मेरे पास आओ मेरे दोस्तो एक किस्सा सुनो...
 महा एमटीबी  17-Feb-2018


 

 

नाही नाही, आज गाणं ऐकवणार नाही, घाबरू नका. आज मी कोणाची तरी गोष्ट सांगणार आहे. हे गाणं म्हणजे त्या व्यक्तीचं आयुष्य... किंबहुना हाच त्याचा स्वभाव. रंगतदार किस्से सांगत सगळ्यांचं अतोनात प्रेम मिळवणारा हा माणूस म्हणजे प्रसाद ओक. त्याचे किस्से देखील त्याच्या कलाकृती सारखेच, अजरामर. चंदेरी दुनियेत आज उत्कृष्ठ नट म्हणून ओळखला जाणाऱ्या या कलावंताने सुरुवात केली ती गायक म्हणून. त्यावेळी कोणाला कल्पनाही नसेल की हा पुण्याचा गायक पुढे जाऊन भन्नाट अभिनय तसेच दिग्दर्शनही करेल. 

 
प्रसाद बद्दल विकिपीडियामध्ये लिहिलेली माहिती मला तुम्हाला नाही द्यायची. ते तुम्ही कधीही उघडून वाचू शकता. मी असा प्रसाद सांगणार आहे जो, फक्त मोजक्याच लोकांना ठाऊक आहे. त्याच्या जवळच्या काही मित्रांपैकी आहेत चिन्मय मांडलेकर, मंदार देवस्थळी, जितेंद्र जोशी व पुष्कर श्रोत्री. ह्या सगळ्यांनी प्रसादचा, २५ वर्षांचा प्रवास अगदी जवळून पाहिला आहे. पुण्यातून मुंबईत आल्यावर प्रसादने दुकानाच्या बाहेर असलेल्या बाकड्यावर झोपून फक्त बिस्कीट आणि पाण्यावर दिवस काढलेत. हे सांगण्याचं कारण फक्त इतकंच आहे की, जर आपण फक्त यशोगाथा ऐकली की कदाचित आपल्याला यश मिळेल पण एखाद्याची struggleच्या गोष्टी ऐकल्यावर आपल्याला हे कळतं की नेमकं हे यश मिळवायचं कसं. जो खरा कलाकार असतो, फक्त तोच हे सगळं (struggle) सहन करू शकतो आणि त्यातूनच एक वेगळी ताकद निर्माण होते. मग कुठलंही काम करा, ते थेट प्रेक्षकांच्या मनाला भिडते. बाकीच्यांना ते सहनच होणार नाही. " Struggle आहे पण धीर सोडणार नाही" हे धोरण पण प्रसादने कधी सोडले नसेल, म्हणून आज एवढं यश एवढा आदर मिळवलाय त्यानी.
 

 

 

दिग्दर्शक होण्याची स्वप्न घेऊन आलेल्या प्रसादला २५ वर्ष वाट पाहावी लागली ते स्वप्न पूर्ण होण्यासाठी. अनेक वर्ष अभिनेता, गायक म्हणून नाव कामविल्यानंतर प्रसादने 'कच्चा लिंबू'चे दिग्दर्शन केलं आणि पहिल्याच बॉलला त्याने असा काही षटकार मारला की प्रेक्षक बघतच राहिले. 'स्पेशल चाईल्ड' वर अनेक सिनेमे येऊन गेले पण चार भिंतींच्या आतले त्यांचे problems कोणीच हाताळले नाही. असले अचाट धाडस प्रसादने केले, ते ही 'ब्लॅक अँड व्हाईट'मध्ये. ह्या चित्रपटातला एक सीन मनात घर करून गेला. त्यात सोनाली कुलकर्णी खाटेला टेकून बसली आहे. तिच्या समोर केरसुणी, भांडी,चपला पडलेले आहेत. मागे खाटेवर मुलगा (मनमीत) रडत असतो आणि बाप रवी जाधव दाराजवळ उभा असतो. काहीही मारामारी (violence) न दाखवता, त्या खोलीत काय घडलं असेल हे स्पष्ट कळून येतं. काहीही डायलॉग नसलेला हा सीन बरच काही बोलून जातो. या सीनचं महत्व यासाठी अधोरेखित करावं वाटतं कारण त्याच्या आधीच सीन अक्षरशः अंगावर काटा आणणारा होता आणि पुढे पडद्यावर काय दिसणार या संभ्रमात प्रेक्षक असताना प्रसादने अगदी प्रतिकात्मक स्वरूपात वरील सीन आपल्या समोर मांडला आहे. 'कच्चा लिंबू' हे उत्तम दिग्दर्शनाचं उदाहरण आहे, असं म्हटल्यास अधिकच ठरणार नाही. 
 

 

प्रसाद स्वतः इतका चेष्टा मस्करी करणारा असून एवढा संवेदनशील चित्रपट कसा काय बनवला, हे विचार करूनच प्रेक्षक थक्क झाले होते. चेष्टा मस्करी करणे हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवलाय, असं प्रसाद जरी म्हणत असला तरी, आपल्या चेष्टेमुळे कोणी कधीही दुखावले जाणार नाही याची देखील तो तितकीच काळजी घेतो. माझ्या मते, अशोक सराफ यांच्या नंतर जर कोणाचं कॉमिक 'timing' अप्रतिम असेल तर तो म्हणजे प्रसाद ओक. आणि फक्त सिनेमात किंवा मालिकांमध्ये नव्हे, तर खऱ्या आयुष्यात देखील तो समोरच्या माणसाचं पोट दुःखेपर्यंत त्याला हसावू शकतो. मित्रांची मैफल रंगावणाऱ्या प्रसादच्या आयुष्यात 'मित्र' हा अविभाज्य घटक आहे. त्याच्याशी मैत्री करणं अवघड आहे, पण एकदा का मैत्री झाली की मग प्रसाद सारखा मित्र शोधून सापडणार नाही, हे ही तितकंच खरं. खऱ्या अर्थाने 'यारों का यार' आहे तो!

 

आज त्याचा वाढदिवस आहे. वया सोबत काम आणि जबाबदारी देखील वाढतंच चाललीये, अपेक्षा ही वाढत आहेत. आता काय नवीन घेऊन येणार प्रसाद, याच्याकडे प्रत्येकाचं लक्ष्य आहे. २५ वर्षांनी ह्या हिऱ्याला त्याची खरी किंमत जाणवून दिली आहे आपण. एक कोहिनूर हिरा होता, जो गेला तो काय परत ह्या देशात आला नाही. आता जो कोहिनूर आहे आपल्याकडे त्याला ही तोच दर्जा मिळावा आणि भरभरून यश मिळो हीच सदिच्छा त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने व्यक्त करूया! लेखाचा शेवट करताना 'कच्चा लिंबू' चित्रपटातील अखेरच्या प्रसंगातला एका संवादाची आठवण होते. त्या संवादात काटदरे शैलाला म्हणतात की, ''बऱ्याच गोष्टी राहिल्यात पण, माझं तुझ्यावर प्रेम आहे शैला!'' याच संवादाशी साधर्म्य जोडत मी प्रसादला एकच सांगू इच्छिते, ''तुझ्या कडून अजून बऱ्याच चांगल्या गोष्टी आम्हा रसिक चाहत्यांना दाखवायच्या राहिल्या आहेत, पण आमचं तुझ्यावर प्रेम आहे आणि ते नेहमी राहणारच!''

- रश्मी जोशी