विस्मृतीत गेलेल्या म्हणी आणि वाकप्रचार भाग - ५३
 महा एमटीबी  02-Feb-2018
 

 
 
 
अवंती : मेधाकाकू...काय मस्त अनुभव...कालच्या चंद्रग्रहणाचा...!!..आम्ही सर्व शाळेच्या मैदानात जमलो होतो. आपल्या शाळेत तीन मोठ्या दुर्बिणी आहेत...सर्वांनी आळीपाळीने त्यातून चंद्रग्रहण पहीले...लाल चंद्र - नीळा चंद्र आणि खूप सारी उत्सुकता...खूप नवा आणि विलक्षण अनुभव...!!.. मेधाकाकू...अजून एक विचारायचय तुला...काल माझी रमाक्का, म्हणजे बाबांची धाकटी बहिण घरी आली होती, आपल्या परिसरातली दोन देवळे या ग्रहणाच्या काळांत बंद होती त्यावरून घरात चर्चा सुरु आहे कालपासून. देवळाचे रोज उघडे असणारे दरवाजे, नेमके आजच बंद का असा प्रश्न, रमाक्काने देवळाच्या व्यवस्थापकाना विचारलाय...!!..तू काय सांगशिल या प्रकारा बद्दल...??..
 
 
मेधाकाकू : अरे...व्वा...तुझी रमाक्का...आता त्या देवळाच्या व्यवस्थापकाची काही खैर नाही, हे नक्की...!!..तुझी रमा आत्या फारच योग्य आणि अगदी स्पष्ट बोलते, आता ती या विषयाचा पूर्ण छडा लावेलच आणि असलेले लोकभ्रम दूरही करेल...!!..नेमका अशा लोकभ्रमाचा...एक वाकप्रचार किती छान उपहास करतोय बघ...
 
नर्मदेत जितके कंकर तितके शंकर.
यातला उपहास असा कि आपल्या समाजात प्रत्येकाला सगळे माहित असते अशा रुबाबात काही भ्रम लोकांवर लादले जातात. आपल्या देशाच्या भौगोलिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक रचनेमधे, नर्मदा नदीचे महत्व फार मोठे आहे. नर्मदेतला कंकर म्हणजे नर्मदा नदीतला खडा, गोटा...छोटा दगड... जो आजही श्रद्धेने आपण आपल्या देवघरात, शंकराचे प्रतिक म्हणून पूजेसाठी ठेवतो. परंपरेने हि श्रद्धा व्यक्त झाली आहे, नर्मदा नदीप्रती असलेल्या आदरयुक्त भक्तीमुळे. मात्र या वाकप्रचारातील दुसरा सुक्ष्मार्थ आणि गुढार्थ वेगळेच सांगतोय. असे बघ अवंती...चंद्रग्रहण हि एक खगोलीय घटना आहे. दुसऱ्या बाजूला ‘ग्रहण’ या शब्दाचा एक अर्थ आहे...नुकसान होणे...!!..समाजात, या एका अर्थाचा फार मोठा प्रभाव आजही आहे. देवळाच्या व्यवस्थापकाचे म्हणणे असे कि ग्रहणाच्या किरणांचा प्रभाव देऊळ आणि मूर्तीवर होऊ नये म्हणून ग्रहण काळांत त्याने देवळाचे दरवाजे बंद ठेवले. आणि यालाच रमाक्काने “तुमचा भ्रम” अशा शब्दांत त्याची हजेरी घेतली. चंद्रग्रहण आणि ग्रहण लागणे या त्याच्या समजुतीचा, भ्रमाचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही असे त्याला पटवून दिले. म्हणून हा गमतीचा उपहास आठवला ...नर्मदेत जितके कंकर तितके शंकर...!!..लोकशाही मधे प्रत्येकाला असलेले विचार आणि भाषण स्वतंत्र, त्यातील मते-मतांतरे आणि खगोलीय विज्ञान याची गाफिलता...हाच यातील उपहास...!!
 
 
अवंती : आहा...आहा...रमाक्काला खूप आवडेल, आपलं हे अभ्यासातले सगळं बोलणे.
 
