स्पर्शातून उमटू दे 'मानव्या'च्या खुणा
 महा एमटीबी  21-Feb-2018
 

 
 
विजयाताईंनी कष्ट, हालअपेष्टा सहन करून ‘मानव्य’ संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. देहविक्रय करणार्‍या स्त्रिया, त्यांचे दुःखद जीवन, त्यांच्या मुलांचे त्यांच्याहूनही वंचित जीवन, एड्स रुग्ण या सार्‍यांसाठी ‘मानव्य’ तनमनधनाने काम करते. विजयाताईंनी इहलोक सोडल्यानंतरही ‘मानव्य’चे काम थांबले नाही. ते सुरूच आहे, कारण ते मानवाच्या हृदयातल्या ईश्‍वरी अंशाचे काम आहे.
 
विजयाताईंच्या सार्वजनिक जीवनातला महत्त्वाचा टप्पा त्यांच्या लग्नानंतर जुलै १९६३ ला सुरू झाला, जेव्हा त्या पुणे महानगरपालिकेच्या कुटुंबनियोजन केंद्रात नोकरीसाठी रूजू झाल्या. वेश्यांच्या वस्तीत जाऊन त्यांच्या आरोग्यविषयक परिस्थितीत सुधारणा करणे, त्यांच्यात आरोग्यविषयक जाणिवा निर्माण करणे, वेळेवर खाण्यापिण्याचे महत्त्व पटवून देणे, असे विजयाताईंच्या कामाचे स्वरूप होते. करायला सुरुवात केल्यानंतर या मार्गात किती अडचणी आहेत, हे त्यांच्या लक्षात यायला लागले, स्त्री-स्वभावानुसार कोणतीही स्त्री स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते. वेश्याही त्याला अपवाद नव्हत्या. या स्त्रिया औषधे वेळेवर व योग्य प्रमाणात घेतात की नाही, हे पाहणेदेखील महत्त्वाचे होते. त्यासाठी विजयाताईंना त्यांच्या घरीही जावे लागे. यातूनच या स्त्रियांचा व विजयाताईंचा जो एक अनुबंध तयार झाला तो पुढे शेवटपर्यंत टिकला आणि त्यातूनच ’मानव्या’ने आकार घेतला.’’ ’मानव्य’चे अध्यक्ष आणि विजयाताईंचे सुपुत्र शिरीष लवाटे, भूतकाळात हरवून अगदी तपशीलाने सांगत होते. एवढे मोठे काम उभे राहिले, पण हे एका रात्रीत घडले नव्हते. अनेकांनी फसवल्या गेलेल्या या स्त्रिया कुणावरही विश्वास ठेवायला तयार नसत. मग त्यांच्याजवळ जाऊन त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्यासाठी काम करणे तर खूप लांबची गोष्ट होती, पण जेव्हा विजयाताई निःस्वार्थी भावनेने आपल्या भल्यासाठीच हे सर्व करत आहेत, ही जाणीव जेव्हा या स्त्रियांना व्हायला लागली तेव्हा कुठे त्यांनी विजयाताईंवर विश्वास ठेवायला सुरुवात केली आणि विजयाताई वेश्यांच्या घरी निर्भिडपणे ये-जा करू लागल्या. विजयाताईंच्या ध्यानात आले की, ’’येथील स्त्रियांचे चहूबाजूने शोषण चालू असते. मालकिणीकडून, गुंडांकडून, नातेवाईकांकडून, समाजाकडून आणि अगदी त्यांच्या स्वत:कडूनदेखील अज्ञानवश त्यांचे शोषणच चालू असते. पोलिसांच्या आणि गुंडांच्या भीतीमुळे या स्त्रिया त्यांना सांभाळणार्‍या मालकिणीच्या म्हणजे घरवालीच्या आधाराला धरून असतात आणि या जाळ्यात अधिकच अडकत जातात. या सगळ्या मानसिक ताणामुळे त्या दारू, गांजा, चरस अशा व्यसनाच्या आहारी जातात, तरुणपणाचे दिवस निघून जातात, अन् म्हातारपणी यांना कोणीही विचारत नाही, अशात जर कोणी आजारी पडली तर कुत्र्याच्या मौतीने मरावे लागते. विजयाताईंना अशा स्त्रियांसाठी काम करायचे होते. अनेक प्रश्नांनी त्यांच्या मनात जन्म घ्यायला सुरुवात केली होती. यांच्यासाठी आपण काय काय करू शकतो, असा विचार विजयाताई करू लागल्या, यांना आरोग्यशिक्षण देता येईल का?, घरच्या लोकांच्या आणि मालकिणीच्या शोषणातून यांना मुक्त करता येईल का? त्यांच्या व्यवसायातले स्वच्छतेचे महत्त्व पटवून देता येईल का?, एकापेक्षा जास्त मुले होऊ नये म्हणून त्यांची मानसिकता तयार करता येईल का? त्यांच्या मुलांना त्यांच्या व्यवसायापासून दूर ठेवता येईल का?, अशा अनेक प्रश्नांनी विजयाताई अस्वस्थ होत.
 
