‘ती’ दाई ठरली हजारोंची जननी...
 महा एमटीबी  02-Feb-2018
 
 
 
 
 
मातृत्वाची चाहूल लागली की ’बाई’चं जीवनच पूर्ण बदलून जातं. गर्भात वाढत असलेल्या त्या छोट्याशा जीवाला जपण्याची आणि त्याचबरोबरच ’त्या’ जीवाला सुरक्षितरित्या या जगामध्ये आणण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी ’तिला’ पार पाडावी लागते. बाळ जन्माला येण्याची वेळ जवळ आली की, आईबरोबरच कुटुंबातील प्रत्येक सदस्य डॉक्टरांना आई आणि बाळाच्या जीवाला जपा, असं वारंवार सांगतात. खरंतर आईबरोबरच बाळंतपण करणार्‍या डॉक्टरांना जोखीम पत्करून आई व बाळ सुखरूप राहील, यासाठी डोळ्यात तेल घालून ती जबाबदारी पार पाडावी लागते. पण, त्या वेळेस डॉक्टर बजावत असलेली भूमिका, त्यांच्या कामाची दखल फारशी घेतली जात नाही. आज वैद्यकीय क्षेत्रामधील नवनवीन तंत्रज्ञानामुळे गरोदरपणाच्या काळात आई किंवा बाळाला धोका असल्यास त्याची आधीच कल्पना मिळते. पण, एक काळ असा होता की, ज्यावेळेस कशाचाच आधार नसताना घरच्या घरी बाळंतपणं उरकली जायची. तरीदेखील ती जोखीम पत्करून, ऐनवेळी उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करून सुखरूपरित्या बाळंतपणं केली जात असत. १९४० मध्ये वैद्यकीय सोई-सुविधांचा अभाव असलेल्या काळामध्ये केरळमध्ये राहणार्‍या सुलगट्टी नरसम्मा यांनी एक दाई म्हणून बजावलेल्या कामाचं शब्दांत रूपांतर करता येणे खरंच कठीणच आहे. वय वर्ष ९७ असलेल्या सुलगट्टी यांनी गेल्या ३० वर्षांपासून आतापर्यंत हजारो जीवांना या जगात सुखरूप आणण्याचे महान काम केले आहे.
 
 
सुलगट्टी यांनी आतापर्यंत घरीच १५ हजार महिलांचे सुखरूप बाळंतपण केले आहे. त्यांनी बजावलेल्या कामाची दखल घेत त्यांना यंदाचा ’पद्मश्री’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. कोणत्याही वैद्यकीय सुविधांचा आधार न घेता कर्नाटकमधल्या दुर्गम भागातील महिलांची त्या प्रसूती करतात. आश्‍चर्याची बाब म्हणजे, वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी सुलगट्टी यांनी प्रसूती करणार्‍या महिलेची मदत केली होती. वयाच्या २० व्या वर्षी हाती घेतलेल्या केलेल्या या कामाचा प्रवास त्यांच्या वयाच्या ९६ व्या वर्षीही निरंतर सुरूच आहे. प्रसूतीचे काम करण्याव्यतिरिक्त शेतीची अनेक अवघड कामांची जबाबदारीही त्यांनी पार पाडली. आपलं संपूर्ण आयुष्य या गरोदर महिलांचं सुखरूप बाळंतपण करण्यासाठी घालवायचं, असा दृढनिश्‍चय त्यांनी केला. गरीब, आदिवासी महिलांची प्रसूती करण्यास त्या जास्त प्राधान्य देतात. विशेष म्हणजे, यासाठी त्या कोणत्याही प्रकारचा मोबदला घेत नाही. फक्त एवढ्यावरच न थांबता सुलगट्टी यांनी आपल्या कामाचा वारसा पुढे चालावा, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा खंड पडू नये, यासाठी आजूबाजूच्या परिसरामध्ये राहणार्‍या १८० तरुणी, महिलांना प्रसूती कशी करायची याबाबतचे प्रशिक्षण दिले आहे. सध्या वयोमानाप्रमाणे सुलगट्टी यांना वयाच्या काही तक्रारी उद्भवत असल्याने सध्या एका नर्सिंग होममध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या नर्सिंग होममध्ये सुलगट्टी यांच्यावर उपचार करणारे डॉ. श्रीराम पावागडा यांचादेखील सुलगट्टी यांच्याच हातून जन्म झाला होता.
 
 
सुलगट्टी सांगतात की, ’’गरोदर बाईसाठी तो नऊ महिन्यांचा काळ आनंददायी असला तरी शारीरिकदृष्ट्या कठीण असतो. कारण, त्या काळात होणार्‍या शारीरिक, मानसिक बदलांमुळे आरोग्य जपणे तितकेच गरजेचे असते. योग्य आहाराबरोबरच तुम्हाला योग्य सल्ले मिळणे महत्त्वाचे असते.’’सुलगट्टी यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याने त्यांच्या कामाला नेहमीच प्रोत्साहन दिले. गेल्या ७० वर्षांच्या कालावधीमध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनेक बदल घडून आले आहेत. त्यामुळे आता घरी बाळंतपण न करता रीतसर रुग्णालयात जाण्यालाच प्राधान्य दिले जाते. परंतु, एक दाई म्हणून सुलगट्टी यांच्याकडे प्रसूती करण्याची इच्छा कर्नाटकमध्ये राहणार्‍या अनेक गरोदर स्त्रिया दर्शवितात. त्यांच्या या कार्याची दखल घेत सुलगट्टी यांना टुमकुर विश्‍वविद्यालयाच्या वतीने ‘डॉक्टरेट’ ही पदवी प्रदान करण्यात आली आहे.
 
 
- सोनाली रासकर