बाईक रायडिंगची स्वप्नपूर्ती
 महा एमटीबी  24-Feb-2018
 

 
धोकादायक चढउतार, ओबडधोबड वळण, वयवर्ष फक्त १८ आणि मनात वडिलांची इच्छा पूर्ण करण्याची जिद्द या जोरावर खारदुंगला इथे पोहोचण्याचा ‘यंगेस्ट राइडर’चा मान मिळवला आहे तो पुण्याच्या अन्विता सबनीसने.
 
पुण्यातील कोथरूड भागातील कावेरी कॉलेजमध्ये बीएचं शिक्षण घेत असलेल्या अन्विताला खेळाची आणि सायकलिंगची लहानपणापासूनच आवड. ही अनोखी आवड तिच्या मनात बाईकरायडर बाबांमुळेच रुजली. अन्विताचे बाबा हे जातिवंत रायडर. त्यांनी त्यांच्या आयुष्यातील एक राईड दिल्ली ते मुंबई ‘राजधानी एक्स्प्रेस’च्या वेगाने केली होती. एवढंच नाही तर त्यावेळी ते राजधानी एक्सप्रेसच्या २५ मिनिटे आधीच मुंबापुरीत पोहोचले होते. त्यांनी चार वेळा वेगवेगळ्या यशात ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ देखील रचला आहे. बाबांची ही यशस्वी कामगिरी अन्विता लहानपणापासूनच बघत होती आणि तीही त्यांच्याच पावलावर पाऊल टाकायला सज्ज होत होती.
 
लडाखमधील खारदुंगला डोंगर खरे म्हणजे प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावरच तुम्ही सर करू शकता. अनेक हौशी तरुण रायडर्स आणि गिर्यारोहकांनी हा डोंगर थंड वार्‍यांचा सामना करत, खडकाळ वाट तुडवत, ऑक्सिजनची कमतरता असताना सर केला आहे. अन्विताचे नावही आता त्या धाडसी बाईक रायडर्समध्ये समाविष्ट झाले आहे. मात्र, तिच्या या विक्रमाची सुरुवात तिच्या बाबांपासून झाली होती. १९ वर्ष ७ महिन्यांची दिल्लीतली तरुणी नुकतीच खारदुंगला जाऊन आल्याची माहिती अन्विताच्या बाबांना त्यांच्या भावाने दिली. त्यावेळी अन्विताला वयाची अठरा वर्ष पूर्ण होण्यासाठी काही दिवस शिल्लक होते. मात्र, आपली मुलगी हा विक्रम नक्कीच मोडू शकेल, अशी खात्री तिच्या बाबांना वाटली आणि त्या दिशेने त्यांचे प्रयत्न सुरू झाले.
 
हा विक्रम करायचा तर मुळात अन्विताची बाईकवर हुकूमत असणे आवश्यक होते. तिने पहिल्यांदा बाईकचे हँडल हातात घेतले, तेव्हा ती पाच वर्षांची होती. सायकलिंगमध्ये तरबेज असलेल्या अन्विताला बाईक शिकायला तसा फारसा वेळ नाही लागला. परंतु, बाईक सुरू करायला मात्र वेळ लागलाच. दहावीच्या सुट्टीत बाईक शिकण्याच्या पहिल्याच दिवशी तिला बाईक सुरू करायला साधारण एक तास लागला. कारण, बाईक शिकवायला कोणीच गुरू म्हणून लाभले नव्हते. तिच्या बाबांनी बाईक रायडिंगसाठी तिला अनेक टिप्स दिल्या होत्या, मात्र ती सुरू कशी करायची हेच त्यांनी तिला सांगितले नव्हते. त्यामुळे हळूहळू तोल सांभाळत तिने स्वत:च बाईक चालवली. शाळेत असतानाच तिने वडिलांबरोबर रायडिंग सुरू केले होते, मात्र त्यावेळी बाबा बाईकवर आणि ती सायकलवर असायची. अन्विता बाईक शिकली आणि तिची पहिलीच रायडिंग थेट खारदुंगला येथे झाली. तिच्या या मोहिमेची पूर्वतयारी वडिलांनी आधीपासूनच सुरू केली होती. ११ जुलैला अन्विता १८ वर्षांची झाली आणि लगेच १७ सप्टेंबरला तिच्या वडिलांसोबत ती खारदुंगलाच्या मोहिमेला निघाली. पुणे ते चंदीगढ अंतर रेल्वेने कापत २० सप्टेंबरला ही बापमुलीची जोडी खारदुंगल्याच्या दिशेने कूच करती झाली. पल्सर २२०चं १६० किलो वजन, त्यात पल्सरच्या दोन्ही बाजूला बॅग्ज, त्या बॅग्जचं २५ किलो वजन अशा परिस्थितीत मोहिमेचा पहिला टप्पा चंदीगढ ते मंडी असा प्रवासाचा होता. काही किलोमीटर सलग हायवे व नंतर नागमोडी वळणं कापत प्रवास सुरू होता. अशाच खडतर रस्त्यांवरून प्रवास करत अन्विता अखेर खारदुंगला येथे पोहोचली
 
 
- तन्मय टिल्लू