रक्तसंक्रमणातील ’गट’बाजी
 महा एमटीबी  23-Feb-2018
रक्तपेढी हे एक असं ठिकाण आहे की, जिथे प्रत्येक क्षणाला काहीतरी घडत असतं. २०१७ सालातील जून महिन्यातला असाच एक दिवस जनकल्याण रक्तपेढीसाठी कायम लक्षात राहणारा ठरला. रक्तपेढी संचालक डॉ. अतुल कुलकर्णी यांचा फोन दुपारच्या वेळी खणखणला. फोन होता मुंबईतून - थिंक फौंडेशनच्या विनय शेट्टी यांचा. ’विशाखापट्टणमजवळील एका गावात एका रुग्णालयात महत्वाच्या शस्त्रक्रियेदरम्यान एका रुग्णास ’बॉम्बे’ नावाच्या दुर्मीळ रक्तगटाची आवश्यकता होती आणि यासंदर्भात जनकल्याण रक्तपेढी काही करु शकते का’, अशी विचारणा करणारा हा फोन होता. रक्तपेढीचे विश्व मोठे वैशिष्ट्यपूर्ण आहे. रक्ताची गरज होती विशाखापट्टणमच्या जवळील एका गावात आणि यासाठी आजुबाजुच्या सर्व शक्यता पडताळत ही मागणी येऊन ठेपली होती थेट पुण्यातील जनकल्याण रक्तपेढीमध्ये ! अर्थात डॉ. अतुल कुलकर्णी यांनी शेट्टी यांना आश्वस्त केले आणि यानंतर जनकल्याण संच कामाला लागला. सत्तर हजारांमागे एक अशी उपलब्धता ’बॉम्बे’ नावाच्या या रक्तगटाची असते. रक्तपेढीने अशा दुर्मीळ रक्तदात्यांची एक सूचीही जतन करुन ठेवलेली आहे. मुळातच मर्यादित असलेल्या सूचीतून एक रक्तदाता सुदैवाने रक्तदान करण्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या पात्र असलेला सापडला. मात्र तो त्यावेळी होता पंढरपूरात. परंतु परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता तो त्याच रात्री उशीरा पंढरपूरातून पुण्याला यावयास निघाला. भल्या सकाळी पुण्यात पोहोचून त्याने यशस्वीपणे रक्तदान पार पाडले. त्यानंतर तातडीने त्या रक्ताच्या महत्वाच्या चाचण्या व त्यानंतर रक्तविघटनही करण्यात आले. विघटित झालेल्या लाल रक्तपेशी - ज्या रुग्णाला द्यायच्या होत्या – त्वरित मुंबईला पाठविण्यात आल्या. त्यानंतर रात्री उशीरा विमानाने विशाखापट्टणमला आणि पुढे पुन्हा एका वाहनाने काकीनाडा या ठिकाणी असलेल्या रुग्णालयात हा रक्तघटक पोहोचला. शस्त्रक्रियेदरम्यान या रुग्णास हा रक्तघटक संक्रमित करण्यात आला आणि रुग्ण मृत्यूच्या छायेतून अखेर बाहेर पडला.

रक्तगटांचे महत्व या घटनेवरुन आपल्या सहज लक्षात येऊ शकेल. रक्तसंक्रमणात निर्णायक ठरणारी ही ’गट’बाजी समजून घेणे रंजक तर आहेच पण ’कधी कुणाला रक्तघटकांची गरज भासु शकेल’ याचा काहीच अंदाज नसल्यामुळे किमान प्राथमिक स्वरुपात त्याबद्दल माहिती असणे आवश्यकही आहे. वैद्यकीय शास्त्राने रक्तगटांची निश्चिती केलेली असून रक्तघटक रुग्णाला देत असताना ते रक्तगट पाहूनच दिले गेले पाहिजेत, इथवर आपल्याला माहिती असते. पण हे रक्तगट मुळात ठरतात कसे, त्यामधील वैशिष्ट्यपूर्ण रक्तगट कोणते असतात याबद्दलची माहिती सर्वांना असतेच असे नाही. मानवी रक्तगटांचा शोध कार्ल लॅंडस्टेनर या ऑस्ट्रियन शास्त्रज्ञाने सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी लावला. या शोधाबद्दल त्यांना नोबेल पारितोषिकही प्राप्त झाले. या थोर शास्त्रज्ञाची आठवण म्हणून त्यांचा जन्मदिन १४ जून हा जागतिक रक्तदाता दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.