 
एक दिवस एका लहान मुलीला कुणीतरी विजयाताईंकडे घेऊन आले. या मुलीची आई मुलीला कुंटणखाण्याच्या मालकिणीकडे म्हणजे घरवालीकडे सोडून पळून गेलेली होती. विजयाताईंच्या मनात एका नव्याच प्रश्नाने जन्म घेतला. त्यांनी पाहिले होते, या स्त्रिया आपल्या मुलांवर खूप प्रेम करतात पण जेव्हा धंद्याची वेळ असते तेव्हा त्यांचे मुलांकडे दुर्लक्ष होते, शिक्षण तर खूप दूरची गोष्ट होती. अशा अनेक मुलामुलींच्या करुण कहाण्या विजयाताईंना कळायच्या, तेव्हा त्यांना अक्षरश: रडू यायचे, गरिबी आणि अस्वच्छतेमुळे वस्तीतल्या मुलामुलींना रोग व्हायचे. त्यांना वाचवताना कधी यश तर कधी अपयश यायचे पण इलाज नव्हता. हे असेच चालू राहिले तर परिस्थिती आणखीनच बिकट होणार हे कळत होते. जिद्दीतून सर्वांशी विचारविनिमय करून विजयाताईंनी ’सर्वेषां सेवा संघा’ची स्थापना केली. यामध्ये विजयाताईंचे बंधू शिक्षणतज्ज्ञ पु. ग. वैद्य हेदेखील होते आणि मग विजयाताईंच्या कल्पनेनुसार त्यांनी वस्तीतच असलेल्या कुलवंत वाणी धर्मशाळेतली जागा बालवाडीसाठी निवडली आणि वस्तीतल्या मुलांसाठी पहिली बालवाडी सुरू झाली. बालवाडीसाठी जी शिक्षिका नेमली ती खूप समर्पित वृत्तीने मुलांना शिकवत असे. पण जागेचा मालक थोड्याच दिवसात कुरकुर करायला लागला. अनेक कारण देत त्याची कुरकुर वाढतच गेली आणि एक दिवस बालवाडी बंद करावी लागली. पुन्हा मुलं वस्तीतून मोकाट फिरताना दिसू लागली.
 
