अज्ञानात सुख ’नसतं !’
 महा एमटीबी  02-Feb-2018
 
 
 
 
 
जनकल्याण रक्तपेढीमधील माझ्या प्रशिक्षण काळातली ही एक घटना. एके दिवशी मी रक्तपेढीच्या स्वागतकक्षामध्ये बसलो होतो. रक्तपेढीत आल्यानंतर झालेला आमचा मित्र आणि इथे दीर्घकाळ पर्यवेक्षक म्हणून कार्यरत असलेला गणेश शिंदे त्या दिवशी स्वागतकक्षामध्ये माझ्यासह उपस्थित होता. नेहमीची वर्दळ चाललेली होती. रुग्णांचे नातलग रुग्णांसाठी लागणाऱ्या रक्तपिशवीसाठी डॉक्टरांनी भरुन दिलेला फ़ॉर्म आणि छोट्या ट्यूबमधील रक्ताचा नमुना आणत होते. केवळ रक्तजुळवणी करुन रक्त आरक्षित करायचे आहे की रक्तघटक सोबत घेऊन जायचे आहेत यावरुन त्यांना प्रक्रियाशुल्क सांगितले जात होते आणि त्याप्रमाणे पावत्या बनत होत्या. रक्तनमुन्याची ही छोटी बाटली त्यासोबतच्या फ़ॉर्मसह शेजारीच असलेल्या मुख्य प्रयोगशाळेत पाठवली जात होती आणि पुढे तंत्रज्ज्ञ मंडळी आपले रक्तगट, रक्तजुळवणी इ. काम करत होते. मी अर्थातच निरीक्षकाच्या भूमिकेतून हे सर्व पहात होतो. अचानक एक मध्यमवयीन महिला स्वागतकक्षाशी आल्या आणि खूप चांगली ओळख असल्याप्रमाणे गणेशने हसुन त्यांचे स्वागत केले. त्यांनी दिलेला फ़ॉर्म आणि छोट्या बाटलीतील रक्तनमुना त्याने स्वीकारला आणि मुख्य प्रयोगशाळेत हे साहित्य पाठवून त्याने त्यांची पावती करायला घेतली. शंभर टक्के सवलतीची ती पावती जेव्हा मी बघितली तेव्हा मला आश्चर्य वाटले. माझे आश्चर्य ओळखून गणेशने मला सांगितले की, ती रक्ताची पिशवी या महिलेच्या थॅलेसेमियाग्रस्त मुलीसाठी दिली जाणार आहे आणि त्यामुळेच ती पूर्णत: नि:शुल्क दिली जात आहे. या घडीपर्यंत ’थॅलेसेमिया’ हा काय प्रकार असतो हेच मला माहित नव्हतं. गणेशला अर्थातच त्याबद्दलची सर्व माहिती होती, इतकंच नव्हे तर थॅलेसेमियाग्रस्त मुला-मुलींचे असे अनेक पालकही त्याच्या चांगल्याच परिचयाचे झाले होते.
 