रक्तातील प्रतिपिंडे (antibodies) आणि प्रतिजन (antigens) यांच्या अस्तित्वाच्या आधारे रक्तगटांचे वर्गीकरण केले जाते. मातापित्यांकडून अनुवांशिकतेने आलेली जनुके हेच रक्तगटांचे वाहक असतात. इंटरनॅशनल सोसायटी ऑफ़ ब्लड ट्रान्सफ़्युजन (ISBT) या आंतरराष्ट्रीय संस्थेव्दारा आजवर या आधारे रक्तगट निश्चितीच्या ३५ पद्धती प्रमाणित करण्यात आलेल्या आहेत. त्यातील दोन सर्वाधिक महत्वाच्या प्रणाली ABO आणि Rh या असून जगभरात बहुधा याच पद्धतीव्दारा रक्तगट निश्चित केले जातात. रक्तगट हा आयुष्यभरासाठी तोच राहतो. काही अपवादात्मक प्रसंगी म्हणजेच विशिष्ट प्रकारचे जंतुसंसर्ग, कॅन्सर्स, बोन मॅरो ट्रान्सप्लांट अशा उपचारांमध्ये मात्र रक्तगट बदलण्याची शक्यता उद्भवु शकते.

मानवी रक्तामध्ये असलेल्या तांबड्या रक्तपेशीवर असलेल्या विशिष्ट प्रथिनांमुळे रक्तगट ठरतो. या प्रथिनांनाच प्रतिजन असे म्हणतात. महत्वाचे रक्तगट दोन आहेत. प्रतिजन प्रकार ’ए’ आणि ’बी’ यांनाच रक्तगट ’ए’ आणि ’बी’ असे म्हटले जाते. तांबड्या पेशींवर कोणत्याही प्रकारची प्रतिजने नसल्यास त्या रक्तगटास ’ओ’ असे म्हटले जाते. तसेच ’ए’ आणि ’बी’ या दोन्ही प्रकारची प्रथिने तांबड्या पेशींवर असल्यास तो रक्तगट ’एबी’ म्हणून ओळखला जातो. रक्त हे पेशी (Cells) आणि रक्तरस (Plasma) या द्रवांनी बनलेले असते. रक्तपेशी जेव्हा ए गटातील असतात तेव्हा रक्तरसामध्ये बी प्रकारच्या प्रथिनांविरुद्धचे प्रतिपिंड असते तसेच रक्तगट बी असल्यास ए प्रकारच्या प्रथिनांविरुद्धचे प्रतिपिंड असते. एबी हा रक्तगट असल्यास रक्तरसामध्ये कुठलेही प्रतिपिंड नसते तर ओ हा रक्तगट असल्यास ए व बी या दोन्ही प्रकारच्या प्रथिनांविरुद्धचे प्रतिपिंड असते.

Rh antigen पद्धती ही ABO नंतरची सर्वांत महत्वाची अशी ही पद्धती आहे. Rh हा प्रतिजन तांबड्या रक्तपेशींवर असेल तर त्या रक्तगटास Rh Positive आणि नसल्यास Rh Negative असे संबोधले जाते. या व्यतिरिक्त वर उल्लेख केल्याप्रमाणे रक्तगटांचे वर्गीकरण करण्याच्या kell, kidd, duffy, lutherton, MNS, lewis अशा एकूण ३५ पद्धती आहेत.

काही विशिष्ट रक्तगट हे फारच कमी लोकांमध्ये सापडतात. सुरुवातीच्या घटनेमध्ये उल्लेख केलेला ’बॉम्बे’ हा रक्तगट अशाच दुर्मीळ रक्तगटांपैकी एक. हा रक्तगट पहिल्यांदा मुंबई (तेव्हाचे बॉम्बे) येथे शोधला गेला म्हणून त्याचे नामकरणही तसे झाले. या रक्तगटास ए, बी किंवा ओ यांपैकी कोणत्याच रक्तगटाचे रक्त जुळत नाही. तांबड्या रक्तपेशींवर रक्तगट प्रतिजन तयार होण्याचा पाया म्हणजे H या नावाचे प्रतिजन होय. या H प्रतिजनावर शरीरांतर्गतच काही रासायनिक प्रक्रिया होऊन त्याचे ए, बी किंवा एबी असे प्रतिजन तयार होतात आणि ती प्रक्रिया न झाल्यास रक्तगट ओ तयार होतो. परंतु काही व्यक्तींमध्ये हे H प्रतिजन म्हणजेच पायाभूत द्रव्यच नसते. ते नसल्याने या व्यक्तींच्या रक्तगटांचे ओ रक्तगटाशी साधर्म्य असते, पण मूलत: ओ पेक्षा हा रक्तगट निराळा असतो. या व्यक्तीमध्ये anti H नावाची प्रतिपिंडे तयार होतात. अशा व्यक्तींना रक्ताची गरज पडल्यास या बॉम्बे रक्तगटाचेच रक्त द्यावे लागते. अन्य कोणत्याही रक्तगटाचे रक्त (मुख्यत्वे लाल रक्तपेशी) अशा व्यक्तींना देणं शक्य नसतं. ते तसं दिलं गेल्यास ते प्रसंगी जीवघेणं ठरु शकतं.