 
एक धाडसी विचार विजयाताईंच्या मनात आला की, या मुलांना वेगवेगळ्या वसतिगृहात ठेऊन बघावे, मग जरा मोठी असलेली मुले निवडली आणि त्यांना वेगवेगळ्या वसतिगृहात ठेवले. वस्तीतून मुलांना बाहेर काढण्याचा प्रयोग यशस्वी झाल्याचे पाहून त्याचा आनंद मात्र त्यांना खूप झाला. आता या मुलांना आपण बाहेर नेऊ शकू, हा आत्मविश्वास आल्यावर विजयाताईंनी एक जागा बघितली. आकुर्डीला खंडोबाचा माळ म्हणून ओळखल्या जाणार्‍या माळावर, चंद्रकांत काळभोर यांची बखळ, खरंतर गोठाच. १३ जुलै १९७९ ला या गोठ्यातच वसतिगृह सुरू केले आणि मुलं वेश्यावस्तीतून बाहेर आली. पिंपरी-चिंचवडचे त्यावेळचे महापौर डॉ. धारे यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
 
विजयाताईंना नोकरी करून वसतिगृहाचे काम बघावे लागे. मदत गोळा करत फिरावे लागे. नऊ मुलांनी सुरू झालेल्या या वसतिगृहात मुलांची संख्या तीन-चार महिन्यांतच तीसवर गेली. विजयाताईंच्या अडचणीही वाढतच होत्या. १९७९ ते १९८५ च्या काळात अनेकदा जागा बदलाव्या लागल्या, खंडोबाच्या माळावरून उरुळी चोराची, तेथून भुकुम म्हणजे दरवर्षी नवीन जागा, नवीन शाळा, नवीन लोकांशी संबंध, त्यामुळे मदत मिळविण्यातदेखील खूप अडचणी येत. अनेक संकटांचा सामना करत विजयाताई वसतिगृहाचा डोलारा चालवत होत्या, पण एक दिवस नियतीचा वरवंटा या वसतिगृहावर फिरला आणि काही अपरिहार्य कारणामुळे संस्था बंद पडली. शेवटचे एकदा वसतिगृह पाहून यावे म्हणून विजयाताई केडगावला गेल्या आणि तिथेच त्यांना पहिला हार्टअटॅक आला. पण शांत बसतील त्या विजयाताई कसल्या? साधारण सव्वा वर्षानंतर म्हणजे १९८७ ला विजयाताई वंचित विकास संस्थेत रूजू झाल्या आणि पुन्हा वसतिगृहासाठी त्यांनी जागा शोधली. सुरुवातीलाच पंधरा मुले वसतिगृहात आली आणि अनेक अडचणींतून मार्ग काढत एप्रिल १९९० ला वसतिगृह सुरू झाले. ताईंनी त्याचे नाव ’निहार’ असे ठेवले. येथेही विजयाताईंना अनेक प्रकरणे निस्तरावी लागली. ज्या संस्थेचा आर्थिक व्यवहार चार हजार रुपयांचा होता, त्या संस्थेचा व्यवहार चाळीस लाखांवर नेण्यात ताईंचा सिंहाचा वाटा होता.
 
 

 
 
फिनिक्सच्या झेपेतून ’मानव्य’चा उदय
 
’निहार’मध्ये काम करत असतानाच विजयाताईंना एड्सचे पेशंट दिसायला लागले होते. अनैसर्गिक शरीरसंबंध, असुरक्षित रक्तदान, एड्सग्रस्त आईवडिलांकडून त्यांच्या होणार्‍या संततीला एड्स होऊ शकतो, याचे ज्ञान झाले होते. १९८६ ला एड्सची पहिली केस सापडली आणि यावर रामबाण उपाय नसल्याने हा रोग बळावत राहिला. ज्यावर औषध नाही अशा या रोगाने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी आपण काही करू शकू का? हा विचार विजयाताईंच्या मनात घोळायला लागला आणि त्यांच्या मनाने एड्सग्रस्त स्त्रिया आणि मुलांसाठी काम करायचे नक्की केले. विजयाताईंचे भाऊ भय्या वैद्य, ’निहार’च्या कामात विजयाताईंबरोबर असलेल्या डॉ. अरुंधती सरदेसाई, बा. रा. पाध्ये आणि डॉ. मुकुंद घारे अशा पाच जणांनी २७ जानेवारी १९९७ बैठक घेऊन ’मानव्य’ची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिली बालवाडी सुरू करण्यात आली. तिचे नाव ’गोकुळ’ असे ठेवण्यात आले. या कामाची पावती म्हणून विजयाताईंना अनेक पुरस्कारही मिळाले. २००३ साली ’मानव्य’ची स्वत:ची इमारत भुगावला ऊभी राहिली. काम करता करताच २००५ साली विजयाताईंची प्राणज्योत मालवली.
 