 
मेधाकाकू : व्यक्तीचे नांव शहराचे नांव आणि महात्म्य, एखाद्या जागेचे वैशिष्ट्य असा संदर्भ वापरून खूप म्हणी आणि वाकप्रचार, काही शतकांपासून प्रचलित झाले, ‘नर्मदेतला कंकर’ हा या नदीचे महात्म्य वापरून प्रचलीत झालेला वाकप्रचार. अवंती...आता हा माणसातील काही नेमके वैगुण्य सांगणारा वाकप्रचार...!!..
 
बारा बंदरी, पांच पुणेरी, एक जव्हारी.
हा वाकप्रचार नेमके बोट ठेवतो... माणसातील फसव्या प्रवृत्तीवर... अशी माणसे ज्यांच्यावर कोणीही पटकन विश्वास टाकत नसते...!!..कोण कोण आहेत अशी माणसे...??..यातील पहिल्या दोन शब्दांत आहेत बारा गावाचे पाणी चाखलेले, जे दुनिया पाहून आले आहेत असे बारा खलाशी (बंदरी म्हणजे समुद्र प्रवासात अनेक बंदरे पाहिलेले खलाशी). पुढच्या दोन शब्दांत आहेत पांच पुणेरी व्यक्ती (पुण्यातील अशा फसव्या व्यक्तींना ‘भामटे’ असे संबोधन इतिहासकालीन संदर्भात आजही सापडते) आणि शेवटच्या दोन शब्दांत आहे एकच जव्हारी म्हणजे सोन्या-हिऱ्याचा व्यापार करणारा जवाहीऱ्या (सोनार, जो त्याच्या वाकचातुर्यावर आपला व्यवसाय यशस्वी करतो). हा वाकप्रचार सल्ला देतोय कि असे बारा खलाशी, पांच पुणेकर आणि एक जवाहीऱ्यासारखेच फसवे असतात, त्यांच्या दिसण्यावर, बोलण्यावर सहज विश्वास ठेऊ नका कारण यांचा ठाव-ठिकाणा कदाचित उद्या सापडणारही नाही. यातला गमतीचा भाग आहे तो त्यात्या ठिकाणाचा, व्यवसायाचा आणि त्यांच्या फसव्या प्रवृत्तीचा दिलेला चपखल संदर्भ.
 
अवंती : अरेच्या...मेधाकाकू...असे एक एक वैशिष्ठ्य आणि अशी वैगुण्य नेमकी टिपून त्यांना अशा चार-सहा शब्दांत बांधणे...हि किती गमतीची गोष्ट आहे...हे मला नियमित अवाक करते.
 
 
मेधाकाकू : आता एक खुलासा करते कि अशी स्थळ अथवा व्यक्ती वैशिष्ठ्ये फक्त नकारात्मक लोकश्रूतीतच वापरली गेली असा समज होऊ शकतो मात्र तसे नाही हे अभ्यासाने समजून घेणे आवश्यक आहे...!!..आपल्या समाजात दानधर्म करण्याची वृत्ती आणि धारणा फार मोठी आहे मात्र...उजव्या हाताने दिलेले डाव्या हातालाही समजणार नाही अशी निरामय निर्मळता हे या वृत्तीचे वैशिष्ठ्य. प्रथम कुटुंबकल्याणाची योग्य व्यवस्था करूनच अशा वृत्तीने केलेल्या दानधर्माची समाजात जाहिरात होत नसते. अशा वेळी या निरामय निर्मळ दानधर्मासाठी एक फार सुंदर म्हण वापरली गेली...जी त्यातील शब्दार्थासह त्याचा योग्य भावार्थ, त्या दानधर्मातील पावित्र्य, उत्तम माणुसकी...पूज्य गंगानादीच्या महात्म्यासह प्रचलित झाली...लोकश्रुतीच्या खजिन्यातील एक दागिना ठरली. या सहा शब्दांत...आपल्या परमपूज्य गंगा नदीचे पावित्र्य आणि तीचे समाजमनातील स्थान किती सूक्ष्म उल्लेखाने मांडले गेले ते वाचून अंगावर रोमांच उभे रहाते.
 
 
वाहिली ती गंगा राहिले ते तीर्थ.
 
 
अवंती : काय छान बांधणी आपल्या भाषेची...मेधाकाकू...तूच शिकवलेस...प्रत्येकाचे मातृभाषेवर प्रेम का असायला हवे...!!...मस्त...मस्त...मस्त...!!..
 
 
 
 
- अरुण फडके