रुग्णास रक्ताची (लाल रक्तपेशींची) गरज पडल्यास रक्तगट तपासणी व रक्तजुळवणी (cross-match) अशा तपासण्या कराव्या लागतात. या तपासण्यांचे योग्य ते परिणाम येऊन त्याची स्वीकारार्हता प्रमाणित झाल्यानंतरच या लाल रक्तपेशी रुग्णास संक्रमित करण्यात येतात. जर ए रक्तगटाचे रक्त बी रक्तगटाच्या रुग्णास (किंवा उलट) चुकून दिले गेले antigen-antibody reaction होते व लाल रक्तपेशींचे मोठ्या प्रमाणावर विघटन होते. वैद्यकीय परिभाषेत यास हिमोलिसिस (haemolysis) असे म्हणतात. असे हिमोलिसिस झाल्यास मुक्त हिमोग्लोबिन पूर्ण शरीरात पसरते आणि किडनीवर त्याचा खूप भार पडतो. वेळीच ही प्रक्रिया रोखली गेली नाही तर किडनी झपाट्याने निरुपयोगी होत जाते व शेवटी तिचे काम पूर्णत: बंद होऊन रुग्ण दगावू शकतो. योग्य त्या रक्तगटाचेच रक्तघटक रुग्णास दिले जाण्यासाठी रक्तपेढी तंत्रज्ज्ञांना आणि डॉक्टरांना किती सतर्क रहावे लागत असेल याचा यावरुन अंदाज यावा. कारण इथे चुकीला क्षमाच नाही.

आधुनिक रक्तपेढी विज्ञानाप्रमाणे रुग्णांस शक्यतो त्या त्या रक्तगटांचेच रक्त (लाल रक्तपेशी) दिले जाते. (प्लेटलेट्स या रक्तघटकासाठी मात्र ’रक्तगटा’चे बंधन नसते.) परंतू काही तातडीच्या प्रसंगी रक्ताचा तुटवडा असल्यास, विशेष करुन जीव वाचविण्याचे आव्हान समोर असेल तर रुग्णाच्या रक्तगटापेक्षा वेगळ्या रक्तगटाच्या लाल रक्तपेशी दिल्या जाऊ शकतात. अशा आणीबाणीच्या प्रसंगी ’ओ निगेटीव्ह’ या रक्तगटाचे रक्त मात्र कोणत्याही गटासाठी वापरता येऊ शकते. अर्थात यातही ’बॉम्बे’ रक्तगट मात्र अपवाद. कारण ’बॉंम्बे’ साठी त्याच रक्तगटाचे रक्त दिले जायला हवे, तिथे ’ओ निगेटीव्ह’ देखील चालत नाही.

या माहितीवरुन आपल्या लक्षात येऊ शकेल की, प्रत्येक व्यक्तीला आपला रक्तगट माहिती असणे हे निश्चितपणे जरुरीचे आहे. त्यामुळे आपला रक्तगट समजावून घेणे ही आपली जबाबदारी समजून हे काम आपणास करावे लागेल. त्याचबरोबर रक्तपेढीमध्ये रक्त व रक्तघटक उपलब्ध होत असले तरी रक्तपेढी किंवा जगातील कोणतीही प्रयोगशाळा या रक्ताची निर्मिती करु शकत नाही, हेही आपणास समजून घ्यावे लागेल. म्हणजेच हे रक्त पुढील प्रक्रियांसाठी आणि योग्य त्या ग्राहकास म्हणजेच रुग्णास वितरित होण्यासाठी समाजातील निरोगी तरुणांनी मोठ्या प्रमाणावर रक्तदान करण्यासाठीदेखील पुढे यावे लागेल.

ज्यांचे रक्तगट दुर्मीळ या सदरात मोडतात त्यांनी ’नियतीने आपल्यावर विशेष दायित्व दिले आहे’ हे सदैव लक्षात ठेवून ’रक्तदाता’ होण्याची वैद्यकीय पात्रता आपल्यामध्ये कायम राहील याकरिता प्रयत्नरत रहायला हवे. ’रक्तदाता’ आणि ’रुग्ण’ या दोन्ही भूमिकांमध्ये स्वत:ला पाहून आपली जबाबदारी व कर्तव्ये या ’दुर्मीळ’ व्यक्तींना ठरवावी लागतील. अर्थात रक्तगट दुर्मीळ असु शकतात, कारण त्याची कारणे वैद्यकीय स्वरुपाची आहेत. पण ’मी समाजाचे काही देणे लागतो’ हा विचार ज्या भारतीय तत्वज्ञानाने दिला आहे, त्या भारतामध्ये माणुसकी दुर्मीळ होण्याचे मात्र काही कारण नाही.

- महेंद्र वाघ