 
स्वागत कक्षाशी चाललेल्या सततच्या वर्दळीमुळे मला लगेचच काही विचारता आले नाही. मात्र वर उल्लेख केलेल्या महिला रक्तपिशवी घेऊन गेल्यानंतर थोडा निवांत वेळ पाहुन मी गणेशला विचारले, ’थॅलेसेमिया’ हा काय प्रकार आहे ?’ आणि यानंतर गणेशने मला अगदी थोडक्या शब्दांत जे काही सांगितले ते ऐकून मी अक्षरश: सुन्न झालो. गणेश हा काही तांत्रिक विभागात काम करणारा व्यक्ती नव्हे. त्यामुळे अगदी सामान्य माणसाच्या भूमिकेतून त्याने मला थॅलेसेमिया समजावून सांगितला आणि कदाचित त्यामुळेच मला हा थॅलेसेमिया अधिक अस्वस्थ करुन गेला. तो इतकेच म्हणाला की, या अशा मुलांना आयुष्यभर आपल्या शरीरात रक्त चढवून घ्यावे लागते आणि त्यांचे आयुष्यही शक्यतो तिशीच्या पलिकडे जात नाही. त्याने दोन-तीन वाक्यात हे सांगितले असले तरी त्या वाक्यांनी मला त्या वेळेपर्यंत पूर्णत: अपरिचित असलेले एक नवीन आणि वेदनादायी असे दालन उघडले गेले. यानंतर जसजसा काळ गेला तसतशी थॅलेसेमियाबद्दलची जवळपास सर्व तांत्रिक माहितीदेखील मला समजत गेली. माझ्यासारख्या तशा बऱ्यापैकी सुशिक्षित म्हणविणाऱ्या आणि दोन अपत्यांचा पिता असणाऱ्या व्यक्तीलासुद्धा प्रत्यक्ष रक्तपेढीत काम करायला सुरुवात केल्याशिवाय ’थॅलेसेमिया’ हा शब्दही माहिती असु नये, ही बाब मला विशेष गंभीर वाटत होती. कारण ’थॅलेसेमिया’सारखा जीवघेणा विकार कुठल्याही मुलावर झडप घालु शकतो आणि तो माता-पित्यांकडुनच संक्रमित होतो हे यातले वास्तव होते. सामान्यत: साडेबारा ग्रॅमपर्यंत असणारी हिमोग्लोबिनची मात्रा जर एखाद्या व्यक्तीमध्ये खूप कमी रहात असेल तर अशी व्यक्ती थॅलेसेमिया विकाराची वाहक (carrier) असु शकते. अशा व्यक्तीला कदाचित बाहेरुन रक्त घेण्याची गरज पडणार नाही पण ’थॅलेसेमिया’ वाहक असलेले पुरुष आणि स्त्री जर विवाहबंधनात बांधले गेले तर मात्र त्यांचे अपत्य ’थॅलेसेमियाग्रस्त’ (thalessamia major) म्हणून जन्माला येऊ शकते आणि मग सुरु होते ते रक्तसंक्रमणाचे दुष्टचक्र ! आयुष्यभरासाठी !!
 
 
मला आठवते, त्या वर्षी जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्त (८ मे) सर्व थॅलेसेमियाग्रस्त मुलांसोबत दर वर्षीप्रमाणे रक्तपेढीने काही मनोरंजनाचे कार्यक्रम ठरविले होते. यासाठीची निमंत्रणे या मुलांना आपण घरोघरी जाऊन द्यावीत असे सर्वांनी ठरवले आणि आम्ही काही जणांनी नावे वाटुन घेतली. माझ्याकडे असलेल्या नावांपैकी एका घराचा माग काढत काढत जेव्हा मी या घरी पोहोचलो तेव्हा साहजिकच ’रक्तपेढीच्या माणसाला’ घरात पाहुन घरातल्या मंडळींना आश्चर्य वाटले. यानंतर मी माझ्या येण्याचे प्रयोजन जेव्हा सांगितले तेव्हा घरातील सर्वजण एकदम सुन्न झाले. कारण ज्या बालकासाठी मी एका चांगल्या कार्यक्रमाचे निमंत्रण घेऊन आलो होतो, ते जेमतेम तेरा वर्षाचे मूल दुर्दैवाने महिनाभरापूर्वीच निधन पावल्याचे मला समजले. ’थॅलेसेमिया’ हा असा असतो. या घटनेनंतर तर मला खूपच अस्वस्थता आली. थॅलेसेमियाग्रस्त बालकांसाठी मोफ़त रक्तघटकांचा पुरवठा करणे, हे ठीक आहे. पण हा काही थॅलेसेमियावरचा उपाय नव्हे. चांगल्या गुणवत्तेचे रक्तघटक फ़ार फ़ार तर अशा मुलांचे आयुर्मान काही प्रमाणात वाढवू शकतील. याखेरीज ’बोन मॅरो ट्रान्सप्लांट’ नावाची एक शस्त्रक्रियाही आहे, जी एखाद्या रुग्णास थॅलेसेमियामुक्त करु शकते पण यातही येणारा प्रचंड खर्च आणि रुग्णाला जुळणारे ’बोन मॅरोज’ उपलब्ध होणे या गोष्टी तशा हातात नसलेल्याच. थॅलेसेमियाच्या बाबतीत हातात असणारी गोष्ट एकच. ती म्हणजे शक्यतो लग्नापूर्वीच ’मी थॅलेसेमिया-वाहक आहे अथवा नाही’ हे प्रत्येकाने समजून घेणे. अर्थात हे मी लिहिताना सहजपणे लिहिले असले तरी थॅलेसेमिया-जागृतीबद्दल एकंदर सर्वत्र आनंदच आहे. अगदी मला स्वत:ला तरी लग्नापूर्वी थॅलेसेमिया कुठे माहिती होता ?
 
