मनपातील रिक्त पदे भरण्याची आशा पल्लवित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Feb-2018
Total Views |
 
 
 
 
 
नाशिक : महापालिकेमध्ये आयुक्तपदी तुकाराम मुंढे आल्यापासून विविध बातम्या सुरू झाल्या असून सामान्य नागरिकांना त्यांच्यामुळे दिलासा मिळाल्याची चर्चा आहे. आता आणखी एक आनंदाची बातमी नाशिककरांना काल नाशिक दौर्‍यावर आलेले नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी दिली.
 
गेल्या पाच ते सहा वर्षांपासून महापालिकेमध्ये रिक्त पदे असल्याने नाशिकच्या विकासाला पुरेसे मनुष्यबळ नाही, स्मार्ट सिटीचे काम कसे पुढे रेटणार अशी चर्चा होती. एकीकडे शहराचा झपाट्याने विस्तार होत असून नागरीकरणही वाढत आहे. वाढत्या शहराला आवश्यक मूलभूत सुविधा पुरवण्यातही महापालिकेला प्रयत्नांची शर्थ करावी लागत आहे. मनसेच्या काळातही रिक्त पदांचा मुद्दा कळीचा बनला होता. याच कालावधीमध्ये महापालिकेला ’ब’ वर्गाचा दर्जाही मिळाला. मात्र, राज्यात सत्ता नसल्याचे कारण देत मनसेकडून नोकरभरतीचा मुद्दा मार्गी लागू शकला नाही. नोकरभरतीवर निर्बंधाचे कारण देत ठेकेदारीकरणाद्वारे महत्त्वाच्या सेवा चालविण्याकडे सत्ताधारी व प्रशासनाचाही भर राहिला. त्यामुळे महापालिकेच्या रूपाने दुय्यम दर्जाच्या सेवा मिळू लागल्यामुळे नाशिककरांमधून रोष व्यक्त होत होता. पुढे भाजपच्या सत्तेत नोकरभरतीचा मुद्दा मुख्यमंत्र्याकडील नगरविकास खात्याच्या अखत्यारीत असल्यामुळे भाजपलाही निर्णयाचे वेध लागले होते.
 
दरम्यान, नाशिक महापालिकेच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आलेल्या नगरविकास राज्यमंत्र्यांनी महत्त्वाच्या योजना व अंमलबजावणीतील अडचणी जाणून घेतल्या. त्यात आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रामुख्याने नोकरभरतीची आवश्यकता व शासनाकडे प्रलंबित आस्थापना आराखड्याकडे लक्ष वेधले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी येत्या सात दिवसांत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आस्थापना आराखडा मंजूर केला जाईल, असे आश्वस्त केले. नाशिकमधील विविध अडचणी सोडविण्यासाठीच आलो असून, प्रशासकीय मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांकडे अहवाल देणार असल्याचे सांगितले.
  
’क’ वर्गाच्या आस्थापना आराखड्यानुसार ७ हजार ९० पदे मंजूर असून ’ब’ वर्गाचा नवा आकृतिबंध मंजूर झाल्यास ७ हजार ६५६ नवीन पदे भरली जातील. त्यामुळेच आस्थापना परिशिष्टावरील एकूण पदसंख्या ७०९० वरून तब्बल १४ हजार ७४६ इतकी होईल. नव्याने तयार केलेल्या आकृतिबंधात ’अ’ गटात २७५, ब- १०९, क -२४२७, तर ड गटात ४ हजार ८४५ नवी पदे प्रस्तावित आहेत. माध्यमिक शिक्षण विभागासाठी सद्यस्थितीत १४८ पदे मंजूर असून त्यात ५० नवीन पदांची वाढ होईल.
 
महिला बालकल्याण विभागाकरिता प्रकल्प अधिकारी, सहायक प्रकल्प अधिकारी यांची २, खतप्रकल्प विभागासाठी स्टेशन ऑपरेटर १, विशेष भूमी संपादन अधिकारी विशेष घटक ९, नागरी भागात अनधिकृत बांधकाम निर्मूलनासाठी पोलिसांची ७८ पदे, वाहतूक नियोजन कक्षासाठी ९१, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी १, खत प्रकल्पासाठी विविध १३, वाहनचालक ९८, बूस्टर पंपिंग स्टेशनवर कार्यरत कर्मचार्‍यांना सेवेत सामावून घेण्यासाठी ४७, तर आरसीएच प्रकल्पातील अधिकारी व कर्मचार्‍यांना मनपा सेवेत सामावून घेण्यासाठी ३५ पदे नव्याने भरली जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. नाशिक मनपात भरती झाल्यास अनेकांना रोजगार मिळेल आणि शहरात निर्माण झालेली कोंडी काहीशी फुटू शकेल. त्यामुळे तरुणांच्या आशा पल्लवित झाल्या असून अनेकांनी आतापासूनच नोकरीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
 
मनपातील सात हजार रिक्त पदांची भरती करण्यात येणार असून, पालिकेतील १८२३ रिक्त पदे भरतीचे अधिकार आयुक्तांना देण्यात आले आहेत. तसेच महापालिकेची ’ब’ वर्गामध्ये पदोन्नती झाल्यानंतर दोन वर्षांपासून राज्याच्या नगरविकास खात्याकडे पडून असलेला १४ हजार ७४६ पदांचा नवीन आकृतिबंध मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून येत्या सात दिवसांत मंजूर केला जाईल,
रणजित पाटील, राज्यमंत्री
 
@@AUTHORINFO_V1@@