हिंदू राष्ट्राचे संवर्धक श्रीगोळवलकर गुरुजी
 महा एमटीबी  19-Feb-2018
 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक प्रा. माधव सदाशिव गोळवलकर म्हणजेच श्रीगुरुजी यांची आज जयंती. श्रीगुरुजींचे जीवन म्हणजे अखंड ध्येयाचा ध्यास घेतलेले आणि त्यासाठी आपले जीवन समिधेसम अर्पण करणारे असेच होते. श्रीगुरुजींनी संघाच्या कार्याचा संपूर्ण भारतभरात विस्तार तर केलाच पण सोबतच समाजाच्या सर्वच क्षेत्रात संघाला पोचवले. हिंदू, हिंदुराष्ट्र याबाबतचे श्रीगुरुजींचे विचार फारच मौलिक आहेत. आज त्यांच्या जयंतीनिमित्त हिंदू, हिंदुराष्ट्र आणि राष्ट्रीयत्वाशी संबंधित हा लेख...
 
भारतामध्ये, भारतीय जनता पक्षाचे सरकार मोठ्या बहुमताने निवडून आले. केंद्रस्थानी भाजपचे नेते राष्ट्रपती, उपराष्ट्रपती व पंतप्रधान म्हणून स्थानापन्न झाले. तेव्हापासून रा. स्व. संघ व त्यांची हिंदूराष्ट्रासंबंधीची धारणा हा चर्चेचा विषय झालेला आहे. हिंदू/हिंदुराष्ट्र याबाबतीत देशामध्ये काही ठराविक विचारांच्या गटांमध्ये फार मोठा कोलाहल माजला आहे. खर्‍या अर्थाने हिंदू किंवा हिंदुराष्ट्र या शब्दाने एवढा मोठा वाद निर्माण करून देशाचे नुकसानच होत आहे. शंभर वर्षांपूर्वी १९१७ साली तत्कालीन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंडियन नॅशनल काँग्रेस)च्या अध्यक्षा ऍनी बेझंट यांनी देशातील हिंदुंना त्यांचा धर्म आणि मातृभूमीचे संरक्षण स्वतःच करण्याचे आवाहन केले होते. त्या म्हणाल्या होत्या की, हिंदुंनीच जर त्यांचा धर्म (हिंदुइझम) वाचवला नाही, तर दुसरे कोण त्याला वाचवील? केवळ हिंदूच हिंदुस्थानाला वाचवू शकतील. अन्य कोणी नाही. हिंदुस्थान म्हणजे हिंदू धर्म.
 
