग जाण्याचं ?
 महा एमटीबी  26-Feb-2018

कालच्या दिवसभरात 'शॉकिंग' हा शब्द सोशल मीडियावर जास्तच ट्रेंडिंग मध्ये होता, त्याचं कारणही अगदी तसच होतं. लोकप्रिय अभिनेत्री श्रीदेवी हिने अचानक आपल्यातून 'एक्झिट' घेतली आणि सर्वाना खरोखरीच 'शॉक' बसला. तिच्या या अकस्मिक जाण्याने तिच्या एका चाहत्याने थेट तिलाच एक उत्तर न मिळणारा आर्त प्रश्न विचारला आहे...


'श्री', चौपन्न - पंचावन्न हे काय वय असते का ग जाण्याचे? काही वर्षापूर्वी आलेला “इंग्लिश विंग्लिश” बघितल्यावर वाटले होते की आता तुझी तिसरी इनिंग सुरु होणार आणि ती देखील तू तुझ्या आधीच्या दोन्ही इनिन्ग्ससारखी गाजवणार. पण परमेश्वराच्या मनात काहीतरी वेगळेच होते आणि त्याने तुला बोलवून घेतले. खर तर आता तुला तुझ्या मुलींची इनिंग बघायची उत्सुकता लागली असणार पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. सदमा बघितला होता तुझा आणि अधून मधून परत बघत असतो. सदमामध्ये गाजेलेली दोन्ही गाणी मेल आवाजात आहेत पण ती दोन्ही गाणी तू तुझ्या नावावर केली आहेस. ए जिंदगी गाण्याचे चित्रीकरण जितके सुंदर तितकाच त्यात तुझा तो नैसर्गिक अभिनय भावून जातो. तोहफा, हिम्मतवाला, नया कदम, मास्टरजी, नजराना, वक्त की आवाज, कर्मा असे सिनेमे करणारी श्री हीच का ती असे जाणवावे असा चित्रपट म्हणजे सदमा.१९८७ साली मिस्टर इंडिया आला तेंव्हा मी आठवीत होतो. 'काटे नही कटते ये दिन ये रात' या गाण्याची जादू आजही मनावर कायम आहे. अंगावर संपूर्ण पेहराव (साडी) असतानाही अतीव सुंदर, आकर्षक कसे दिसावे हे तू त्या गाण्यात दाखवून दिले आहेस. 'हर किसी को नही मिलता यहा प्यार जिंदगी में' हे गाणे देखील असेच. 'मिस्टर इंडिया'च्या पॅरडी गाण्यात तू धमाल उडवून दिलेली आणि हवा हवाई हे गाणे फक्त आणि फक्त तुझेच आहे. अनेकांनी त्यावर नंतर हात आजमावण्याचा प्रयत्न केला पण 'नो वन कुड रीक्रिएट इट!'. खर तर मिस्टर इंडिया म्हणजे माझ्यासाठी थेटरात एकटे जावून सिनेमा बघण्याची सुरवात होती आणि त्याचा श्रीगणेशा 'श्री'च्या सिनेमाने व्हावा यापेक्षा जास्त चांगले काय असू शकते.
साल १९८९ आले आणि मी अकरावी बारावी नावाच्या पानिपतावर उतरलो. या युद्धात माझे पानिपत होणार, हे मला माहीत होतेच आणि त्याच काळी आला तुझा 'चांदनी'. ह्या चित्रपटाने मात्र तू माझ्या मनाचा एक कोपरा तुझ्या नावावर करून घेतलास आणि त्या कोपऱ्याची ओनरशीप अजूनही तुझ्याच नावावर आहे. शिव हरीचे संगीत आणि यश चोप्राचे दिग्दर्शन असलेला हा चित्रपट तुझ्यासाठी मैलाचा दगड ठरला. 'पर्बत से काली घटा टकराई' असो किंवा 'मितवा' असो, काहीच्या काही 'बेफाट' दिसली आहेस तू या सिनेमात. पांढरे कपडे एखाद्या स्त्रीला इतके सुंदर दिसू शकतात हे फक्त तुच दाखवू जाणे. इतकी वेडिंग शूट्स करतो मी, चांदनी नंतर लग्नातले संगीत यावर शेकडो गाणी येऊन गेली असतील पण आजही 'मेरे हातो में नौ नौ चुडिया' शिवाय कोणत्याही लग्नाचे संगीत पूर्ण होत नाही.
