षडयंत्र केवळ सीमेपार होत नाहीत...!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Feb-2018
Total Views |





छिंदमने स्वत:चे पावित्र्य सिध्द करण्यासाठी संघाचा गणवेश विकत घेतला. संघाच्या कुठल्यातरी कार्यक्रमाला हजेरी लावली आणि त्याचे फोटो समाजमाध्यमांवर टाकले. महाराष्ट्रात जातीय काव्याचे राजकारण करणार्‍या गिधाडांना यात भरार्‍या मारण्याची संधी दिसायला लागली आहे. संघ आणि भाजपचा हाच खरा चेहरा असल्याची बोंब आता सुरू झाली आहे.



नगरमधील भाजपचा उपमहापौर श्रीपाद छिंदम यांने महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयी कोणत्या प्रकारची भाषा वापरली ते आता जाहीर झाले आहे. भाजपने छिंदमला पक्षातून काढून टाकले आहे आणि कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. सत्तेचे राजकारण निराळेच असते. ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांच्याकडे आपला पक्ष सोडून निघून जाणारे महाभाग राजकारणात नेहमी दिसतात. ही असली माणसे सत्तेसाठी स्वत:च्या बापालाही ओळखण्यास नकार देऊ शकतात. याच मानसिकतेतून छिंदमसारख्या माणसाने छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपशब्द वापरले. या अशा लायकीच्या माणसाकडून अन्य कुठली अपेक्षा ठेवणार? लोकशाही जोपर्यंत प्रगल्भ होत नाही तोपर्यंत असली फालतू माणसे निरनिराळ्या सदनांमध्ये पोहोचणारच आणि तिथे जाऊन घाण करणारच. पण या निमित्ताने जे जातीय घाणेरडे षडयंत्र सक्रिय झाले आहे, त्यापासून संपूर्ण महाराष्ट्राने सावध राहीले पाहीजे. असल्या बाटग्यांना पावन करून घेण्याची एक किंमत असते आणि ती वेळोवेळी चुकवावीच लागतेच. भाजपही त्यापासून स्वत:चा बचाव करू शकत नाही. किंबहुना राजकीय अपरिहार्यतेच्या ज्या कारणामुळे छिंदमसारख्या बेलगाम माणसाला भाजपला आपल्याकडे आणावे लागले, त्याचीच किंमत आज भोगावी लागत आहे.

छिंदमच्या निमित्ताने काही बदमाश लोकांना आपली राजकीय पोळी भाजायची संधी दिसत आहे. छिंदमने स्वत:चे पावित्र्य सिध्द करण्यासाठी संघाचा गणवेश विकत घेतला. संघाच्या कुठल्या तरी कार्यक्रमाला हजेरी लावली आणि त्याचे फोटो समाजमाध्यमांवर टाकले. महाराष्ट्रात जातीय काव्याचे राजकारण करणार्‍या गिधाडांना यात भरार्‍या मारण्याची संधी दिसायला लागली आहे. संघ आणि भाजपचा हाच खरा चेहरा असल्याची बोंब आता सुरू झाली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताने या प्रकरणाचा खणखणीत शब्दात निषेधही केला आहे. पण या पाखंड्याना तो दिसत नसावा. मराठा राजकारणाच्या निमित्ताने आपल्या शिळ्या पोळ्या पुन्हा पुन्हा भाजून घ्यायलाही काही भाकड आता तयार झाले आहेत. भाजपची कार्यालये तोडण्यापर्यंतची संधी काही लोकांनी साधून घेतली आहे.संघाचा गणवेश हा तर केवळ उपचार. संघाचा व्हायला आयुष्य समर्पित करावे लागते. स्वत:चे गलिच्छ हेतू विसरून राष्ट्रउभारणीच्या सम्यक कामात सर्वस्व देऊन उतरावे लागते. छिंदमसारख्याला स्वयंसेवक म्हणून संघाची बदनामी करणे म्हणजे अकलेचे दिवाळे निघाल्याचे लक्षण आहे. वस्तुत: छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देशभरात पोहचविणाऱ्या कार्यांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. मात्र, उतारवयात गमावलेली सत्ता पुन्हा मिळविण्याची हापापी वृत्ती पुन्हा जागी झाली, की अशा चांगल्या गोष्टी दिसणे दुरापास्तच. छिंदमसारखे लोक जेव्हा काँग्रेसमध्ये असतील तेव्हा त्याने तिथल्या गांधीटोप्या डोक्यावर घातल्या असतील. टोप्या लावण्याचे उद्योग करीतच असली माणसे सत्तेच्या पायर्‍या चढत असतात. त्यांना टोपी पांढरी काय आणि काळी काय? काहीच फरक पडत नाही.भाजपने यातून योग्य तो बोध घेतला तर बरे होईल.


महाराष्ट्रात जातीय राजकारण करून स्वत:चे जाणतेपण मिरविणारा राजकारणी कायम आहेच. त्याच्यासारख्यांच्या नादी लागून बेरजेचे राजकारण होत असेल, मात्र ज्यांनी मनापासून देशहीतासाठी सत्तेत यावी असे प्रयत्न केलेत त्याच्या मनात येणारे उणेपण कसे भरून निघणार? छिंदमसारख्यांना तर कडक शिक्षा झालीच पाहीजे.पण कुठल्याही घटनेचे निमित्त साधून राजकीय षडयंत्रांना सुरूवात करणार्‍यांपासून महाराष्ट्र वाचवावा लागेल. देशाच्या विरोधात चालणारी षडयंत्रे केवळ सीमेपलीकडेच चालतात असे नाही. देश विभागणारी जातीची राजकारणे क्षुद्र स्वार्थासाठी देशांतर्गतही खेळली जातात हे ध्यानात ठेवावे लागेल..


@@AUTHORINFO_V1@@