नात जिव्हाळ्याचं....
 महा एमटीबी  20-Feb-2018नमस्कार मंडळी,


' माणूस जन्माला एकटा येतो आणि मृत्यूसमयीसुद्धा एकटाच असतो ' हे शास्त्रीय वाक्य मला नाही पटत.
आदिपासून अंतापर्यंतचा त्याचा प्रवास विविध माणसांनी भरून गेलेला असतो. आपल्या आयुष्यात अनेक माणसं असतात. काही रक्ताच्या नात्याची, काही जोडलेली, काही नकळत जोडली गेलेली.


त्यातली काही आपल्या अगदी जवळची, जिवाभावाची, जणू आपलं जगणं बनलेली, तर काहींच जगण आपण बनलेल, काही कर्तव्य म्हणून असलेली, काही चक्क नाईलाज, काही अपमान, निंदा.. हे सगळं शिकवण्यासाठीच असलेली, काही व्यवहारिक पातळीवरच असणारी.


जन्मापासून मृत्यूपर्यंत असंख्य माणसं असतात आपल्या आयुष्यात. येतात, जातात. काही टिकतात. काही मधेच सोडून देतात. या प्रत्येकाबरोबर आपल कळत-नकळत एक नात तयार होतच. कितीही अलिप्त, स्थितप्रज्ञ वगैरे राहणारी मंडळीही याला अपवाद नाहीत.


कधी हे नात प्रेमाच, जिव्हाळ्याच, आपुलकीच तर कधी त्रासदायक, नकोस वाटणारं, ओझ बनलेले, पण नाईलाज म्हणून टिकवून ठेवलेल.
पण या सगळ्या गोतावळ्यात असूनही अनेकदा एकटेपण जाणवते आणि काही अगदी थोड्या, विशिष्ट व्यक्तींचीच तीव्र आठवण येते, गरज भासते, उणीव जाणवते, त्याक्षणी ती व्यक्ती ताबडतोब समोर यावी असा वेडा हट्ट मन करतं.


पण सहसा ही इच्छा नाही पूर्ण होतं. एकतर बरेचदा ती इच्छा एकतर्फीच असते किंवा खरच ती अनाठायी असते.


असं काय असत त्या एकाच व्यक्तीत की इतर अनेकजण मिळूनही त्या व्यक्तीची जागा नाही भरून काढू शकत ?


खरं आहे हे, आपल्या आयुष्यात प्रत्येक नात्याला, त्यातल्या व्यक्तीला एक विशिष्ट स्थान असत. एकजण दुसऱ्याची जागा कशी भरून काढेल ?


पित्याची जागा पती नाही, पतीची जागा पुत्र नाही आणि पुत्राची जागा साक्षात भगवंतही नाही.


इतकच काय अनेक मित्रमैत्रीणीमधे पिक्चर बघायला कोणी एकच लागते, shopping साठी कोणी वेगळच, अभ्यासासाठी वेगळी आणि दु:खात, रडताना लागणारा खांदा वेगळाच असतो. इथे replacement नाही.


हे त्या व्यक्तीचं महात्म्य असत की आपली ओढच इतकी तीव्र असते, पूर आलेल्या नदीसारखी ? निश्चितच दोन्हीही, अन्यथा ही एवढी भेटीची ओढ लागणारच नाही. सागराची भेट निश्चित आहे हे माहिती असूनही नदी का बरं ओथंबून वाहते ? दुथडी भरून वाहणारी तिची दोन्ही पात्र मार्गातल्या अनेक गावांचही नुकसान करतात, याची जाणीवही तिला रहात नाही, का हे असे ?
नदी ही माता मानली जाते, मग हे एवढ बेभान रुप ती कुठून धारण करते ? अचानक मर्यादा ओलांडावी अस का वाटत तिला ? कुठून येत हे धाडस तिच्यात ? रत्नाकराची ओढ तिला इतक बेधुंद बनवते ?


जी अवस्था निसर्गात दिसते, अगदी तसच काहीस तुमच्या माझ्या सगळ्यांच्याच बाबतीत घडत.


आपल्या बहुतेक सुख दु:खात आपले जिवलग असतातच आणि असतीलही, पण तरीही असे काही क्षण निश्चितच येतात की या व्यावहारिक जगाच्या बंधनांमुळे प्रत्यक्ष भेट नाही होऊ शकत. खूप त्रास होतो अशावेळी. मग दुधाची तहान ताकावर भागवायची, या पद्धतीने फोन वर बोलणे, chating करणे अस काही तरी करावं लागतं.
पण ज्यावेळी समोरची व्यक्ती आपल्या कुठल्याही प्रयत्नांना दादच देत नाही आणि न पटणाऱ्या कारणांची जंत्री देत बसतो, तेव्हा मात्र आपण नात निर्माण करण्यात काही चूक तर केली नाही ना असा विचार नक्कीच मनात डोकावून जातो. मला अशा या कारण देणाऱ्या, आपल्याच, प्रेमाच्या माणसांना एक खूप कळकळीची विनंती कराविशी वाटते.


" भेटीलागी जिवा लागली से आस "
प्रेम आहे, म्हणून ओढ आहे,
राग आहे, म्हणून अनुराग आहे,
लोभ आहे, म्हणून अपेक्षा आहे,
आपलेपणा आहे, म्हणून ओढ आहे,
जीव आहे, म्हणून जिवलग आहे
आणि म्हणूनच तो गुंतला आहे.
हे नात्यांचे रेशमी बंध हळूवारच सोडवले पाहिजेत, नाहीतर सगळा गुंता निर्माण होईल. नात हे जपण्यासाठीच असत. त्यावर अखंड, अविरत, अहर्निश काम कराव लागत, तरच ते टिकेल, फुलेल, वाढेल, अन्यथा ते सुकून जाईल.
शेवटी नात्यांना आणि त्यातील माणसांना किती महत्त्व द्यायचे, हे आपल आपणच ठरवायच असत.


- डॉ. अनुपमा माढेकर