चालबाझ सिनेमात सनी देओल आणि साक्षात रजनीकांत असतांना देखील हा सिनेमा फक्त तुझा आणि तुझाच आहे. 'सीता और गीता' पेक्षा मोठे काही तरी करून दाखवायची ही संधी तुला मिळाली आणि त्या संधीचे तू सोने केले. या चित्रपटात कितीतरी असे सिन्स आहेत जे आजही आठवले की ओठांवर स्माईल उमटते. 'तेरे बिमार मेरा दिल' किंवा 'ना जाने कहां से आयी है' किंवा 'किसी के हात ना आयेगी ये लडकी' ही सगळी गाणी धमालच. तुला गंमत म्हणून सांगतो, मी अमरावतीला हा चित्रपट बघितला होता. थेटरात आमच्या पुढील रांगेत काही बायका बसल्या होत्या. तू खलनायकावर चाबूक उगारते आणि ते बघून त्यातील एका बाईने “मार साले को जोर से” अशी आरोळीच ठोकली. खलनायक नेस्तानाबूत झाल्यावर त्यातील एका बाईने वाजवलेली शिट्टी आजही कानात घुमते आहे.भल्याभल्यांनी 'लम्हे' घेतला नसता पण तू आणि अनिलने तो घेतला आणि बदलत्या चित्रपट कथांचा जन्म झाला. चाकोरीबाहेर जाऊन कथा लिहिता येते हे या चित्रपटाने सिद्ध केले. आज वेगवेगळ्या विषयावर लोक चित्रपट बनवतात आणि तो स्वीकारतातही; याचे बीज कुठेतरी 'लम्हे'ने पेरले होते. बॉक्स ऑफिसच्या निकालांवर जाऊ नकोस, आमच्या पिढीतल्या चित्रपट प्रेमींसाठी हा सिनेमा अजूनही मनावर राज्य करतो. अनिलची संयत भूमिका आणि ह्या चित्रपटात तू ओतलेला जीव. सुभान अल्लाह!!. 'मेरी बिंदिया' या गाण्यात तू अनिलची नाही माझी झोप उडवून टाकली होतीस. 'कभी मै कहु' किंवा 'मोरनी बागा मा', अबसोल्युट ब्लिस. वहिदा, अनुपम आणि अनिल असतांना देखील हा सिनेमा तुझ्याच नावावर आहे.
अमिताभ नावाच्या वादळासमोर त्याच्या नायिकांचा चित्रपटात पालापाचोळा होत असे आणि म्हणूनच तू त्याच्यासोबत फारसे सिनेमे केले नाहीस. पण हे जरी खरे असले तरी मुकुल आनंदचा 'खुदा गवाह' नावाचा 'मॅग्नम ओपस' आला आणि अमिताभला देखील एखादी अभिनेत्री इक्वल टशन देवू शकते हे इंडस्ट्रीला कळाले. 'खुदा गवाह'मध्ये तुला अभिनयाच्या अनेक छटा दाखवण्याची संधी मिळाली आणि तू त्याचे सोने केलेस. घोड्यावर अमिताभच्या डोळ्यात डोळे भिडवणारी 'श्री', मग अमिताभने अट पूर्ण केल्यावर त्याच्याशी 'तू मुझे कबूल' म्हणत निकाह करणारी 'श्री', मग 'तू ना जा मेरे बादशाह' असे म्हणत त्याला रोखू पाहणारी 'श्री' आणि मग त्याची आयुष्यभर वाट बघणारी 'श्री'. हा सिनेमा बच्चनचा जितका आहे तितकाच तुझा देखील आहे. त्या काळात अमिताभ नायक असतांना तो चित्रपट तेवढाच नायिकेचाही झाला असावा, अशी फारच कमी उदाहरणं आज सापडतील.
'इंग्लिश विंग्लिश' आला आणि तू माझ्या मनात असलेला तुझ्याबद्दलचा आदर एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलास. एका सामान्य स्त्रीची ही असामान्य कहाणी होती. आपल्या घरावर, आपल्या छोट्याश्या व्यवसायावर प्रेम करणारी एक मराठी स्त्री. इंग्लिश येत नसल्यामुळे तिचा पदोपदी अपमान करणारी तिची मुलगी आणि टोमणे मारणारा नवरा. या सर्व पार्श्वभूमीवर अमेरिकेत लग्नाला गेलेली तू आणि तिथून एक इंग्लिश शिकवणारा वर्ग शोधून काढून इंग्लिश शिकणारी तू. कोणत्याही वयात काहीही शिकता येते असे संदेश देणाऱ्या या चित्रपटाने चाळीशी पार केलेल्या अनेक स्त्रीयांच्या मनात विझलेला अग्नी धगधगयला मदत केली. या चित्रपटात असे कितीतरी सिन्स आहेत जे बघून अनेक लोक पुन्हा तुझ्या प्रेमात पडले असतील, मी देखील त्यातलाच एक. तुझा 'मॉम' बघायचा राहून गेलेला. आता कधी बघीन ते माहीत नाही.
 

 
 
अजून काय बोलू ? अजून काय लिहू, शब्दच संपले माझे. एखाद्या दिवसाची इतकी भयाण सुरवात करून कोणी जाते का ग?


तू न जा मेरी मल्लिका,
एक वादे के लिये एक वादा तोड के...
- हर्षद शामकांत बर्वे