पुढे विजयाताईंचेच व्रत घेऊन त्याच नेटाने हे कार्य करणारे विजयाताईंचे सुपुत्र आणि संस्थेचे अध्यक्ष शिरीष लवाटे यांना भेटण्याची संधी मिळाली. या कामात त्यांच्याच बरोबरीने खांद्याला खांदा लावून त्यांच्या पत्नी उज्ज्वला यादेखील संस्थेचे काम बघतात. वेश्या वस्तीतली मोबाईल क्लिनिकची जबाबदारी त्यांच्यावर होती. दोघांनीही स्वत:ला या कार्यात झोकून दिले आहे. १९८९ पासून तर ताई जाईपर्यंत त्यांच्याबरोबरच सगळ्या संकटांशी दोन हात करणारे अजून एक व्यक्तिमत्त्व ’मानव्या’त आहे अरूंधती सरदेसाई.
 
विजयाताईंच्या मागे अनेक अडचणींचा सामना करत शिरीष आणि उज्ज्वला संस्थेचा डोलारा पुढे नेत आहेत. एकदा अचानक गोकुळातल्या सर्व मुलांना गोवर झाली. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले तेव्हा या दोघांनी आई-बापासारखी सगळ्या मुलांची सेवाशुश्रूषा केली आणि संकटावर विजय मिळवला पण संकटे जशी पाचवीलाच पुजलेली होती. मुलांना गावातल्या शाळेत शिकायला अनेकांचा विरोध असल्यामुळे मानव्याला संस्थेतच शाळा सुरू करणे भाग पडले. पण एकशिक्षकी शाळेचीच परवानगी असल्यामुळे, एवढ्या सार्‍या मुलांना न्याय मिळणे शक्य नव्हते. त्यांचे भविष्य अंधारातच दिसत होते आणि पगारी शिक्षक नेमणे संस्थेला परवडण्यासारखे नव्हते. त्यातच २०१२ मध्ये केंद्र सरकारची सर्व शिक्षा अभियान योजना जारी झाली आणि जुन्या योजनेतील सर्व शाळा बंद करण्यात आल्या. पुन्हा मुलांना गावातल्या शाळेत पाठवावे लागले आणि पुन्हा इतर मुलांच्या पालकांनी आक्षेप घेऊन मुलांना शाळेतून घेऊन जाण्यास सांगितले. खूप प्रयत्न करूनदेखील उपयोग झाला नाही. शेवटी गटशिक्षण अधिकार्‍यांनी संस्थेलाच पहिली ते सातवीपर्यंत शाळा काढण्याची परवानगी दिली. आता संस्थेतल्या मुलांबरोबर जवळपासच्या बांधकाम मजुरांची मुलेदेखील गोकुळातल्या या शाळेत यायला लागली. यश मिळतेच, फक्त हिंमत हरायची नसते, हे शिरीष -उज्ज्वला आणि त्यांच्या संस्थेत काम करणार्‍या प्रत्येकाला माहीत आहे. म्हणूनच अनेक संकटे सतत येत असतानाही संस्थेचे काम उत्तम प्रकारे सुरू आहे.
 
