Baaghi 2 Trailer : टायगर श्रॉफची ही 'अचाट' छलांग एकदातरी बघाच
 महा एमटीबी  21-Feb-2018

 
टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी या जोडीच्या बहुप्रतीक्षित 'बागी-२' चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला. प्रचंड ऍक्शन, हाणामारीचे परदेशी प्रकार, त्याला देशी तडका, रोमान्स, देशप्रेम, दहशतवादी या सगळ्याविषयांची सरमिसळ म्हणजे बागी-२. या ट्रेलरच्या शेवटी एक सीन आहे ज्यामध्ये टायगर चालत्या हेलिकॉप्टरला पकडल्याचे दाखवले आहे. यावरूनच साधारच चित्रपट कसा असेल याचा अंदाज प्रेक्षकांना येऊ शकतो. अहमद खान याने दिग्दर्शित केलेला हा चित्रपट ३० मार्च रोजी प्रदर्शित होतोय.
 
 
 
टायगर आणि दिशा शिवाय मनोज वाजपेयी, रणदीप हुडा यांच्यासारखे मात्तबर कलाकार देखील यामध्ये आपल्याला बघायला मिळतील. शिवाय बऱ्याच कालावधीनंतर प्रतीक बब्बर सुद्धा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पोलिसांच्या कैदेत असणारा चित्रपटाचा फौजी नायक त्याला उद्देशून म्हणतो ''जो ये तेरा टॉर्चर हैं, वो मेरा वोर्मअप हैं!''. या सीन मधून टायगरचे डोले-शोले दाखविण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे. प्रेमासाठी बंड ही या चित्रपटाची टॅगलाईन आहे.
 

 
पार्श्वसंगीत, स्पेशल इफेक्टस, मनोज वाजपेयी किंवा रणदीप हुडा सारखे सहकलाकार, हाणामारीचे परदेशी प्रकार या साऱ्या गोष्टी प्रेक्षकांना खिळवून ठेवतील अशी अशा ट्रेलर बघितल्यावर निर्माण झाली आहे खरी; पण शेवटी मुख्य कलाकार म्हणजेच टायगरचा अभिनयही तितकाच महत्वाचा आहे. या चित्रपटात आधीपेक्षा त्याने त्याच्या शरीरावर अधिक परिश्रम घेतले असल्याचे दिसून येत आहे. पण त्याचबरोबर अभिनयावरही कष्ट घेतले असावेत व त्याचे फळ रसिकांना मिळावे एवढी माफक अपेक्षा.