सुप्रसिध्द अभिनेत्री श्रीदेवी काळाच्या पडद्याआड
 महा एमटीबी  25-Feb-2018दुबई :
हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री श्रीदेवी कपूर यांचे काल रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या ५४ वर्षांच्या होत्या. एका घरगुती लग्न समारंभाला त्या दुबईमध्ये गेल्या होत्या. काल रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास त्यांना हृदयविकाराच्या झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालविली. त्यांच्यामागे पती बोनी कपूर, मुलगी जान्हवी आणि खुशी असा परिवार आहे.

१९६९ साली वयाच्या चौथ्या वर्षी श्रीदेवी यांनी एका तमिळ चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. तर, १९७८ साली सोलवा सावन या चित्रपटातून त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले. पुढे हिम्मतवाला या चित्रपटामुळे त्या प्रकाश झोतात आल्या. त्यानंतर त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट सिनेसृष्टीला दिले. खुदा गवाह, चांदनी, लम्हे, चालबाज, मिस्टर इंडिया इ. चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या. श्रीदेवी यांना चित्रपटसृष्टीतील पहिली महिला सुपरस्टार म्हणले जाते.

१९९७ ते २०१२ हा पंधरा वर्षांच्या मोठ्या ब्रेकनंतर श्रीदेवींनी इंग्लिश-विंग्लिश या सिनेमातून सिनेसृष्टीत पुनरागमन केले. त्यानंतर त्या मॉम या सिनेमातून प्रक्षकांसमोर आल्या. तोच त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला.


श्रीदेवी यांच्या सिनेसृष्टीतील कारकिर्दीचा गौरव म्हणून त्यांना २०१३ साली भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. 
 
लवकरच त्यांच्या मुलीचा जान्हवी कपूरचा धडक हा सिनेमा प्रक्षकांच्या भेटीला येत आहे.उद्या होणार अंत्यसंस्कार

श्रीदेवी यांचा दुबईमध्ये मृत्यु झाल्यामुळे तिथल्या सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मगच त्यांचे पार्थिव परिवाराकडे सोपावण्यात येणार आहे. त्यामुळे आज संध्याकाळी उशिरा त्यांचे पार्थिव मुंबई येईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.


श्रीदेवींच्या अश्या अचानक एक्झिटमुळे सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जावेद अख्तर, कमल हसन, प्रियांका चोप्रा, विरेंद्र सेहवाग, काजेल यांनी सोशल मिडियावर आपले दु:ख्य व्यक्त केले आहे.