पण एक चिंता शिरीष यांनी बोलून दाखवली की, सर्वसामान्य मुलांना जसे त्यांच्या आई वडिलांकडून संस्कार भेटतात, तसे भाग्य या मुलांच्या वाट्याला येत नाही. त्यामुळे सर्वसामान्य मु्लांच्या तुलनेत ही मुले मागे पडतात. उद्या १८ वर्षानंतर जेव्हा ही मुले आपले भविष्य शोधण्यासाठी बाहेर जातील, तेव्हा ते बाहेरच्या जगाशी स्पर्धा करू शकतील का? हीच चिंता ’मानव्य’शी निगडित प्रत्येकाला सतावते. मग ते १९९८ पासून संस्थेत ड्रायव्हर म्हणून काम करणारे ’कंधारे काका’ असोत, मुलांचे शिक्षक समशुद्दीन शेख असोत, संस्थेत काम करणार्‍या नर्स संजीवनी खुटवड असोत, गोकुळातला प्रत्येकजण आपल्याला काय जास्तीचे या मुलांसाठी करता येईल? याचाच कायम विचार करत असतो. याच विचारातून सुलभा खामकर, कुंदा आणि विद्या परांजपे यांनी मुलांना ओपन स्कूलमार्फत १० वी च्या परीक्षेला बसवले होते, असे अनेक किस्से ’मानव्या’त गेल्यावर ऐकायला मिळतात. आपल्या दूरदर्शी दृष्टीतून ’मानव्य’ने या मुलांना समाजात निर्भीडपणे उभे राहता यावे यासाठी अनेक योजनादेखील सुरू केल्या आहेत. त्यात मुख्य योजना आहे एचआयव्हीग्रस्त युवकांचा वधुवर मेळावा, अनेक संस्थांनी याचे समर्थन करून यात भाग घेतला. याला प्रतिसाददेखील छान मिळाला. आता समाजाने या युवकांचा स्वीकार करण्याची आवश्यकता आहे, या मुलांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलण्याची आता खरी गरज आहे. येथून बाहेर पडलेले अनेक युवक समाजात सन्मानाने जगत आहेत. ’मानव्य’तून बाहेर पडल्यानंतर अशाच एका युवकाने बीकॉम करून ’सायबर लॉ’चा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. तो सध्या अझीम प्रेमजी इन्स्टिट्यूट, बंगळुरू येथे नोकरी करतो. इतकेच नव्हे तर थायलंडला झालेल्या एका जागतिक परिषदेत त्याने एड्सग्रस्त मुलांचे प्रतिनिधित्व करत जागतिक स्टेजवर एडसग्रस्तांचे प्रश्न मांडले. मोनीत हा असाच एक दुसरा हरहुन्नरी तरुण. ’मानव्य’तून बाहेर पडलेल्या मोनीतने विशेष मुलांच्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करत चार गडी बाद केले, त्याच्या फोटोसह ही बातमी दैनिकात प्रसिद्ध झाली. शिरीषजी अशा अनेक मुलांचे किस्से सांगतात. ’मानव्य’ ने ’उन्नती सपोर्ट ग्रुप’ची स्थापना केली. हा ग्रुप १८ वर्षे पूर्ण झालेल्या आणि ’मानव्य’तून बाहेर पडणार्‍या मुलांना, समाजात सन्मानाने जगण्याचा प्रयत्न करण्यामध्ये मदत करतो. त्यांना आलेल्या अडचणी सोडविण्यास हातभार लावतो. सध्या ’मानव्य’मध्ये १० ते १८ वयोगटातील जवळपास ५० मुले-मुली आहेत. शिरीषजी सांगतात, ’’सध्या या मुलांना त्यांचा कायदेशीर हक्क मिळवून देणारं कुणीतरी पाहिजे, जेणेकरून ज्यावेळी ही मुले बाहेर पडतील तेव्हा त्यांचा समाज त्यांना सन्मानाने स्वीकारेल, त्यांना चांगले जीवन जगण्याचा हक्क मिळेल.’’
 
 
आवाहन : 
 
‘मानव्य’ ही संस्था मुख्यत्वेकरून लोकवर्गणीवर चालत असून समाजातील सर्व घटकांनी यासाठी सढळ हाताने मदत करून, समाजकार्यात आपला सहभाग नोंदवावा. आपल्याला देणगी द्यायची असल्यास ९१६८८४२६८८ या क्रमांकावर संपर्क साधावा.