नेता आणि उद्योजक - साधर्म्य आणि वेगळेपणा- भाग-१

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Feb-2018
Total Views |
 
 
 
नेता म्हटले की, डोळ्यासमोर येते ते पांढर्‍या वेशातील, जॅकेट घातलेल्या एखाद्या व्यक्तीचे चित्र (स्त्री असल्यास कॉटनची साडी व शाल), आणि उद्योजक/उद्योजिका म्हटले की मॉडर्न वेशातील व्यक्ती. नेत्याच्या मागे-पुढे लोकांचा ताफा आणि उद्योजक म्हणजे कारखाना किंवा ऑफिस. किती ठराविक प्रतिमा..! नेता आणि उद्योजकात काय सारखेपणा असतो आणि उद्योजक हा नेत्यापेक्षा आणि नेता हा उद्योजकापेक्षा कसा वेगळा असतो हे जाणून घेऊया.
 
सर्वप्रथम नेता (Leader) आणि उद्योजक (Entrepreneur) या दोन्हींची व्याख्या बघू. नेता म्हणजे अशी व्यक्ती जी नेतृत्व करते, सर्वात पुढे असते. उद्योजक म्हणजे अशी व्यक्ती जी उद्योग उभा करते/ सुरू करते, जोखीम पत्करते आणि उभ्या केलेल्या उद्योगातून नफा कसा मिळेल, हे बघते. (येथे सामाजिक उद्योजकतेचा - social entrepreneurship no profit-no loss यावर आधारित उद्योगाचा विचार केलेला नाही). वरवर बघता नेता हा समाजातील एखाद्या गटाचे किंवा विचारसरणीचे नेतृत्व करत असतो. त्यात लोकांवर आपल्या विचारांचा आणि कृतींचा प्रभाव पडणे अपेक्षित असते. वैयक्तिक करिश्मा आणि विचारधन या दोन्हींच्या बळावर नेता जनमानसावर आपली छाप पाडत असतो किंवा पुढारीपण सिद्ध करत असतो, तर उद्योजक हा उद्योगामुळे जन्माला येतो. स्वत:च्या मनातील कल्पना प्रत्यक्षात यावी किंवा समाजात स्वत:ची ओळख निर्माण व्हावी, अशी इच्छा उद्योजकाला असते. यात स्वप्रतिमेबरोबरच आर्थिक बाजुही तेवढीच महत्वाची असते. उद्योजक स्वत: पुढाकार घेऊन, स्वत: धडपड करून उद्योगाची उभारणी करतो, त्या उद्योगाचे नेतृत्व तो करतो म्हणून उद्योजक हा स्वत: एक नेता असतो असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मग उद्योजकता ही नेतृत्व गुणांच्या तराजूत तोलली तर काय हरकत आहे, असा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो. नेता आणि उद्योजक यांच्यात मुख्य फरक आहे तो आर्थिक बाजूचा. (येथे हल्लीची अगदी गल्लीतली नेते-मंडळीही एखाद्या लघु उद्योजकापेक्षा अधिक गब्बर असतात इ. मुद्दे चर्चेत नाहीत, तर सैद्धांतिकदृष्ट्या नेता आणि उद्योजक यांच्यात काय फरक आहे याचा ऊहापोह आहे.) नेता हा नेतृत्व करण्यास सज्ज होतो कारण त्याच्या अंगी मुळातच काही विशेष गुण असतात, त्या व्यक्तीची अंत:प्रेरणा आणि कुठलीतरी सामाजिक गरज, ओढ किंवा अपरिहार्यता एखाद्या व्यक्तीला नेता होण्यास उद्युक्त करते किंवा कधीकधी भाग पाडते.
 
उद्योजकाच्या बाबतीत मात्र समोर आलेली संधी, मग ती केवळ कल्पनेत असो अथवा प्रत्यक्ष, त्या संधीचा फायदा करून घेणे महत्त्वाचे असते. हे करताना उद्योजकाचे गुणविशेष जसे जोखीम पत्करण्याची तयारी, महत्त्वाकांक्षा, स्वायत्तता, स्वयंप्रेरणा आणि स्वयंशिस्त हे व असे अनेक गुण कामी येतात. उद्योजकता म्हणजे उद्योजकाकडे असलेली कुठल्यातरी स्वरूपाची माहिती अथवा कौशल्य (तांत्रिक किंवा रचनात्मक) याचे एखाद्या उत्पादनात किंवा सेवेत रूपांतर. सद्य परिस्थितीत आपल्या भोवताली, आपल्यासमोर असलेल्या (उपस्थित) किंवा नसलेल्या (अनुपस्थित), ग्राहकाला कशाची गरज आहे, हे ओळखून ती गरज पूर्ण करणे, हे उद्योजकाचे उद्दिष्ट असते आणि ही गरज पूर्ण करताना जर दर्जेदार उत्पादनाने, अभिनवरित्या पूर्तता झाली तर ग्राहकही खुश आणि उद्योजकही. (क्रमश:)
 
 
 
- ऋता पंडित  
@@AUTHORINFO_V1@@