 
पुण्यातील एका ज्येष्ठ स्त्रीरोग तज्ज्ञांनी मला एकदा सांगितले होते की, त्यांच्या जवळच्या माहितीतील एक असे दांपत्य त्यांनी पाहिले होते, ज्यातील पती-पत्नी या दोघांचेही स्त्री-रोग या विषयातील पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण (M.D. Gynac.) झालेले. पण त्यांचे पहिलेच मूल दुर्दैवाने थॅलेसेमियाग्रस्त म्हणून जन्माला आले होते. वैद्यकीय क्षेत्रातील उच्चशिक्षितांच्या बाबतीत ही परिस्थिती तर सामान्यांच्या बाबतीत काय बोलावे ? एकूणच ’थॅलेसेमिया’चा शाप घेऊन कुठलेच बालक जन्माला येऊ नये असे जर आपणास वाटत असेल तर थॅलेसेमियाबाबतची जागृती हा एकमेव मार्ग आहे. प्रत्येक उपवर तरुण-तरुणीस स्वत:ची थॅलेसेमियाबाबतची स्थिती समजायलाच हवी. एच. आय. व्ही. बाबत आता तरुण बऱ्यापैकी जागरुक आहेत, पण थॅलेसेमिया त्यापेक्षाही भयावह आहे, हेही त्यांनी समजून घ्यायला हवे. यात कुणी थॅलेसेमिया-वाहक सापडला तर अशा व्यक्तीने एखाद्या पूर्णत: सामान्य असणाऱ्या जोडीदाराशी विवाह करणे सुरक्षित असते, हेदेखील त्यांना कळायला हवे. तसेच एखादा तरुण अथवा तरुणी थॅलेसेमिया-वाहक असणे म्हणजे फ़ार काहीतरी भयानक गोष्ट आहे असे मुळीच नाही, हे समजून घेण्याची प्रगल्भता समाजानेही दाखविण्याची गरज आहे. हे जर असे घड्त गेले तर आपण हळुहळु थॅलेसेमियामुक्त समाजाच्या दिशेने वाटचाल करु शकु. अर्थात आपल्या समाजाचा एकंदर आवाका, प्रांत-भाषा-जातींचे वैविध्य, शैक्षणिक स्थिती, आर्थिक स्थिती या सर्वांचा विचार करता हे उद्दीष्ट सोपे नाही. खूप जणांनी life mission म्हणून थॅलेसेमिया-जागृतीचे काम करण्याची गरज आहे. जनकल्याण रक्तपेढीने अगोदरच याबद्दलचे काम समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये काही सेवाव्रती आणि स्वयंसेवकांच्या मदतीने करण्यास सुरुवात केली आहे. थॅलेसेमिया हद्दपार करण्याच्या उद्दीष्टाने ही सर्व मंडळी महाविद्यालये, आय. टी. कंपन्या, विवाहसंस्था – थोडक्यात जिथे जिथे म्हणून तरुण-तरुणींचे आधिक्य असेल – अशा सर्व ठिकाणी थॅलेसेमियाजागृतीचे कार्यक्रम घेत आहेत.
 
 
’माना कि अंधेरा घना है, पर दिया जलाना कहां मना है ?’ या उक्तीप्रमाणे छोट्या स्वरुपात असले तरी आग्रहपूर्वक हे जागरण घडवून आणण्याचा प्रयत्न होत आहे. एक ना एक दिवस ज्ञानाचा लख्ख प्रकाश सर्वत्र पसरेल अशी खात्री आहे, पण आज तरी या संक्रमणाची सुरुवात ’अज्ञानात सुख मानणाऱ्यांना ’ते तसं मुळीच नसतं’ किंबहुना ’अज्ञान’ हे जीवघेणं ठरु शकतं’ हे ठासुन सांगण्यापासुनच करावी लागणार हे मात्र निश्चित !
 
 
 
- महेंद्र वाघ