या विचारांच्या पार्श्वभूमीवर श्रीगुरुजींच्या हिंदू राष्ट्रासंबंधीच्या विचारांची चर्चा करणे प्रासंगिक होईल. १९ फेब्रुवारी ही श्रीगुरुजींची जन्मतारीख आहे. (जन्मः १९ फेब्रुवारी १९०६; मृत्यू : ५ जून १९७३) समाजासाठी जीवनाची आहुती देणार्‍या भारतीय ऋषीमुनींची उज्ज्वल परंपरा १९२० शताब्दीपर्यंत चालली. २१ व्या शतकात ही परंपरा जवळपास लुप्तप्राय झाल्यात जमा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक प्रा. माधवराव सदाशिव गोळवलकर म्हणजे श्रीगुरुजी या परंपरेतील एक गौरवशाली महापुरुष. हिंदुत्व/हिंदुइझम हे निधर्मीपणाशी म्हणजेच सर्वधर्मसमभावाशी विरुद्धार्थी नसून समानार्थी आहे किंवा सर्वधर्मांचा सन्मान ठेवणारे आहे. हिंदुइझम अन्यधर्मीयांना फक्त सहन करीत नाही तर ते दिव्यत्वाकडे जाणार्‍या अन्य सर्व मार्गांचा सन्मान करते. भारत हा हिंदू मूल्यांमुळे व हिंदुंच्या बहुसंख्येमुळे निधर्मी आहे व निश्चितच निधर्मी राहील. जोपर्यंत भारतामध्ये ऐंशी टक्के हिंदू लोकसंख्या राहील, असे मत स्वामी विवेकानंदांपासून ते समाजवादी चिंतक अच्युत पटवर्धनांसारख्या अनेक विचारवंतांनी मांडले आहे. भारतामध्ये केंद्रीय शासनातर्फे दर दहा वर्षांनी करण्यात आलेल्या गेल्या काही जनगणनांमधून असे दिसून येत आहे की, सातत्याने हिंदू समाजाची लोकसंख्या घटत चालली आहे व तुलनात्मकरित्या अहिंदुंच्या वाढीचा वेग वाढत चालला आहे. हे देशासमोरील एक मोठे संकट ठरू शकते. हिंदू संस्कृतीचे भवितव्य अनिश्चित असल्यामुळे निर्माण झालेल्या अस्वस्थतेचा एक फार मोठा अंतःप्रवाह हिंदूंमध्ये आहे. सध्याच्या काही वर्षांमध्ये दिखाऊ उदारमतवादी लोकांनी निधर्मीपणाची एकच बाजू खुलवून जो अन्वयार्थ लावला आहे, त्यामुळे हिंदूंमधील असंतोष वाढू लागला आहे. आज निधर्मीपणाचा जो विकृत प्रवाह चालला आहे त्यामुळे हिंदुत्वविरोधी ते निधर्मी (सेक्युलर) आणि हिंदुत्व मानणारा ते जातीयवादी (कम्युनल) असे विकृत समीकरण देशात पसरले आहे. हेच मुळात देशाला घातक आहे. यासंदर्भात एका भाषणात बोलताना श्रीगुरुजी म्हणाले होते, “आजकाल आपल्या देशातील अनेक लोकांना असे वाटते की, आपण जे कोणते कार्य हाती घेऊ ते देश, धर्म, जात आदी संकुचित मर्यादा ओलांडून संपूर्ण विश्वाचा व्यापक विचार करणारे आणि समस्त मानवजातीचे हित साधणारे असले पाहिजे. आपल्यात या विचारांच्या समर्थनार्थ त्यांच्यापैकी काहीजण असे प्रतिपादन करतात की, रॉकेट व क्षेपणास्त्रांच्या आजच्या या युगात अंतर नावाची वस्तूच अस्तित्वात राहिली नाही; देशाच्याच सीमा हा शब्दप्रयोग आता अर्थविहीन झाला आहे. सारे विश्व जणू आकुंचन पावले आहे. स्वाभाविकपणेच त्यांना असे वाटते की, देश, राष्ट्र आदी कल्पना आता कालबाह्य झाल्या आहेत आणि म्हणूनच जागतिक ऐक्य हेच आपल्या सर्व उपक्रमांचे उद्दिष्ट असले पाहिजे. त्यांच्या या विचारांतून व प्रतिपादनातून ओघानेच निघणारा निष्कर्ष असा की, आंतरराष्ट्रीय भूमिकेतून विचार करणारे जे आधुनिक वाद आहेत, केवळ त्यांच्याआधारेच जागतिक ऐक्याचे हे उद्दिष्ट साध्य होईल. अशा परिस्थितीत आपल्यासमोर स्वाभाविकपणेच असा प्रश्न उभा राहतो की, हिंदूंचे राष्ट्रीय जीवन सुसंघटित करण्याचे जे कार्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हाती घेतले आहे, ते जागतिक ऐक्यच आणि संपूर्ण मानवजातीचे हित या भावनांशी कितपत सुसंगत आहे?’’ भारताची फाळणी झाल्यानंतर लक्षावधी हिंदू कुटुंबे, आपली पिढीजात घरेदारे, जमीनजुमला, संपत्ती, सुखी जीवनाची आशा, सारे काही सोडून स्थलांतर करून केवळ आपला धर्म टिकविण्यासाठी बिकट परिस्थितीमध्ये जगणे मान्ये करून का बरे भारतामध्ये आली? याच्या मुळाशी काही निश्चित तत्त्व किंवा प्रेरणा आहे का? असल्यास ती काय आहे? माणूस सर्वस्वाचा त्याग करणे मान्य करतो पण आपला धर्म किंवा आपली ओळख (Identity) का बरे सोडत नाही? या प्रश्नाचा विचार प्रा. सॅम्युअल हन्टिंग्टनच्या पुढे उल्लेख केलेल्या दोन सुप्रसिद्ध पुस्तकांमध्ये केलेला आहे. हे विचार श्रीगुरुजींच्या हिंदू राष्ट्राच्या अस्मितेच्या संबंधातील विचारांशी मिळतेजुळते आहेत. सॅम्युअल हन्टिंग्टन यांनी त्यांच्या Identity Who ­are We? The Challenges to ­americas National Identity या ग्रंथामध्ये राष्ट्राची ओळख (Identity) म्हणजे काय या प्रश्नाची सखोल मांडणी केली आहे. तसेच आपण कोण आहोत? अमेरिकेच्या राष्ट्रीय ओळखीसाठी असा महत्त्वाचा भाग कोणता आहे जो इतर लोकांपासून वेगळा करून दाखविता येईल? या प्रश्नाचे विवरण केले आहे. त्यांचे अतिशय स्वच्छ, स्पष्ट आणि असंदिग्ध अनुमान आहे की, अमेरिकन लोक हे मूलतः धार्मिक लोक आहेत. अँग्लो -प्रॉटेस्ट्‌ट संस्कृती ही अमेरिकेच्या राष्ट्रीय ओळखीचा गाभा आहे आणि धर्म व राष्ट्रीयता या दोन्ही गोष्टी हातात हात घालून नांदतात. अमेरिका हे असे राष्ट्र आहे की ज्याचा आत्मा चर्च आहे. आत्मा या शब्दाचा अर्थ स्पष्ट करताना लेखक म्हणतात की, आत्मा म्हणजे हृदयातील गूढ आठवणींमध्ये जतन करून ठेवलेला समान इतिहास, परंपरा, संस्कृती, नायक आणि खलनायक, तसेच जय आणि पराजय. हन्टिंग्टन पुढे आग्रहाने प्रतिपादन करतात की, ’’अमेरिकन लोकांनी त्यांच्या राष्ट्रांची अँग्लो-प्रॉटेस्टंट संस्कृतीमधील मुळे नाकारली तर अमेरिका स्वतःची ओळख व अमेरिकन या शब्दाचे विशेषत्त्व गमावून बसेल. त्यांना असे वाटते की, अमेरिकन ही ओळख सध्या गंभीर परिस्थितीचा सामना करीत आहे. अमेरिकन या शब्दाची ओळख अश्र्वेतवर्णी व बिगर अँग्लोव-प्रॉटेस्टंट लोकांच्या अमेरिकेत देशांतर करण्यामुळे झालेल्या लोकसंख्येच्या असमतोलातून आणि लढाऊ इस्लामच्या जागतिक पातळीवरील उदयामधून धोक्यात आलेली आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे अमेरिकन व्यक्तित्वाचा र्‍हास फक्त अमेरिकन लोकच थांबवू शकतील. त्यांचा वंश व धर्म काहीही असो. त्यांनी जर अमेरिकेच्या इतिहासामध्ये शतकांपासून प्रिय असलेल्या अँग्लो -प्रॉटेस्टंट संस्कृतीशी, परंपरांशी आणि मूल्यांशी स्वतःला जोडून घेतले तर ही परिस्थिती पालटेल. जगभर परत उदयाला येणार्‍या धार्मिकतेच्या पार्श्वभूमीवर जर अमेरिकन लोक त्यांची ही राष्ट्रीय ओळख व राष्ट्रीय उद्देश शोधण्याकरिता धार्मिकतेकडे वळले तर त्याबद्दल आश्चर्य वाटू नये. श्रीगुरुजींनी मांडलेल्या एका महत्त्वाच्या विचाराशी मिळतेजुळते असे विचार सध्याचे अमेरिकितील विद्वान लेखक प्रा. सॅम्युअल हन्टिंग्टन यांनी त्यांच्या जगभर चर्चा होत असलेल्या Clash of Civilizations नावाच्या सुप्रसिध्द ग्रंथामध्ये मांडलेले आहेत.
 
