आनंदयात्री रंगवल्ली विचारे सर
 महा एमटीबी  20-Feb-2018

प्रजासत्ताक दिनी राजपथावर राष्ट्रीय संचालनात महाराष्ट्र शिवराज्याभिषेक सोहळ्याचा रथ अवतरला आणि या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावला. या चित्ररथ डिझाईनचे संकल्पनाकार आहेत नरेंद्र विचारे. १९८४ सालापासून आतापर्यंत नरेंद्र यांची राष्ट्रीय संचलनासाठी १७ डिझाईन निवडली गेली. त्यांच्या चित्ररथांना लागोपाठ तीन वेळा प्रथम पारितोषिक ही मिळाले. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्‌समध्ये शिक्षक असणार्‍या नरेंद्र यांच्या सर्जनशील यशस्वी कलागाथांची प्रेरणा काय असावी ?

नरेंद्र म्हणतात, ‘‘लहानपणी परळच्या झोपडपट्टीत दहा बाय दहाचे आमचे घर. सुप्रसिद्ध चित्रकार मुळगांवकर यांनी काढलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र आमच्या घराच्या भिंतीवर लावलेले होते. बाबा कामाहून थकून यायचे. दररोज संध्याकाळी त्यांचे पाय चेपत असताना वजन पडावे म्हणून त्यांच्या पायावर उभा राही. त्यावेळी नेमका डोळ्यासमोर महाराजांचा तो फोटो असायचा. सातत्याने फोटो डोळ्यासमोर येत असताना मनाला एक चाळा लागला की, या चित्रात रंग कसे भरले गेले ? चित्रामध्ये महाराजांचे भाव कोणत्या रेषेने कसे व्यक्त केले आहेत ? दररोज ते चित्र माझ्यासाठी संशोधनाचा विषय झाला. त्यातूनच चित्रांचे जादूमयी जग माझ्यासाठी उघडले गेले. आम्ही आठ भावंडं, बाबा तृतीय श्रेणी कामगार. घरात हातातोंडाची मिळवणी करताना आईबाबांना काय सोसावे लागले असेल, याची कल्पनाच करवत नाही. पण, या अशा गरिबीतही आई उरीपोटी राबून बांगड्यांना सजवून त्याचे कलात्मक शोपीस बनवायची. तिला ती कला कुठून आली देव जाणे. मी ते पाहत आलो. मोठा भाऊ विजय यालाही रंगांचे वेड. रांगोळ्यांची हौस. ते पाहत पाहत मीही त्यात रंगून जायचो. शाळेत बापट बाई होत्या. त्या मला प्रोत्साहन द्यायच्या. मी चित्रकलेच्या दुनियेत ओढलो गेलो, यामध्ये त्यांचेही योगदान आहे. आमच्या चाळीत सुप्रसिद्ध नेपथ्यकार रघुवीर तळाशीकर, चित्रकार पार्वतीकुमार, गणपतीवाले वायंगणकर या त्रयींमुळे चित्रकला, शिल्पकला रंगांच्या दुनियेतला वैभवशाली संपन्नता मी कळत-नकळत शिकत होतो. पण, हे सगळं करताना गंभीरता नव्हती. पुढे जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्‌सला प्रवेश घेतला. एकदा परीक्षेची फी भरायला पैसे नव्हतेच. रात्रभर आईबाबा विचारमग्न बसलेले. दुसर्‍या दिवशी बाबांनी फी भरली, पण आईच्या गळ्यात मंगळसूत्र नव्हते.’’ हे सांगताना अचानक आकाशात काळे ढग जमावे तसे भाव त्यांच्या चेहर्‍यावर जमा झाले आणि त्यांचे नितळ डोळे अश्रूने तुडुंब भरले. एकच क्षण थांबून भरल्या आवाजात ते म्हणाले,’’ते मी आजही विसरलो नाही. तेव्हापासून आयुष्याचा गंभीरपणे विचार करू लागलो.’’ पुढे पुन्हा त्यांच्या चेहर्‍यावर प्रसन्नता दाटली आणि ते सांगू लागले, ’’नाना पाटेकर जे. जे. मधला माझा वर्गमित्र. सतीश पुळेकर एक वर्ष मला सिनियर. तृतीय वर्षी परीक्षेची फी भरण्यासाठी हणमंते सरांनी मला आणि नानाला कुटुंबनियोजन विषयाचं चित्रसंकल्पनेचे सरकारी काम मिळवून दिलं. नानाने आणि मी ते काम पूर्ण केले आणि आलेल्या पैशातून फी भरली. पुढे सुदैवाने मी जे. जे स्कूल ऑफ आर्ट्‌समध्ये कामाला लागलो. चित्र आणि विद्यार्थी यामध्ये जगण्याला अर्थ आला. सगळ्या धकाधकीत म. गो. राजाध्यक्ष, बाबुराव सडविलकर वगैरेंनी मला शब्दातीत मार्गदर्शन मदत केली. स्वामी समर्थांची कृपाही आहेच.’’ आज नरेंद्र विचारे यांचा गोतावळा खूप मोठा आहे, पण त्यांना मानणार्‍या विद्यार्थ्यांची तर गणतीच नाही. पैशांच्या श्रीमंतीपेक्षा माणसांच्या संपत्तीवर श्रीमंती मोजणारे नरेंद्र हे अवलिया कलाकार आहेत. परळच्या झोपडपट्टीतला सामान्य मुलगा असलेले नरेंद्र आज राष्ट्रीय कला जगतातला मानबिंदू झाले आहेत, पण त्यांच्या बोलण्यात कुठेही आयुष्याच्या संघर्षाचा, ‘मी हे केले... ते केले’ असा बडेजाव नव्हता किंवा गरिबीमुळे झालेल्या होरपळीचा विद्रोह नव्हता. आहे ते चेहर्‍यावर निस्सीम समाधान, जे एका आनंदयात्री रंगवल्लीलाच शोभेल.
 
- योगिता साळवी