हन्टिंग्टनचे विचार गुरुजींच्या विचारांशी किती मिळतेजुळते आहेत, हे गुरुजींच्याच पुढील वक्तव्यांद्वारे स्पष्ट होते, आधुनिक विचारवंत हेच काही जागतिक ऐक्य व विश्वकल्याण या भूमिकेतून विचार करणारे पहिले विचारवंत नव्हेत. फार प्राचीन काळी, म्हणजे आजच्या तथाकथित आधुनिक युगाचा उदय होण्यापूर्वी कितीतरी आधी, आपल्या या भूमीतील द्रष्ट्या ऋषीमुनींनी या महत्त्वाच्या प्रश्नांवर खूप खोलवर विचार केलेला आहे. संपूर्ण मानवजातीच्या ऐक्याची, संघर्षविरहित आणि दुःखविहीन अशा आदर्श जगाची अतिप्राचीन काळापासून आमच्या अंतःकरणात झंकारलेली आहे. युगानुयुगे आम्ही अशी प्रार्थना करीत आलो आहोत की, ’सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः|’
 
गुरुजी पुढे म्हणतात, “परंतु जगातील सद्यस्थितीकडे दृष्टिक्षेप केला तर, सार्वत्रिक संघर्ष आणि विध्वंसक वृत्ती यांनी संपूर्ण मानवजातीचा जणू विच्छेद आरंभिला असल्याचे कठोर सत्यच नजरेला पडते.’’ या विचारप्रणालीच्या अगदी विरुद्ध अशी दुसरीही एक विचारप्रणाली आहे. राष्ट्रवादाची मुळे इतक्या खोलवर रुजलेली आहेत आणि ती इतकी पुरातन आहेत की, ती नष्ट करणे सर्वथा असंभव आहे, असे या विचारप्रणालीचे मुख्यच सूत्र आहे. आंतरराष्ट्रीय साम्यवादाचा पुरस्कार करण्यासाठी रशियाने राष्ट्रवादाचा त्याग केला, परंतु अनुभवांती त्यांच्या असे लक्षात आले की, राष्ट्रभावना नष्ट केली तर, त्याचबरोबर देशासाठी सर्वस्व अर्पण करण्याची प्रेरणाही नष्ट होते. साम्यवादी क्रांतीच्या पहिल्या झपाट्यात रशियामध्ये काही प्रमाणात भौतिक प्रगती झाली हे खरे, परंतु हळूहळू लोकांचा उत्साह ओसरू लागला. श्रम करण्याची प्रेरणा उत्तरोत्तर कमीकमी होऊ लागली. कारखान्यातील कामगार संगिनींच्या धाकाशिवाय काम करेनासे झाले. पुढे दुसर्‍या महायुद्धात हिटलरचे रणगाडे रशियाची भूमी पादाक्रांत करीत पुढेपुढे सरकू लागले. तेव्हा या संकटप्रसंगी आंतरराष्ट्रीय वादाची किंवा साम्यवादाची घोषणा रशियन जनतेमध्ये उत्साह व चैतन्य निर्माण करू शकली नाही. या घटनेने रशियन नेत्यांचे डोळे उघडले. रशियन जनतेची सुप्त देशभक्ती जागृत करावयाची असेल तर त्यासाठी मातृभूमी आणि पराक्रमी पूर्वज यांच्याविषयी रशियन जनतेच्या अंतःकरणात वसत असलेल्या निष्ठेलाच आवाहन करणे आवश्यक आहे, हे त्यांना कळून चुकले. यावरून हे स्पष्ट होते की, मातृभूमी, समाज व परंपरा यांच्याविषयीची श्रद्धा हीच व्यक्तीच्या अंतःकरणात सेवेची व सर्वस्व समर्पणाची प्रेरणा उत्पन्न करू शकते. राष्ट्र संकल्पनेमध्ये नेमक्या याच गोष्टी अंतर्भूत आहेत.
 
यावरून असा निष्कर्ष निघतो की, राष्ट्र्‌वाद नष्ट करता येणार नाही, इतकेच नव्हे तर तो नष्ट करून चालणारही नाही. त्यामुळे आता प्रश्न शिल्लक उरतो तो एवढाच की, राष्ट्रीय आकांक्षा व जागतिक कल्याण यांचा मेळ कसा घालायचा? (आजवर या दिशेने अनेक प्रयत्न वेळोवेळी झाले आहेत. मात्र हे प्रयत्न तोकडे पडले. उदा. संयुक्त राष्ट्र संघाच्याच माध्यमातून काश्मीरचा प्रश्न सुटला तर नाहीच तर तो अधिकच चिघळला.)
 
आम्हा हिंदूंपाशी मात्र या प्रश्नाचे उत्तर आहे. आमचे हे उत्तर भौतिकवादावर आधारलेले नाही. संपूर्ण जगाच्या कल्याणाच्या हेतूने निर्माण केलेली कोणतीही योजना तिच्याशी संबंधित असलेल्या व्यक्तींच्याच मनात मनुष्यमात्राविषयी ज्या प्रमाणात खरेखुरे प्रेम असेल त्या प्रमाणातच यशस्वीच होऊ शकेल. आपण सर्वांचा नित्याचा अनुभव असा की, आपापल्या अंगभूत वैशिष्ट्यांचा विकास केल्यानेच माणसाचा परिपूर्ण विकास होऊन तो सुख व आनंद प्राप्त करू शकतो. आपले लक्ष्य राष्ट्रकल्पनेचा उच्छेद करण्याचे नसून राष्ट्राराष्ट्रांमध्ये परस्परपूरक असे सामंजस्यच निर्माण करण्याचे आहे. आपल्यापाशी असलेले अद्वितीय ज्ञान समस्त मानवजातीला देता यावे आणि स्वतःचे अस्तित्व कायम टिकवून जागतिक ऐक्यासाठी, जगाच्या कल्याणासाठी चाललेल्या प्रयत्नांतील आपला वाटा उचलणे शक्य व्हावे, यासाठी सर्वप्रथम आवश्यक गोष्ट कोणती असेल तर ती ही की, आपण सार्‍या जगासमोर आत्मविश्वासयुक्त, सामर्थ्यसंपन्न आणि विजिगीषू राष्ट्र म्हणून उभे ठाकले पाहिजे. युगानुयुगांचे हे राष्ट्रीय उद्दिष्ट गाठण्याच्या मार्गावरील पहिले पाऊल म्हणून, हिंदू समाजाच्या विस्कळीत घटकांचे आध्यात्मिक व भौतिक अशा दोन्ही स्तरांवर अभेद्य, सुसंघटित जीवन उभे करण्यामागचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने संकल्प केला आहे. हिंदू संघटनेचे यथार्थ व व्यवहार्य असे जागतिक लक्ष्य कोणते असेल, तर ते हेच आहे.
 
 
 
- मधू देवळेकर